मराठी रंगभूमीवरील नामवंत गायक नट छोटा गंधर्व यांचा ३१ डिसेंबर हा स्मृतिदिन. त्यांचा अल्प परिचय
आपल्या फिरत्या आवाजाने आणि मोहक तानांनी नाट्यरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे कलाकार म्हणजे छोटा गंधर्व. त्यांचे संपूर्ण नाव सौदागर नागनाथ गोरे. त्यांचा जन्म १० मार्च, १९१८ रोजी सातारा जिल्ह्यातील कोरेगावजवळच्या भाडळी या गावी झाला. त्यांचे औपचारिक शिक्षण फारसे झाले नाही. ‘बालमोहन संगीत मंडळी’ने रंगभूमीवर आणलेल्या प्राणप्रतिष्ठा या पहिल्याच नाटकात सौदागरांना त्यांची पहिली भूमिका मिळाली आणि तीही नायिकेची. सौदागरांच्या सुरेल आवाजाने आणि गाण्याच्या आकर्षक मांडणीने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या गंधर्वतुल्य आवाजामुळे दामूअण्णांनी आपल्या संस्थेतर्फे होणाऱ्या नाट्यप्रयोगांच्या जाहिरातींत सौदागरांचा उल्लेख ‘छोटा गंधर्व’ असा करण्यास सुरुवात केली आणि नंतर हेच नाव रूढ झाले. काही नामांकित गुरूंबरोबरच सवाई गंधर्वांचीही थोडीशी तालीम त्यांना मिळाली. १९३९ साली ग्वाल्हेर घराण्याचे गायक सेंदेखाँ यांच्याकडून सौदागर शिकू लागले.
काही वर्षे बालमोहन या संस्थेत काम केल्यानंतर ‘बालमोहन’मधल्या काही प्रमुख नटांनी १९४३ मध्ये ‘कला-विकास’ ही नवी संस्था काढली. त्यांच्यांत सौदागरही होते. कला-विकास कालांतराने बंद पडल्यानंतर ‘भारत नाट्यकला’ या संस्थेच्या सौभद्र (कृष्ण), विद्याहरण (कच), मानापमान (धैर्यधर) ह्या नाटकांतून त्यांनी नायकाच्या भूमिका केल्या. त्यांची कृष्णाची भूमिका सर्वाधिक लोकप्रिय ठरली. सौभद्र, विद्याहरण, मानापमान, मृच्छकटिक आणि संशयकल्लोळ या नाटकांतूनच त्यांनी पंचवीसहून अधिक वर्षे प्रमुख भूमिका केल्या.
सुरेल मुलायम आवाज, स्वच्छ दाणेदार ताना, सुंदर आणि स्पष्ट हरकती, मुरक्या, मिंड, सुरांचा प्रभावी लगाव, कमावलेला दमसास, मंद्रात खर्जापर्यंत जाणे ही त्यांच्या गायनाची प्रमुख वैशिष्ट्ये होती. त्यांच्या असामान्य गानकौशल्यामुळे ‘स्वरराज छोटा गंधर्व’ या नावाने ते प्रसिद्ध झाले.
अशा या थोर आणि हरहुन्नरी कलाकाराचे ३१ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले. या महान कलाकाराला शतश:नमन!!
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment