आज अखंड भारत आणि विभाजन विभीषिका स्मृती दिन आहे, अखंड भारताच्या संकल्पाची आठवण आणि फाळणीच्या शोकांतिकांची वेदना या दोन्ही आठविण्याचा हा दिवस-
भारत... प्राचीन आणि विविधतेने नटलेल्या या देशात वेगवेगळ्या संस्कृती आणि धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात. सध्या आपण जो भारत बघतो, तो प्राचिन काळी वेगळाच होता. हा एक विशाल देश होता. इराणपासून इंडोनेशियापर्यंत भारताचा विस्तार होता. हिंदू धर्माचा तेव्हाच्या जागतिक राजकारणात दबदबा होता. पण, काळाच्या ओघात भारताची कशी फाळणी होत गेली ते आपण पाहूया.
पूर्वी अखंड भारत हिमालयापासून हिंदी महासागरापर्यंत आणि इराणपासून इंडोनेशियापर्यंत विस्तारलेला होता. सन १८५७ मध्ये भारताचे क्षेत्रफळ ८३ लाख चौरस किलोमीटर होते आणि सध्या ३३ लाख चौरस किमी आहे. वर्ष १८५७ ते १९४७ या कालावधीत भारताचे बाह्य शक्तींनी अनेक वेळा तुकडे केले.
पूर्वीच्या भारतापासून विभक्त झालेले भाग:
१) श्रीलंका: ब्रिटीशांनी सन १९३५ मध्ये श्रीलंका भारतापासून वेगळी केली. श्रीलंकेचे पूर्वीचे नाव सिंहलद्वीप होते. सिंहलद्वीप हे नाव नंतर सिलोन असे झाले. सम्राट अशोकाच्या काळात श्रीलंकेचे नाव ताम्रपर्णी होते. सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी श्रीलंकेत गेले होते. श्रीलंका हा अखंड भारताचा एक भाग होता.
२) अफगाणिस्तान: अफगाणिस्तानचे प्राचीन नाव उपगणस्थान होते आणि कंधारचे नाव गांधार होते. अफगाणिस्तान हा एक शैव देश होता.महाभारतात वर्णन केलेले गांधार हे अफगाणिस्तानात आहे. कौरवांची आई गांधारी आणि मामा शकुनी यांचा जन्म येथेच झाला होता. कंधारचे वर्णन (म्हणजे गांधार) शहाजहानच्या कारकिर्दीपर्यंत सापडते. तो भारताचा एक भाग होता. सन १८७६ मध्ये रशिया आणि ब्रिटनमध्ये एक करार झाला. करारानंतर, अफगाणिस्तान एक स्वतंत्र देश म्हणून स्वीकारला गेला.
३) म्यानमार (बर्मा): म्यानमारचे (बर्मा) प्राचीन नाव ब्रह्मदेश होते. सन १९३७ मध्ये म्यानमार म्हणजेच बर्माला स्वतंत्र देशाची मान्यता ब्रिटिशांनी दिली. प्राचीन काळी हिंदू राजा आनंदवर्ताने येथे राज्य केले होते.
४) नेपाळ: नेपाळ प्राचीन काळात देवघर म्हणून ओळखले जात असे. भगवान बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला आणि आई सीतेचा जन्म जनकपूर येथे झाला जो आज नेपाळमध्ये आहे. सन १९०४ मध्ये ब्रिटिशांनी नेपाळला एक स्वतंत्र देश बनवले. काही वर्षांपूर्वीपर्यंत नेपाळच्या राजाला नेपाळ नरेश म्हटले जात असे. सम्राट अशोक आणि समुद्रगुप्त यांच्या काळात नेपाळ हा भारताचा अविभाज्य भाग होता. सन १९५१ मधे नेपाळचे महाराजा त्रिभुवन सिंह यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना नेपाळचे भारतात विलीनीकरण करण्याचे आवाहन केले पण जवाहरलाल नेहरूंनी हा प्रस्ताव नाकारला.
५) थायलंड: थायलंडला सन १३९३ पर्यंत स्याम/सयाम म्हणून ओळखले जात होते. अयोध्या, श्री विजय इत्यादी प्रमुख शहरे होती. स्याममधील बौद्ध मंदिरांचे बांधकाम तिसऱ्या शतकात सुरू झाले. आजही या देशात अनेक शिवमंदिरे आहेत. थायलंडची राजधानी बँकॉक मधे शेकडो हिंदू मंदिरे आहेत.
६) कंबोडिया: कंबोडिया संस्कृत नाव कंबोज पासून आले आहे, हा अखंड भारताचा भाग होता. भारतीय वंशाच्या कौंडिन्य राजवंशाने पहिल्या शतकापासूनच येथे राज्य केले. येथील लोक शिव, विष्णू आणि बुद्ध यांची पूजा करायचे. राष्ट्रभाषा संस्कृत होती. कंबोडियामध्ये आजही चेत्र, वैशाख, आषाढ या भारतीय महिन्यांची नावे वापरली जातात. जगप्रसिद्ध अंकोरवट मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे, हे हिंदू राजा सूर्यदेव वर्मन यांनी बांधले होते. मंदिराच्या भिंतींवर रामायण आणि महाभारताशी संबंधित चित्रे आहेत. अंकोरवटचे प्राचीन नाव यशोधरपूर आहे.
७) व्हिएतनाम: व्हिएतनामचे प्राचीन नाव चंपादेश आहे आणि त्याची प्रमुख शहरे इंद्रपूर, अमरावती आणि विजय होती. अनेक शिव, लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती मंदिरे आजही इथे सापडतील. येथे शिवलिंगाचीही पूजा करण्यात यायची. लोकांना चाम असे म्हटले गेले जे मूळ शैव होते.
८) मलेशिया: मलेशियाचे प्राचीन नाव मलय देश होते.हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ पर्वतांची जमीन आहे. मलेशियाचे वर्णन रामायण आणि रघुवंशम मधे देखील आहेत. मलय देशात शैव धर्म पाळला जात होता. देवी दुर्गा आणि गणपतीची पूजा करण्यात यायची. येथील मुख्य लिपी ब्राह्मी होती आणि संस्कृत ही मुख्य भाषा होती.
९) इंडोनेशिया: इंडोनेशियाचे प्राचीन नाव दीपंतर भारत आहे ज्याचा उल्लेख पुराणांमध्ये देखील आहे. दीपंतर भारत म्हणजे संपूर्ण भारतीय भुमी नंतरचा समुद्राच्या नंतरचा प्रदेश . तेथे हिंदू राजांचे राज्य होते सर्वात मोठे शिव मंदिर जावा बेटावर होते. सर्वच मंदिरात प्रामुख्याने भगवान राम आणि भगवान श्रीकृष्ण यांची शिल्पे कोरलेली आढळतात. संस्कृतचे ५२५ श्लोक असलेले भुवनकोश हे सर्वात जुने पुस्तक आहे. इंडोनेशियाच्या अग्रगण्य संस्थांची नावे किंवा मोटो अजूनही संस्कृतमध्ये आहेत.
इंडोनेशियन पोलीस अकादमी - धर्म बिजाक्षणा क्षत्रिय
इंडोनेशिया राष्ट्रीय सशस्त्र दल - त्रिधर्म एक कर्म
इंडोनेशिया एअरलाइन्स - गरुड एअरलाइन्स
इंडोनेशिया गृह मंत्रालय - चरक भुवन
इंडोनेशिया वित्त मंत्रालय - नगर धन रक्षा
इंडोनेशिया सर्वोच्च न्यायालय - धर्मायुक्ती
१०) तिबेट: तिबेटचे प्राचीन नाव "त्रिविष्ठम" होते आणी ते दोन भागांमध्ये विभागले गेले होते. सन १९०७ मध्ये चिनी आणि ब्रिटिश यांच्यात झालेल्या करारानंतर एक भाग चीनला आणि दुसरा भाग लामाला देण्यात आला. पुढे चिनी राजवटीने तो भाग सुद्धा बळजबरीने ताब्यात घेतला.
११) भूतान: सन १९०६ मध्ये ब्रिटिशांनी भूतानला भारतापासून वेगळे केले आणि एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली.भूतान हा संस्कृत शब्द भू-उत्थान या शब्दापासून बनला आहे ज्याचा अर्थ उंच जमीन आहे.
१२) पाकिस्तान: १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारताची फाळणी झाली आणि पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान म्हणून पाकिस्तान अस्तित्वात आला. मोहम्मद अली जिना सन १९४० पासून धर्माच्या आधारावर वेगळ्या देशाची मागणी करत होते जे नंतर पाकिस्तान बनले.
सन १९७१ मध्ये भारताच्या सहकार्याने पाकिस्तानचे पुन्हा विभाजन झाले आणि बांगलादेश अस्तित्वात आला.
अशाप्रकारे भारताचे अनेक तुकडे पाडण्यात आले.
१४ ऑगस्ट रोजी ज्याप्रमाणे अखंड भारत संकल्प दिन साजरा केला जातो,त्याचप्रमाणे भारताच्या फाळणीची शोकांतिकाही आजच्याच दिवशी घडली होती. यासाठीच १४ ऑगस्ट रोजी 'विभाजन विभीषिका दिनही असतो.याच दिवशी इतिहासात एक भीषण फाळणी झाली होती.
एका बाजूला स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होत असताना, दुसऱ्या बाजूला लाखो कुटुंबे आपल्या जन्मभूमीपासून, घरादारापासून उध्वस्त होत होती. या ऐतिहासिक शोकांतिकेलाच 'विभाजन विभीषिका' म्हणून ओळखले जाते.
१. विस्थापनाचा अथांग सागर आणि हिंसाचार भारताच्या फाळणीमुळे मानवी इतिहासातील सर्वात मोठे विस्थापन घडून आले. एका रात्रीत लाखो लोक परके झाले.
२. कोट्यवधींचे विस्थापन: जवळपास १ ते १.५ कोटी लोकांना आपली पिढ्यानपिढ्यांची घरे, जमीन आणि आठवणी सोडून सीमा पार करावी लागली.
३. अमानुष हिंसाचार: धार्मिक उन्माद आणि द्वेषाच्या भावनेतून झालेल्या हिंसाचारात ५ ते १० लाखांहून अधिक निष्पाप लोकांनी आपले प्राण गमावले. आगीच्या ज्वाळा आणि मृत्यूच्या गाड्या: सीमेच्या दोन्ही बाजूंना जिकडे तिकडे दंगली, लुटालूट आणि आगीचे तांडव सुरू होते. निर्वासितांनी भरलेल्या गाड्यांच्या गाड्या रक्ताने माखलेल्या अवस्थेत स्टेशनवर पोहोचत होत्या.
४. महिला आणि मुलांची असीम वेदना या विभीषिकेचा सर्वात मोठा फटका महिला आणि लहान मुलांना बसला. हजारो महिलांवर अत्याचार झाले, त्यांचे अपहरण करण्यात आले किंवा त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले. अनेक कुटुंबांची कायमची ताटातूट झाली. चिमुकल्या मुलांनी आपल्या डोळ्यांसमोर आई-वडील आणि घराची राखरांगोळी होताना पाहिली. निर्वासितांच्या छावण्यांमध्ये (Refugee Camps) वैद्यकीय सुविधा आणि अन्नाचा अभाव असल्यामुळे हजारो बालके रोगास बळी पडली.
५. 'विभाजन विभीषिका स्मृती दिन' (१४ ऑगस्ट) फाळणीच्या या दुःखाची आणि निष्पाप बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी भारत सरकारने १४ ऑगस्ट हा दिवस 'विभाजन विभीषिका स्मृती दिन' (Partition Horrors Remembrance Day) म्हणून घोषित केला आहे. या दिवसाचा मुख्य उद्देश: फाळणीच्या हिंसाचारात प्राण गमावलेल्या निष्पाप आत्म्यांना श्रद्धांजली अर्पण करणे.
या मानवी शोकांतिकेत विस्थापित झालेल्या लोकांच्या संघर्षाचा आणि धैर्याचा आदर करणे. देशातील सामाजिक सलोखा, बंधुता आणि ऐक्य टिकवून ठेवण्याची शपथ घेणे. निष्कर्ष विभाजन विभीषिका हा केवळ इतिहासातील भूगोलाच्या सीमांचा बदल नव्हता, तर तो मानवी भावना, नाती आणि मूल्यांचा झालेला संहार होता. हा इतिहास आपल्याला हेच शिकवतो की, द्वेष आणि धार्मिक कट्टरता ही नेहमी विनाशाकडे घेऊन जाते. आजच्या आधुनिक भारतात शांतता, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मता जपून ठेवणे हीच या विभीषिकेतील पीडितांना दिलेली खरी आणि सच्ची श्रद्धांजली ठरेल.
चला भारताला पुन्हा एकदा अखंड भारत करण्याचा संकल्प करूया. भारत खऱ्या अर्थाने समृद्ध करूया. -संकलित
टीप- नांदेड, नागपूर,गडचिरोली आणि वाशीम जिल्ह्यातून आलेली माहिती आणि इतर संकलित माहिती,या आधारे लेख तयार केलेला आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment