‘जय जवान जय किसान’ या नाऱ्याने देशाला नवी दिशा देणारे व्यक्तिमत्त्व
इतिहासाच्या पानांत अशी काही व्यक्तिमत्त्वे असतात ज्यांचे आयुष्य खूप मोठे नसले, तरी त्यांचे कर्तृत्व हे समाजाला दिशा देणारे ठरते. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे भारताचे दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री. ११ जानेवारी हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्या कार्याचा अल्प परिचय...
लालबहादूर शास्त्री यांचा जन्म दोन ऑक्टोबर १९०४ रोजी उत्तर प्रदेशात वाराणसीपासून सात मैल दूर असलेल्या मुघलसराय या लहान गावात झाला. लालबहादूर शास्त्री केवळ दीड वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे, यासाठी त्यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले. घरी सर्व जण त्यांना 'नन्हे' या नावाने हाक मारीत. ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेला जायचे. कडक उन्हाळ्यातही तापलेल्या रस्त्यावरून ते शाळेत जायचे. परकीयांच्या गुलामीमधून देशाला मुक्त करण्याच्या लढ्यात तरुणपणी लालबहादूर शास्त्री यांना रुची निर्माण झाली.
गांधीजींनी देशवासीयांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्या वेळी लालबहादूर शास्त्री सोळा वर्षांचे होते. गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शिक्षण सोडून देण्याचा विचार त्यांनी एकदा केला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला; मात्र ते प्रयत्न असफल ठरले. लालबहादूर शास्त्री यांचा निर्धार ठाम होता. ब्रिटिश राजवटीच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या अनेक राष्ट्रीय संस्थांपैकी एक असलेल्या वाराणसीतील काशी विद्यापीठात ते आले. येथे अनेक महान विद्वान आणि देशभक्तीचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडला. विद्यापीठाने त्यांना 'शास्त्री' ही पदवी दिली; मात्र लोकांच्या मनात त्यांच्या नावाचाच एक भाग म्हणून शास्त्री हे नाव कोरले गेले.
१९३०मध्ये महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला. या प्रतीकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती आली. लालबहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केले आणि एकूण सात वर्षे तुरुंगवास सोसला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्ष जेव्हा सत्तेवर आला, तेव्हा त्यांना उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय सचिव नियुक्त करण्यात आले आणि लवकरच ते गृहमंत्री झाले. त्यांची कठोर मेहनत करण्याची क्षमता आणि त्यांची कार्यक्षमता उत्तर प्रदेशात एक लोकोक्ती बनली.
१९५१मध्ये ते नवी दिल्लीत आले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वेमंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, गृहमंत्री आणि नेहरूंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांची प्रतिष्ठा निरंतर वाढतच होती. एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा दिला. देश आणि संसदेने त्यांच्या अभूतपूर्ण निर्णयाची प्रशंसा केली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या घटनेबाबत संसदेत बोलताना लालबहादूर शास्त्री यांची इमानदार वृत्ती आणि उच्च आदर्शमूल्यांची प्रशंसा केली. त्यांचे पक्षासाठी भरीव योगदान होते. १९५२, १९५७ आणि १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकांमधील पक्षाच्या निर्णायक आणि जबरदस्त यशामध्ये त्यांचे संघटनात्मक कौशल्य आणि एखादी गोष्ट जवळून पारखण्याची त्यांची क्षमता यांचे मोठे योगदान होते.
तीसहून अधिक वर्षांच्या समर्पित सेवाकाळात लालबहादूर शास्त्री निष्ठा, क्षमतेसाठी जनमानसात लोकप्रिय झाले. नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी लोकांची भावना समजून घेणारे खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र बनले. त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. लालबहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता. आपले गुरू महात्मा गांधींच्या शैलीत ते एकदा म्हणाले. “कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे.” महात्मा गांधी यांची परंपरा कायम राखणारे लालबहादूर शास्त्री यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले. ११ जानेवारी १९६६ रोजी ताश्कंद येथील भेटीवेळी झालेल्या त्यांच्या मृत्यूचे गूढ अजूनही उलगडलेले नाही.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment