अस्वस्थ तरुणाईला वाट दाखवणारे दूरदर्शी विचारवंत स्वामी विवेकानंद यांची जयंती...
आज भारताच्या अवतीभवतीच्या देशांमध्ये 'जेन-झी'चे आंदोलन हा चर्चेचा आणि एका अर्थाने चिंतेचा विषय ठरला आहे. आपल्या भावनांना, विचारांना व्यक्त करण्यासाठी योग्य दिशा न मिळाल्याने काहीशी अस्वस्थ आणि भरकटलेली, अशी ही तरुणाई बघितली की एक व्यक्तिमत्त्व प्रकर्षाने आठवते ते म्हणजे स्वामी विवेकानंद...! त्यांच्या शाश्वत विचारांची आजच्या तरुण पिढीला नितांत गरज आहे. स्वामी विवेकानंद हे देशाला लाभलेल्या दूरदर्शी नेत्यांपैकी एक होते. त्यांची विचारसरणी आणि कार्य अजूनही भारतीय तरुणांसाठी मार्गदर्शक आहे. भारताच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दर वर्षी १२ जानेवारी रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. हा दिवस तरुणांचे प्रेरणादायी योगदान आणि तरुण पिढीला वैयक्तिक विकास, आत्म-सुधारणा आणि सामाजिक प्रगतीसाठी प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करतो. स्वामी विवेकानंदांची शिकवण जगभरातील लाखो लोकांना, विशेषतः तरुणांना शिकवण देणारी आहे. त्यांचे तत्त्वज्ञान आत्मविश्वास, शिस्त आणि मानवतेची सेवा यांचे महत्त्व अधोरेखित करते. याच कारणाने केंद्र सरकारने १९८४पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश तरुणांना प्रेरणा देणे आणि त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणे हा आहे. विवेकानंदांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी आणि तरुणांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्यास प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. देशाचे भविष्य तरुणांच्या हातात असते आणि जेव्हा ते स्वतःला उदात्त कार्यांसाठी समर्पित करतात तेव्हा देश अधिक उंची गाठू शकतो, हे लक्षात ठेवण्याचा हा दिवस आहे.
भारत हा असा देश आहे, जिथे अशी क्रयशक्ती असणाऱ्या तरुणांची लोकसंख्या लक्षणीय आहे. एका अर्थाने आज भारत हा जगातील इतर देशांच्या तुलनेत तरुणांचा देश आहे. साहजिकच आजच्या तरुण पिढीने भरकटवणाऱ्या विचारांपासून दूर जावे आणि आपली बुद्धी व शक्ती देशकल्याणासाठी वापरावी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले आहेच, की देह आणि देव यांच्यामध्ये देश आहे आणि देहापासून देवापर्यंत जाण्यासाठी देशसेवा हे माध्यम आहे. प्रत्येक तरुणाने स्वत:चा विकास आणि प्रगती जरूर करावी. परंतु 'राष्ट्र प्रथम' या भावनेने प्रेरित व्हावे. सुदैवाने आपल्या संस्कृतीत आणि इतिहासात स्वामी विवेकानंदांसारख्या थोर पुरुषांची उदाहरणे आहेत. त्यांनी देशासाठी आणि देशातील तरुण पिढीसाठी आपल्या विचारांचा वारसा ठेवलेला आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गाने आजची भारतीय तरुण पिढी मार्गस्थ झाली, तर देशाच्या प्रगतीबरोबरच 'वसुधैव कुटुंबकम्' ही आपली संस्कृती जोपासली जाईल आणि आजची अस्वस्थ पिढी एका शाश्वत आणि समाधानी दिशेने वाटचाल करेल यात शंका नाही!
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment