ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचा जन्मदिन
डोळे... देवाने आपल्याला दिलेली अत्यंत महत्त्वपूर्ण भेट. ही सुंदर सृष्टी बघण्याचा आनंद आपण फक्त डोळ्यांनीच घेऊ शकतो. परंतु जे अंध असतात त्यांना मात्र हे बघण्याचे भाग्य मिळत नाही. इतकेच काय, चांगले विचार ज्या माध्यमातून आपल्याला वाचायला मिळतात, ती पुस्तकेसुद्धा त्यांना वाचता येत नाहीत. अशा व्यक्तींना वाचण्याचे हे सुख प्राप्त होते ते ब्रेल लिपीच्या साह्याने. अंध व्यक्तींच्या आयुष्यात आनंद निर्माण करणाऱ्या या ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचा चार जानेवारी हा जन्मदिन. तो दर वर्षी जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो.
अंध बांधवांसाठी हा दिवस खूप खास आहे. कारण अंधांच्या आयुष्यात प्रकाश आणणाऱ्या लुई ब्रेल यांचा जन्म या दिवशी झाला. लुई ब्रेल यांनीच जन्माला घातलेल्या ब्रेल लिपीमुळे अंध व्यक्तीही आज लिहू-वाचू शकतात. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने सहा नोव्हेंबर २०१८ रोजी एक ठराव मंजूर केला. त्यानुसार, ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचा चार जानेवारी हा जन्मदिन दर वर्षी जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर चार जानेवारी २०१९ रोजी प्रथमच जागतिक ब्रेल दिन साजरा करण्यात आला.
लुई ब्रेल यांचा जन्म चार जानेवारी १८०९ रोजी फ्रान्समधील कूपर येथे झाला. लहानपणी एका अपघातामुळे लुई ब्रेल यांची दृष्टी गेली. वास्तविक त्याच्या एका डोळ्यावर चाकूने वार करण्यात आले होते. योग्य वेळी उपचार न मिळाल्याने हळूहळू त्यांचा दुसरा डोळाही पूर्णपणे निकामी झाला. त्यानंतर लुई ब्रेल यांना अनेक समस्यांशी सामना करावा लागला; पण त्यांनी हार न मानता त्यांच्यासारख्या व्यक्तींच्या समस्या समजून घेऊन वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी ब्रेल लिपीचा शोध लावला. ते अंधांसाठी मोठे वरदान आहे. ब्रेल लिपी ही दृष्टिहीनांना शिकवण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे. या लिपीमध्ये अंध व्यक्ती स्पर्शाने वाचू आणि लिहू शकतात. या लिपीमध्ये अंध व्यक्तींना कागदावर उठलेल्या बिंदूंच्या स्पर्शाने शिकवले जाते. या लिपीचा वापर करून पुस्तकेही लिहिता येतात. ज्याप्रमाणे टंकलेखन यंत्राद्वारे पुस्तके लिहिली जातात, त्याचप्रमाणे ब्रेल लिपीत लिहिण्यासाठी ब्रेलरायटरचा वापर केला जातो.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment