पेशवाईचे संस्थापक बाळाजी विश्वनाथ यांचा एक जानेवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
आपली महाराष्ट्राच्या भूमीने अनेक पराक्रमी वीर दिले. या मातीतच छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार केला. या स्वराज्यासाठी अनेक जणांनी आपले आयुष्य पणाला लावले. यातीलच एक नाव म्हणजे पेशवे बाळाजी विश्वनाथ.
बाळाजी विश्वनाथ देशमुख किंवा पेशवे बाळाजी विश्वनाथ हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान होते. त्यांनी पेशवेपदाचे महत्त्व वाढवले व ते पुढे त्यांच्या वंशजांकडे गेले. या अर्थाने बाळाजींना पेशवाईचे संस्थापक म्हटले जाते. त्यांचा जन्म एक जानेवारी १६६२ रोजी कोकणातील महाल दंडा राजपुरी येथे झाला. श्रीवर्धन येथील देशमुखीचे वतन या घराण्यात चालू होते. हा मुलूख जंजिर्याच्या सिद्दीच्या अंमलाखाली होता. त्याच्या जुलमास कंटाळून बाळाजी व त्यांच्यासमवेत नाना फडणवीसांचे पूर्वज भानू १६९०च्या सुमारास सातार्याकडे आले. पुढे धनाजी जाधव यांच्याकडे बाळाजी नोकरीस राहिले. तिथे त्यांनी स्वकर्तृत्वाने पुणे, दौलताबाद या प्रदेशांवर सुभेदार, सरसुभेदार इत्यादी पदावर काम केले.
१६९०-१७०७ दरम्यान मराठी कारभार आणि राजकारण यांचा अनुभव घेतलेल्या बाळाजीपंतांना शाहू महाराजांनी राज्याभिषेकसमयी ‘सेनाकर्ते’ ही पदवी बहाल केली. त्याच वेळी काही मुघल अधिकार्यांनी शाहूंना विरोध केला. बाळाजींनी कर्जे काढून फौजा उभारल्या आणि कृष्णराव खटावकर, दमाजी थोरात, उदाजी चव्हाण यांसारख्या दुष्टांचा आणि छत्रपतींच्या इतर शत्रूंचा पराभव केला. सेनाकर्ते ही पदवी त्यांनी सार्थ केली. कान्होजी आंग्रे हे त्या वेळी ताराबाईला मिळाले होते आणि लोहगड घेऊन त्यांनी पुण्यावर स्वारी केली. शाहूंनी त्यांचा बंदोबस्त करण्याकरिता पेशवा बहिरोपंत पिंगळे यास पाठवले. परंतु त्यांचा पराभव झाला. अशा बिकट परिस्थितीत बाळाजींनी मुत्सद्देगिरीने कान्होजींना शाहूंच्या पक्षात ओढले आणि त्यांना सरखेलपद बहाल करविले. १७१३मध्ये शाहूंनी बाळाजींना पेशवेपद दिले. अशा या महापराक्रमी पेशव्यांचे १२ एप्रिल १७२० रोजी निधन झाले.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment