फलटणमधील डॉ. राजगोपाल खंडेलवाल यांनी केले कौतुक आणि सक्रिय सहकार्याचे दिले आश्वासन
फलटण (जि. सातारा) : येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. राजगोपाल खंडेलवाल यांनी अमृत समर्थ ग्रामविकास योजना या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला पाठिंबा दर्शवला असून, या योजनेसाठी आपण सक्रिय सहकार्य करणार असल्याचे सांगितले. ग्रामीण भागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त असून, ‘स्वयंपूर्ण गाव’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची क्षमता या उपक्रमात असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. खंडेलवाल म्हणाले, की ग्रामीण विकास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न राहता आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, शेतीपूरक उद्योग आणि रोजगारनिर्मिती या सर्व घटकांचा समन्वय साधणारा असला पाहिजे. अमृत समर्थ ग्रामविकास योजना ही याच व्यापक दृष्टिकोनातून राबवण्यात येत असून, त्यामुळे ग्रामीण जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.
ग्रामीण आरोग्यव्यवस्थेबाबत बोलताना त्यांनी सांगितले, की अनेक गावांमध्ये आजही प्राथमिक आरोग्य सुविधा आणि आरोग्यविषयक जनजागृतीची कमतरता जाणवते. या योजनेच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिरे, प्रतिबंधात्मक उपचार, तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन उपक्रम राबविल्यास ग्रामीण जनतेला थेट लाभ होईल.
या योजनेअंतर्गत शेतीपूरक व्यवसाय, पाणलोट विकास, सेंद्रिय शेती, महिला व युवकांसाठी अमृत कौशल्यविकास प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांना चालना मिळत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यामुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होऊन शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शेवटी डॉ. खंडेलवाल यांनी समाजातील सर्व घटक म्हणजेच डॉक्टर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक व प्रशासन इत्यादींनी एकत्र येऊन अमृत समर्थ ग्रामविकास योजनेला पाठबळ द्यावे, असे आवाहन केले. सामूहिक प्रयत्नांतूनच खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण व समृद्ध गावांची उभारणी शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment