'बेकरी प्रशिक्षणाबरोबरच मिळाली स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची दिशा'

अमृत संस्थेच्या रत्नागिरीतील पहिल्या बेकरी प्रशिक्षण कार्यक्रमाची यशस्वी सांगता

'बेकरी प्रशिक्षणाबरोबरच मिळाली स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची दिशा' मुख्य फोटो
'बेकरी प्रशिक्षणाबरोबरच मिळाली स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची दिशा' अतिरिक्त फोटो

रत्नागिरी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या अमृत बेकरी प्रशिक्षण कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. पाच जानेवारीपासून २२ जानेवारीपर्यंत अशा या १८ दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. 'या कार्यक्रमात आम्हाला बेकरी पदार्थ कसे तयार करायचे, याचे प्रशिक्षण तर मिळालेच; पण स्वतःचा व्यवसाय कसा उभारायचा याची दिशाही मिळाली,' अशी प्रातिनिधिक भावना प्रशिक्षणार्थ्यांकडून व्यक्त झाली.

स्थानिक युवक-युवती, महिला, तसेच नवउद्योजकांना स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता. म्हणूनच सहभागी प्रशिक्षणार्थींना बेकरी व्यवसायातील तांत्रिक कौशल्यांसोबतच व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होईल, अशा पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात केक, कुकीज, खारी बिस्किटे, लादी पाव, स्लाइस ब्रेड, पिझ्झा बेस, तसेच टॉफीज व चॉकलेट्स यांसारख्या विविध बेकरी उत्पादनांची निर्मिती प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शिकविण्यात आली. कच्च्या मालाची निवड, मोजमाप, मिश्रण पद्धती, तापमान नियंत्रण, बेकिंग प्रक्रिया, पॅकेजिंग व साठवणूक या सर्व बाबींचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

याशिवाय उत्पादनाची गुणवत्ता, स्वच्छता व अन्नसुरक्षिततेचे नियम, खर्च व्यवस्थापन, नफा-तोट्याचे गणित, ब्रँडिंग व विक्री कौशल्ये यांविषयीही प्रशिक्षणार्थींना माहिती देण्यात आली. त्यामुळे प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे.

सांगता समारंभात सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी आपले अनुभव सांगितले. 'या प्रशिक्षणामुळे केवळ बेकरी पदार्थ बनवण्याचेच नव्हे, तर स्वतःचा व्यवसाय कसा उभारायचा याचे प्रशिक्षणही मिळाले,' असे अनेक प्रशिक्षणार्थ्यांनी नमूद केले. काही जणांनी लवकरच घरगुती बेकरी, लघुउद्योग किंवा स्वयंरोजगार सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.

अमृत संस्थेचे कोकण विभागीय व्यवस्थापक अमित सामंत सांगता समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. अमृत संस्थेचे रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक संतोष जुवळे, जिल्हा उपव्यवस्थापक अवधूत मुळ्ये, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी रामचंद्र गावडे, तसेच श्रीमती धनश्री खंडागळे हे मान्यवर या वेळी उपस्थित होते.

कौशल्याधारित प्रशिक्षण हेच ग्रामीण व जिल्हास्तरीय रोजगारनिर्मितीचे प्रभावी साधन आहे, असे प्रतिपादन अवधूत मुळ्ये यांनी केले. संतोष जुवळे यांनी अमृत संस्थेच्या विविध प्रशिक्षण योजनांची माहिती देऊन, 'अमृत संस्थेच्या माध्यमातून तरुणांनी नोकरी शोधणारे नव्हे, तर नोकरी देणारे व्हावे,' असे आवाहन केले.

अमित सामंत यांनी कोकणात बेकरी व अन्नप्रक्रिया उद्योगांना मोठी संधी असल्याचे नमूद करून, प्रशिक्षणार्थ्यांनी मिळवलेल्या कौशल्यांचा योग्य वापर करून स्वतःचा व्यवसाय उभारावा, असे प्रतिपादन केले. रामचंद्र गावडे यांनी उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजना, कर्ज सुविधा व मार्गदर्शन सेवा यांची माहिती दिली.

अत्यंत उत्साही व प्रेरणादायी वातावरणात हा सांगता समारंभ पार पडला. या प्रशिक्षणामुळे रत्नागिरी जिल्ह्यात स्वयंरोजगार, स्थानिक उद्योजकता व आर्थिक सक्षमता या बाबींना चालना मिळणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

अधिक माहितीसाठी संपर्क :

अमृत रत्नागिरी जिल्हा कार्यालय,

प्लॉट नं १७, घर नंबर ७०७/ड ४,

माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या पाठीमागे,

हॉटेल सिंधुदुर्गसमोर, साळवी स्टॉप

रत्नागिरी - ४१५६१२

मोबाइल नं : 9112228761

ई-मेल - amrut.ratnagiri.dm@gmail.com

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/



Publisher: Santosh Juvale News publisher name | Date: 22-01-2026 News publication date | Time: 06:18 PM News publication time | Views: 4,146 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Santosh Juvale News publisher name | Date: 22-01-2026 News publication date | Time: 06:18 PM News publication time | Views: 4,146 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words