कोल्हापूरमधील आकर्षक आणि अनोखे समाधी मंदीर

पैजारवाडी (ता.पन्हाळा) (जि. कोल्हापूर) येथील एक प्रसिद्ध गाव आहे. हे गाव दत्त परंपरेतील थोर पुरुष परमपूज्य सदगुरु श्री चिले महाराज यांच्या कासवाच्या (कच्छ) आकारातील अद्वितीय समाधी मंदिरासाठी (कासव मंदिर) ओळखले जाते.

कोल्हापूरमधील आकर्षक आणि अनोखे समाधी मंदीर मुख्य फोटो
कोल्हापूरमधील आकर्षक आणि अनोखे समाधी मंदीर अतिरिक्त फोटो

अगदी अर्वाचीन काळात कोल्हापूर जवळच्या पैजारवाडी येथे एक अवतारी पुरुष होऊन गेले. त्यांचे नाव परब्रह्म सद्गुरु चिलेमहाराज असे होते. ते दत्तात्रेयांचे अवतार होते अशी श्रद्धा आहे. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२२ रोजी पन्हाळा किल्ल्याजवळील जेऊर या गावी झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव दत्तात्रय बाबा चिले आणि आईचे नाव मंजाबाई असे होते. कोल्हापूर-मलकापूर-रत्नागिरी रस्त्यावर बांबवडे गावाजवळ कोल्हापूरपासून २५ कि.मी.वर पैजारवाडी हे गाव आहे. जन्मल्याबरोबर काही काळाने त्यांचे मातृछत्र हरपले. ते मॅट्रीकल होते. तेव्हा त्यांचे वडील निवर्तले. कोल्हापूरमधील पंचगंगा नदीच्या घाटावर एका तीरावर सिद्धेश्वर समाधी आणि दुसऱ्या तीरावर पाटील बाबांची समाधी आहे.

या पाटीलबाबांच्या समाधीजवळ ते २५ दिवस अनुष्ठान आणि साधना करीत बसले होते. त्यानंतर त्यांचे संपूर्ण जीवन बदलले. त्यांच्या जीवनकाळामध्ये त्यांनी असंख्य लीला आणि चमत्कार केले. समोरच्या व्यक्तीच्या मनातील भाव त्यांना लगेच ओळखून येत असत. त्यांचे शंकर महाराजांशी सख्य होते. जणू शंकर महाराजांचा ते अवतार होते. शंकरमहाराजांप्रमाणे त्यांचा अवतार रुद्रावतार होता.

अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थांप्रमाणे ते काहीवेळा अत्यंत अपशब्द बोलत असत, पण त्यांचा उद्देश भक्तांचे पाप जाळणे हाच असे. त्यांच्या लीला विलक्षण होत्या. ते नित्य निसर्गातील सूक्ष्म गोष्टींबरोबर बोलत असत. त्यांनी सांगितलेली अनेक भाकिते सत्य झाली आहेत. त्यांच्या भक्तांना त्यांनी अनेक संकटातून सोडविले आहे; अगदी मरण पावलेल्या व्यक्तींनाही त्यांनी जिवंत केले आहे. ते नेहमी 'मी दत्त आहे' असे म्हणत असत. त्यांच्या भक्तांना त्यांनी दत्त स्वरूपात, विष्णू स्वरूपात आणि पांडुरंग रूपात दर्शन दिले आहे. त्यांचा पेहराव अतिशय साधा म्हणजे पांढरा शर्ट आणि विजार असा आहे. ते अनवाणी चालत असत. त्यांचा सतत संचार सुरू असे. प्रसंगी ते ३० ते ४० कि.मी. चालत जात असत. सर्व जाती-धर्माचे लोक त्यांचे भक्त आणि शिष्य होते. त्यांच्या भक्तांची त्यांनी कठोर परीक्षा घेतली आहे. शंकर महाराजांच्या रूपात त्यांनी भक्तांना दर्शन दिले आहे.


पैजारवाडी येथील त्यांच्या समाधीजवळ आता कासवाकृतीचे भव्य मंदिर उभे राहिले आहे. तेथे अत्यंत दिव्य वातावरण आहे. तेथे गेल्यावर विलक्षण अनुभूती येतात. त्यांना संगीत आणि भजन प्रिय होते. त्यांनी सांगितलेल्या आज्ञा पाळल्यावर भक्तांना विलक्षण अनुभूती येत असत. ‘ॐ दत्त चिले’ असा त्यांचा तारक मंत्र आहे. समाजातील गोरगरिब, श्रीमंत सर्व प्रकारचे भक्त त्यांच्याकडे येत असत. चिले महाराजांचा अवतार एक विलक्षण अवतार आहे. सर्वसामान्यांच्या आकलन शक्तीच्या पलीकडे त्यांचे कार्य आहे. आजही श्रद्धाळू भक्तांना त्याची अनुभूती येते. त्यांचे जीवनकार्य पाहिल्यावर श्रीदत्तात्रेयांच्या सोळा अवतारांपैकी “लीला विश्वंभर” या सहाव्या आणि “माया मुक्तावधूत” या दहाव्या आणि अकराव्या अवतारातील वर्णनाप्रमाणे त्यांचे कार्य होते, याची खात्री पटते.

श्री चिले महाराज समाधी मंदिर, पैजारवाडी


त्यांच्या बाह्य आचरणावरून त्यांच्या अधिकाराची कल्पना कोणी करू शकणार नाही. पण जर निष्ठा ठेवून श्रद्धेने त्यांची सेवा केली, तर मात्र प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या आचरणाबद्दल, आहार-विहाराबद्दल कितीही तर्क-वितर्क केले, तरी ते दत्तात्रेयांचे अवतार होते याची खात्री पटते.

पूर्ण ब्रह्मज्ञानी अवतारी पुरुष चारही आश्रमांच्या पलीकडे, म्हणजे ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी या आश्रमांपलीकडे असतात असे सांगितले जाते; त्याला 'अत्याश्रमी' असे म्हटले आहे. चिलेमहाराज अत्याश्रमी अवताराचे उदाहरण आहेत. त्यांना कोणत्याही आश्रमाचे नियम लागू होत नसत. त्यांच्या सर्व कृतींमध्ये गूढ अर्थ भरलेला होता. त्यांचे जीवनकार्य, लीला आणि चमत्कार त्यांच्या अवतारीत्वाचे साक्षी आहेत. त्यांचे निर्वाण ७ मे १९८६ रोजी पुणे येथे झाले. पण तरीही आजही हजारो भक्तांना त्यांच्या कृपेची प्रचिती येत आहे.

-संकलित

Publisher: Abhijeet Kulkarni News publisher name | Date: 19-08-2026 News publication date | Time: 03:32 PM News publication time | Views: 32 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news
Publisher: Abhijeet Kulkarni News publisher name | Date: 19-08-2026 News publication date | Time: 03:32 PM News publication time | Views: 32 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement