शेगावमध्ये अमृत बेकरी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रवीण कोळेश्वर यांचे आवाहन
शेगाव : “समाजाचा खरा विकास स्वयंरोजगारातून होतो. युवक व महिलांनी अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊन उद्योग उभारावेत आणि नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे बनावे,” असे प्रतिपादन अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांनी केले. अमृत बेकरी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी कोळेश्वर यांनी उपस्थितांना उद्योजकतेचे महत्त्व प्रभावी शब्दांत पटवून दिले. बेकरीसारखे लघुउद्योग ग्रामीण व शहरी भागात रोजगारनिर्मितीसाठी अत्यंत उपयुक्त असून, ते आर्थिक स्वावलंबनाचा मजबूत पाया घालतात, असेही त्यांनी नमूद केले.
३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी परशुराम सभागृहात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाने समाजातील युवक, महिला व उद्योजकतेकडे वाटचाल करू इच्छिणाऱ्यांना नवी दिशा दाखवली. अखिल भारतीय ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष किशोर मिश्रा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, अमृत संस्थेचे बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमानी, महेश्वरी समाजाचे अध्यक्ष महेशसिंग मोहता, अग्रवाल समाजाचे अध्यक्ष विजय केडिया, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी गणेश गुप्ता, अखिल भारतीय मारवाडी मंचाच्या अध्यक्षा सौ. उषा सावना आणि अमृत सखी प्रमुख सौ. अनिता शर्मा आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला विविध समाजांचे मान्यवर पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी व सामाजिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर कुशल मनुष्यबळ आणि रोजगारनिर्मिती होणार असून, समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळेल, असा विश्वास सर्व मान्यवरांनी व्यक्त केला. विविध समाजांच्या पदाधिकाऱ्यांची आणि समाजबांधव-भगिनींची एकत्रित उपस्थिती ही समाजातील एकता, सक्रियता व सकारात्मक सहभागाचे उत्कृष्ट उदाहरण ठरली. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
.....
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment