समर्थगडावरील भव्य स्वामी समर्थ मठ
आडवली, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग
"अशक्य ही शक्य करतील स्वामी" या श्रद्धेचा जिवंत अनुभव देणारे आणि कोकणातील स्वामीभक्तांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान म्हणून ओळखला जाणारा समर्थगडावरील श्री स्वामी समर्थ मठ हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आडवली येथे उभारलेला एक वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक परिसर आहे. भव्य तटबंदी, किल्ल्यासारखी रचना, निसर्गरम्य वातावरण आणि भक्तिमय वातावरण यांमुळे हा मठ आज भाविकांसह पर्यटकांनाही आकर्षित करतो.
दत्तसंप्रदायाला महाराष्ट्रात अत्यंत प्राचीन परंपरा लाभली आहे. पुराणे आणि उपनिषदांत वर्णिलेल्या दत्तात्रेयांना गुरुतत्त्वाचे मूर्त स्वरूप मानले जाते. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तांचे पहिले, नृसिंह सरस्वती हे दुसरे, तर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे तिसरे अवतार मानले जातात. पंधराव्या शतकानंतर नृसिंह सरस्वती यांच्या कार्यामुळे दत्तसंप्रदाय अधिक व्यापक झाला आणि पुढे स्वामी समर्थांच्या कार्यामुळे तो घराघरांत पोहोचला.
स्वामी समर्थांच्या पूर्वजीवनाविषयी ठोस ऐतिहासिक माहिती उपलब्ध नसली, तरी त्यांच्या जीवनाशी निगडित अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. श्री स्वामी चरित्र सारामृत आणि स्वामी लीलामृत या ग्रंथांमध्ये वर्णिल्यानुसार नृसिंह सरस्वती यांनी श्रीशैलच्या कर्दळीवनात तपश्चर्या केल्यानंतर स्वामी समर्थांच्या रूपाने पुनःप्रकट होऊन अखेरीस इ.स. १८५८ मध्ये अक्कलकोट येथे वास्तव्य केले. "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हा त्यांचा दिलासा देणारा संदेश आजही लाखो भक्तांच्या जीवनाला प्रेरणा देत आहे.
याच भक्तिभावातून आडवली येथील जगदीश सखाराम घाडीगावकर (भाई महाराज) यांच्या संकल्पनेतून तब्बल १८ एकर परिसरात समर्थगडाची निर्मिती करण्यात आली. २६ मार्च २०२० रोजी येथे श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली आणि तेव्हापासून हा परिसर वेगाने विकसित होत आहे.
समर्थगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची किल्ल्यासारखी रचना. अष्टकोनी तटबंदी, सुबक बुरूज, मावळ्यांचे पुतळे, भव्य प्रवेशद्वार, हत्तींची शिल्पे आणि तोफा यांमुळे येथे प्रवेश करताच शिवकालीन गडावर आल्याचा भास होतो. तटबंदीवरील मावळ्यांचे पुतळे संपूर्ण परिसराला ऐतिहासिक वैभवाची अनुभूती देतात.
मुख्य मंदिरही अष्टकोनी असून त्याच्या काचेच्या भिंती आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. मंदिराच्या मध्यभागी औदुंबर वृक्षाच्या पारावर विराजमान असलेली श्री स्वामी समर्थांची सुवर्णमूर्ती अत्यंत देखणी आहे. मूर्तीसमोर स्वामींची मुखमूर्ती असून भक्त शांतचित्ताने दर्शन घेतात. परिसरातील उंच दीपमाळ, विविध प्राण्यांचे आकर्षक शिल्पसमूह आणि देवीच्या मंदिरातील संत नामदेव, संत सावता माळी व संत गोरा कुंभार यांच्या मूर्ती या परिसराच्या सौंदर्यात भर घालतात.
प्रत्येक गुरुवारी येथे शेकडो स्वामीभक्त उपस्थित राहतात. सायंकाळी भजन, त्यानंतर महाआरती, भाई महाराज यांचा भक्तसंवाद आणि महाप्रसाद असा नियमित धार्मिक कार्यक्रम असतो.
समर्थगडात उभारलेल्या रंगमंचावर गुरुवारी रात्री दशावतार, दिंडी भजन, डबलबारी, कॅराओके तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे हा परिसर केवळ धार्मिक केंद्र न राहता सांस्कृतिक परंपरेचाही एक महत्त्वाचा वारसा जपणारे स्थळ ठरले आहे.
दत्तजयंती, स्वामी समर्थ जयंती तसेच दत्तसंप्रदायाशी संबंधित सर्व प्रमुख उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे वर्षभर या ठिकाणी भक्तांची वर्दळ कायम असते.
उपयुक्त माहिती स्थान : समर्थगड, आडवली, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग
मालवणपासून अंतर : ३२ कि.मी.
देवगडपासून अंतर : ४२ कि.मी.
मालवण व देवगड येथून एसटी बसची सुविधा उपलब्ध.
खासगी वाहनाने थेट मंदिरापर्यंत जाता येते.
दर्शन वेळ : सकाळी ९.०० ते दुपारी १.०० आणि सायंकाळी ४.०० ते रात्री ८.००.
- संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment