अमृत कौशल्य उद्यम वर्धन उपक्रमाचा नागपूरमध्ये उत्साहात प्रारंभ

कौशल्यप्राप्तीतून आत्मनिर्भरतेकडे; खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी सुवर्णसंधी

अमृत कौशल्य उद्यम वर्धन उपक्रमाचा नागपूरमध्ये उत्साहात प्रारंभ मुख्य फोटो
अमृत कौशल्य उद्यम वर्धन उपक्रमाचा नागपूरमध्ये उत्साहात प्रारंभ अतिरिक्त फोटो

नागपूर : खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने अमृत कौशल्य उद्यम वर्धन अर्थात 'ईडीपी' हा नवा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला आहे. अमृत संस्थेच्या नागपूर कार्यालयात 'ईडीपी'च्या पहिल्या बॅचचा मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले सर्वांगीण मार्गदर्शन करण्याचा उद्देश असून, प्रशिक्षक म्हणून अनुभवी आणि तज्ज्ञ प्रशिक्षक अ‍ॅड. लीना सोईंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अ‍ॅड. लीना सोईंदे वकील आणि एमबीए झालेल्या असून, त्यांना प्रशिक्षण क्षेत्रात तब्बल १८ वर्षांचा समृद्ध अनुभव आहे. त्यांनी आजपर्यंत उद्योजकता विकास, व्यक्तिमत्त्व विकास, कायदेशीर मार्गदर्शन, व्यवसाय नियोजन, आर्थिक साक्षरता, महिला सक्षमीकरण, तसेच युवकांसाठी विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या राबवले आहेत. त्यांच्या व्यापक अनुभवामुळे प्रशिक्षणार्थ्यांना कायदेशीर प्रक्रिया, व्यवसाय नोंदणी, आर्थिक नियोजन, मार्केटिंग, व्यवस्थापन कौशल्ये यांची माहिती, तसेच आत्मविश्वास वृद्धिंगत करणारे व्यावहारिक ज्ञान मिळणार आहे.

अ‍ॅड. लीना सोईंदे यांनी स्वतःचा परिचय करून देऊन प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश स्पष्ट केला. 'नोकरी शोधणारा युवक नव्हे, तर नोकरी देणारा उद्योजक बनणे ही काळाची गरज आहे,' असे सांगून त्यांनी उद्योजकतेचे महत्त्व अधोरेखित केले. व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींकडे कसे पाहायचे, त्यांच्यावर आत्मविश्वासाने कशा प्रकारे मात करता येते, नियोजनाचे महत्त्व आणि सातत्याने शिकत राहण्याची गरज या विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.

'प्रत्येकाने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ठामपणे पुढे यावे,' असे आवाहन या वेळी अमृत संस्थेचे नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे यांनी सर्व लाभार्थ्यांना केले. आत्मनिर्भर बनण्यासाठी उद्योजकता हा सर्वांत प्रभावी मार्ग असून, अमृत संस्थेच्या यासाठीच्या योजना, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि संधींचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. 'स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यास केवळ स्वतःचीच प्रगती होत नाही, तर इतरांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देता येते,' असेही त्यांनी नमूद केले.

हे प्रशिक्षण लाभार्थ्यांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक तयारी, कौशल्यविकास आणि व्यावहारिक ज्ञान देणारे ठरणार आहे. या प्रशिक्षणातून अनेक नवउद्योजक घडतील, रोजगारनिर्मितीला चालना मिळेल आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम समाजनिर्मितीला हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

हा उपक्रम आत्मनिर्भर भारत आणि सक्षम महाराष्ट्राच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 22-01-2026 News publication date | Time: 01:45 PM News publication time | Views: 3,248 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 22-01-2026 News publication date | Time: 01:45 PM News publication time | Views: 3,248 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words