सतीश धवन

भारतीय अंतराळ कार्यक्रमाला दिशा देणारे शास्त्रज्ञ सतीश धवन यांचा तीन जानेवारी हा स्मृतिदिन. त्यांचा हा अल्प परिचय...

सतीश धवन मुख्य फोटो
मुख्य फोटो

आपले चांद्रयान जेव्हा चंद्रावर पोहोचले, तेव्हा एक भारतीय म्हणून सर्वांना अभिमान वाटला. आपल्या शास्त्रज्ञांची ही आत्मनिर्भर झेप पाहून सर्वांची मान अभिमानाने उंचावली. फक्त चांद्रयान मोहीमच नाही, तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण टप्पे पार केले आहेत. या यशामागे निव्वळ आताचीच नाही, तर पूर्वीपासूनच्या शास्त्रज्ञांनी केलेली मेहनत आहे. त्यांनी जे स्वप्न साकार करण्यासाठी दिवसरात्र कठोर मेहनत घेतली, त्याचेच फलित म्हणजे हे यश आहे. यातील एक नाव म्हणजे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि इस्रोचे माजी अध्यक्ष सतीश धवन (१९२०-२००२). भारतीय अंतराळ कार्यक्रमाची पायाभरणी करणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये त्यांचा समावेश होतो.

सतीश धवन यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२० रोजी श्रीनगर येथे झाला. त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवी पूर्ण केल्यानंतर अमेरिकेतील कॅलटेक (Caltech) येथून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी मिळवली. विक्रम साराभाई यांच्या निधनानंतर १९७२मध्ये त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले. त्यांच्या कार्यकाळात भारताने आर्यभट (पहिला उपग्रह), रोहिणी आणि ॲपल यांसारखे महत्त्वाचे उपग्रह प्रक्षेपित केले. त्यांनी SLV-3 आणि PSLV यांसारख्या यशस्वी प्रक्षेपकांच्या विकासात मोलाची भूमिका बजावली.
सतीश धवन हे त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्वासाठी ओळखले जातात. १९७९मध्ये जेव्हा SLV-3चे पहिले प्रक्षेपण अपयशी ठरले, तेव्हा त्यांनी सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली; मात्र जेव्हा पुढच्या वर्षी ते यशस्वी झाले, तेव्हा त्यांनी त्याचे सर्व श्रेय आपल्या टीमला (ज्यात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा समावेश होता) दिले. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या बेंगळुरूतील नामवंत संस्थेचे सर्वांत तरुण संचालक होते. त्यांनी तिथे एरोस्पेस इंजिनीअरिंग विभागाचा मोठा विकास केला.
त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना पद्मभूषण (१९७१) आणि पद्मविभूषण (१९८१) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सन्मानार्थ श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्राला सतीश धवन यांचे नाव देण्यात आले आहे. धवन यांनी रचलेल्या पायावरच आज भारताचे अंतराळ मिशन यशस्वीपणे उभे आहे. तीन जानेवारी २००२ रोजी त्यांचे निधन झाले.

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 02-01-2026 News publication date | Time: 07:39 PM News publication time | Views: 65 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 02-01-2026 News publication date | Time: 07:39 PM News publication time | Views: 65 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words