हिमा दास

जीवनाच्या आणि धावण्याच्या स्पर्धेमध्ये अग्रेसर असलेली धावपटू

हिमा दास मुख्य फोटो
मुख्य फोटो

कोणत्याही प्रकारचे यश संपादन करण्यासाठी फक्त आणि फक्त मेहनतीची गरज लागते. तिथे तुम्ही गरीब आहात की श्रीमंत, शहरात आहात की खेड्यात याने काहीच फरक पडत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध धावपटू हिमा दास. तिने २०१८मध्ये फिनलँडमध्ये वर्ल्ड जुनियर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी ती पहिली भारतीय आहे.

हिमा दासचे टोपणनाव धिंग एक्स्प्रेस असे आहे. तिचा जन्म आसाम राज्यातील नागाव जिल्ह्यातील धिंगजवळील कंधुलिमारी गावात ९ जानेवारी २००० रोजी झाला. तिचे वडील रणजित आणि आई जोनाली हे भातशेती करतात. ती चार भावंडांमध्ये सर्वांत लहान आहे. तिने धिंग पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि लहान वयात फुटबॉल खेळायला सुरुवात केली. ती आपल्या शाळेत मुलांबरोबर फुटबॉल खेळत असे. तिला फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवायची होती. पुढे, जवाहर नवोदय विद्यालयाचे शारीरिक शिक्षण प्रशिक्षक श्यामशुल हक यांच्या सूचनेवरून हिमा दासने खेळ बदलला आणि धावपटू म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. ती कमी व मध्यम अंतराच्या शर्यतींमध्येच भाग घेत असे. श्यामशुल हक यांनी तिचा नागाव स्पोर्ट्‌स असोसिएशनच्या गौरीशंकर रॉय यांच्याशी परिचय करून दिला. हिमा दास नंतर आंतर-जिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरली आणि तिने या क्रीडा स्पर्धांत दोन सुवर्णपदके जिंकली. 

जुलै २०१८मध्ये फिनलंड येथे झालेल्या २० वर्षांखालील जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत हिमा दासने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले.अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. तिने ५१.४६ सेकंदांची वेळ नोंदवली. या कामगिरीमुळे ती प्रकाशझोतात आली. तिने जकार्ता, इंडोनेशिया येथे झालेल्या २०१८च्या आशियाई खेळांमध्ये ५०.७९ सेकंदांच्या वेळेसह ४०० मीटर्समध्ये सध्याचा भारतीय राष्ट्रीय विक्रम केला आहे. IAAF वर्ल्ड अंडर ट्वेंटी चॅम्पियनशिपमध्ये ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय अ‍ॅथलीट आहे. राज्याच्या एकात्मिक क्रीडा धोरणांतर्गत तिची आसाम पोलिसांमध्ये पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

तिच्या बालपणीच्या खडतर प्रवासाविषयी सांगताना ती किती संघर्षातून पुढे आली आहे हे समजते. धावपटू म्हणजे डाएटमध्ये सर्वांत जास्त प्रोटीनची आवश्यकता असते. घरच्या गरिबीने प्रोटीन्स तर दूरच, पण पोटभर अन्नही मिळत नव्हते. हिमाची बहीण तिच्या गावातून फिरताना एखाद्या घरात काही कार्य असेल तर हिमाला सांगायची आणि मग हिमा त्या घरी जाऊन तिथे भोजन करायची. कधीतरी का होईना आपल्या प्रोटीन्सची गरज भागवायची. इतक्या हलाखीच्या परिस्थितीतून हिमाने आज मिळवलेले यश नक्कीच अभिमानास्पद आहे. हिमाच्या या संघर्षाला आणि त्यातून मिळालेल्या यशाला वंदन!

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 21-01-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 3 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 21-01-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 3 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement