अमृत संस्थेतर्फे २७ जानेवारीला यू-ट्यूबवर 'लाइव्ह ओरिएंटेशन लेक्चर'चे आयोजन
पुणे : खाद्यपदार्थांची घरपोच डिलिव्हरी ही संकल्पना आता मोठ्या शहरांमध्ये तर रुळलीच आहे; पण छोट्या शहरांमध्येही ती रुजू आणि वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर क्लाउड किचन या व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. स्वयंपाकाची आवड असलेले आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेले युवक-युवती हा व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकतात. अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे या विषयातील प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे. तत्पूर्वी, या विषयाची प्राथमिक ओळख करून देणारे व्याख्यान अमृत संस्थेने आयोजित केले आहे. २७ जानेवारी रोजी यू-ट्यूबवरून प्रसारित होणारे हे व्याख्यान इच्छुकांना घरबसल्या पाहता येणार आहे. (लिंक बातमीच्या शेवटी दिली आहे.)
आजच्या डिजिटल युगात कमी गुंतवणूक असलेले क्लाउड किचन बिझनेस मॉडेल वेगाने लोकप्रिय होत आहे. म्हणूनच या ओरिएंटेशन लेक्चरद्वारे इच्छुक उद्योजकांना योग्य दिशा, मूलभूत ज्ञान आणि व्यावहारिक मार्गदर्शन केले जणार आहे. या लेक्चरमध्ये क्लाउड किचन व्यवसाय संकल्पना, कार्यपद्धती आणि भविष्यातील संधी यांचा सविस्तर माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांना अंदाज येईल आणि त्यांना पुढील प्रशिक्षण घ्यायचे असल्यास अमृत संस्थेच्या प्रशिक्षण कार्यक्रमात नावनोंदणी करता येईल.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असून, त्यासाठी विविध निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रम आणि योजना राबवल्या जातात. स्वयंपाकाची आवड असलेले, तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेले युवक-युवती, महिला व नवउद्योजकांसाठी क्लाउड किचन प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्या दृष्टीने या क्षेत्राची ओळख करून देणारे हे यू-ट्यूबवरील लाइव्ह व्याख्यान जास्तीत जास्त जणांनी पाहावे, असे आवाहन अमृत संस्थेने केले आहे.
व्याख्यानाची लिंक :https://youtu.be/D1LLOKts7Vw
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment