ब्राह्मण एकता संघ स्नेहसंमेलनात निर्धार; अमृत संस्थेच्या उपक्रमांचीही देण्यात आली माहिती
मुंबई : मुंबईतील ब्राह्मण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे पहिले स्नेहसंमेलन गिरगावमधील चित्तपावन ब्राह्मण संघात २८ डिसेंबर २५ रोजी पार पडले. मुंबई आणि आसपासच्या विभागातील अनेक ब्राह्मण संस्थांचे पदाधिकारी या स्नेहसंमेलनाला आवर्जून उपस्थित होते. संमेलनामध्ये प्रत्येक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या संस्थेतर्फे सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्याचबरोबर आगामी काळात मुंबईत एक ब्राह्मण महासंमेलन आयोजित करण्याविषयीदेखील चर्चा झाली. ज्ञातीच्या उन्नतीसाठी अनेक उपयुक्त उपक्रम आखावेत, असे सर्वानुमते ठरले.
महाराष्ट्र शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेचे अमित सामंत यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या लक्ष्यित गटात ब्राह्मण समाजाचाही समावेश होतो. ही संस्था लक्ष्यित गटाच्या प्रगतीसाठी प्रशिक्षणापासून अर्थसाह्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवते, अशी माहिती सामंत यांनी दिली. संस्थेने सुरू केलेल्या अमृतपेठ या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या साह्याने स्थानिक पातळीवर उत्पादनांना राज्य, देश आणि जागतिक पातळीवरील बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
IVY रिसर्च फाउंडेशन या संस्थेतर्फे प्रो. मधुरा नातू यांनी त्यांच्या भविष्यज्योती फ्री-शिप उपक्रमाची माहिती दिली. या विशेष स्नेहसंमेलनाला शेखर केतकर, डॉ. अभय जेरे व माधव घुले आदी मान्यवर वेळ काढून उपस्थित होते. चित्तपावन संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. प्रामुख्याने संस्थेचे ट्रस्टी विवेक छत्रे, कार्याध्यक्ष विनायक रानडे, कार्यवाह सुबोध नरवणे व सौ. अनघा बेडेकर यांनी संमेलनाचे उत्तम नियोजन केले. मनीषा बोडस, स्वरूप काळे, रेवती केतकर व नीलांबरी बर्वे या कार्यकर्त्यांनी यासाठी खूप मेहनत घेतली. गणेश आचवल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेवटी संस्थेचे अध्यक्ष महेश बापट यांनी सर्वांचे आभार मानून संमेलनाचा समारोप केला. एकंदरीतच, हे पहिले स्नेहसंमेलन यशस्वीरीत्या पार पडले.
.....
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment