तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

जन्मदिनानिमित्त (२७ जानेवारी) त्यांच्या कार्याचा अल्प परिचय...

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी मुख्य फोटो
मुख्य फोटो

लक्ष्मणशास्त्री जोशी हे महाराष्ट्रातील एक नामवंत विचारवंत, संस्कृत विद्वान आणि मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९०१ रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बाळाजी, तर आईचे नाव चंद्रभागा. त्यांचे मोठे बंधू वेणीमाधवशास्त्री पुढे आयुर्वेदाचार्य म्हणून प्रसिद्ध झाले.

लक्ष्मणशास्त्रींचे शिक्षण वाईतील प्राज्ञ पाठशाळेत सुरू झाले. येथे त्यांनी केवलानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली न्याय आणि वेदान्तासारख्या प्राचीन शास्त्रांचा अभ्यास केला. १९२३ साली त्यांनी कोलकात्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून तर्कतीर्थ ही पदवी प्राप्त केली. त्यांनी इंग्लिश भाषा आणि आधुनिक पाश्चिमात्य ज्ञानशाखा यांचाही अभ्यास केला.

१९२७मध्ये नाशिक जिल्ह्यातील मुल्हेरच्या पंडित कुटुंबातील सत्यवती यांच्याशी त्यांचा विवाह केला. त्यांना दोन मुलगे आणि दोन मुली झाल्या. त्यांच्या पुत्रांपैकी ज्येष्ठ चिरंजीव मधुकर अमेरिकेतील इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स (IBM) या संस्थेत होते.

वाई येथेच राहून शास्त्रीजींनी प्राज्ञ पाठशाळेचे, मराठी विश्वकोशाचे आणि विद्वत्तेचे कार्य अखंडपणे पुढे नेले. प्राज्ञ पाठशाळेचे वातावरण केवळ पारंपरिक नव्हते, तर आधुनिक आणि राष्ट्रीय विचारांचे होते. त्यामुळे त्यांना सामाजिक व राष्ट्रीय चळवळीत सक्रिय सहभाग घेण्याची प्रेरणा मिळाली. महात्मा गांधींच्या अस्पृश्यता निवारण कार्यासाठी त्यांनी हिंदू धर्मशास्त्राचे पूरक भाष्य तयार केले. १९३० आणि १९३२मध्ये कायदेभंग चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना प्रत्येक वेळी सहा महिने कारावास भोगावा लागला.

१९३६ नंतर ते मानवेन्द्रनाथ रॉय यांच्या रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टीचे सक्रिय सदस्य झाले. १९४८पर्यंत हा पक्ष अस्तित्वात होता आणि त्यानंतरही शास्त्रीजींचा कॉंग्रेस पक्षाशी विचारवंत भाष्यकार म्हणून संबंध होता.

तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखाली प्राज्ञ पाठशाळा एक व्यापक सांस्कृतिक केंद्र बनली. येथे हरिजन विद्यार्थ्यांचे वसतिगृह, हातकागद कारखाना, आधुनिक मुद्रणालय यांसारखे उपक्रम यशस्वीपणे राबवले गेले. वाई येथील महाविद्यालयाचेही ते संस्थापक सदस्य होते. प्राज्ञ पाठशाळेत धर्मकोशाचे संपादन हे त्यांचे मौलिक कार्य होते. या कोशाचे अकरा खंड प्रकाशित झाले असून, हिंदू समाजातील कुटुंबसंस्था, संस्कार, जाती, विवाह, मालमत्ता, विधी, नीतिशास्त्र आणि तत्त्वज्ञान याबद्दलची प्राचीन ग्रंथांतील माहिती यात व्यवस्थितपणे सादर करण्यात आली आहे.

१९६०पासून शास्त्रीजींनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद भूषवले. या मंडळाद्वारे भाषा व साहित्यविषयक विविध योजना राबवण्यात आल्या. यातील प्रमुख प्रकल्प म्हणजे वीस खंडांचा मराठी विश्वकोश. त्यात प्राचीन आणि आधुनिक ज्ञान मराठी भाषेत मांडण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही शास्त्रीजींनी व्याख्याने व परिषदांचे नेतृत्व केले. सोरटी सोमनाथाच्या जीर्णोद्धाराचे मुख्य पौरोहित्य त्यांनी केले. १९२५ आणि १९२९ मध्ये सनातन धर्म परिषद आणि अखिल भारतीय संस्कृत पंडित संमेलन यांसारख्या कार्यक्रमांतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

त्यांनी भारतीय संविधानाचे संस्कृत भाषांतर केले आणि हिंदी भाषेच्या प्रचारकामातही महत्त्वाची भूमिका बजावली. १९५४मध्ये दिल्ली येथील मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. विविध विभागीय मराठी साहित्य संमेलनांमध्येही त्यांनी अध्यक्षपद भूषवले.

शास्त्रीजींचे लेखन व्यापक आणि मौलिक आहे. त्यांच्या काही प्रसिद्ध ग्रंथांमध्ये “शुध्दिसर्वस्वम्” (१९३४), “आनंदमीमांसा” (१९३८), “हिंदू धर्माची समीक्षा”, तसेच मराठी साहित्याची समीक्षा, रससिद्धांत व संतपरंपरा यांवरील लेखनाचा समावेश आहे. वैदिक संस्कृती आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील ताळमेळ त्यांनी सखोल पद्धतीने मांडला. त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरवण्यात आले. शास्त्रीजींचे विचार आणि कार्य हे मराठी साहित्य, संस्कृती, सामाजिक शिक्षण आणि राष्ट्रीय विचार यांच्या क्षेत्रात एक मौल्यवान ठेवा मानले जातात. २७ मे १९९४ रोजी त्यांचे निधन झाले.

(माहिती स्रोत : मराठी विश्वकोश)

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 27-01-2026 News publication date | Time: 11:33 AM News publication time | Views: 85 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 27-01-2026 News publication date | Time: 11:33 AM News publication time | Views: 85 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words