महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक न्या. रानडे यांचा १६ जानेवारी हा स्मृतिदिन.
न्या. महादेव गोविंद रानडे हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व ब्रिटिश भारतामधील न्यायाधीश होते. शिक्षणाचा प्रसार व्हावा, स्त्रियांनाही शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या. त्यांनी शिक्षण, समाजसेवा, राजकारण तसेच आर्थिक बाबतीत अमूल्य कार्य केले. १६ जानेवारी या त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून देणारा हा लेख.
महादेव गोविंद रानडे यांचा जन्म १८ जानेवारी १८४२ रोजी नाशिकमधील निफाड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. १८५६नंतर ते आणि त्यांचे मित्र विनायक जनार्दन कीर्तने मुंबईत शिक्षणासाठी एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले. इतिहास आणि अर्थशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय होते. मॅट्रिक, एमएनंतर ते १८६६ साली कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून त्यांची निवड झाली. इ. स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १८८५मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. न्या. रानडे यांना आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीत महत्त्वाचे स्थान आहे.
न्या. रानडे यांनी स्वातंत्र्यासाठी व सामाजिक सुधारणांसाठी कायम घटनात्मक व सनदशीर मार्गांचा पुरस्कार केला. स्वातंत्र्यपूर्व काळातील मवाळ प्रवाहाचे ते नेते होते. त्यांनी भारतीय राजकारणात अर्थशास्त्रीय विचार आणला. स्वदेशीच्या कल्पनेला त्यांनी शास्त्रशुद्ध व व्यावहारिक स्वरूप दिले. त्यांनी भारतातील दारिद्र्याच्या प्रश्नाचे मूलभूत विवेचन करून येथील दारिद्र्याची कारणे व ते दूर करण्याचे उपाय यासंबंधी अभ्यासपूर्ण विचार मांडले. ३१ मार्च १८६७ रोजी न्यायमूर्ती रानडे, डॉ. आत्माराम पांडुरंग, डॉ. रा. गो. भांडारकर, वामन आबाजी मोडक इत्यादी मंडळींनी पुढाकार घेऊन मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली.
समाजसुधारणांसाठी रानडे यांनी पुढाकार घेऊन भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना केली. जातिप्रथेचे उच्चाटन, आंतरजातीय विवाहास परवानगी, विवाहाच्या वयोमर्यादेत वाढ, बहुपत्नीकत्वाच्या प्रथेस आळा, विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण, तथाकथित जाती-बहिष्कृत लोकांच्या स्थितीत सुधारणा, हिंदू-मुसलमानांच्या धार्मिक मतभेदांचे निराकरण अशा या संस्थेच्या मागण्या होत्या. भारताच्या स्वातंत्र्यात पुढे मध्यवर्ती भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रीय कॉंग्रेस या संघटनेच्या स्थापनेतही (इ. स. १८८५) न्यायमूर्ती रानडे यांचा मोठा सहभाग होता. अशा या थोर समाजसुधारकाचे १६ जानेवारी १९०१ रोजी निधन झाले. त्यांच्या कार्यास शतश: नमन!
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment