११ ऑगस्ट १९०८ ची सकाळ ही सामान्य सकाळ नव्हती. त्या दिवशी एका महान क्रांतिकारकाला फाशी देण्यात येणार होती. त्यांच्या बलिदानाने भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस सारख्या क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. त्यांच्या हौतात्म्याने केवळ बंगालमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतातील स्वातंत्र्यलढ्याला एक नवीन दिशा दिली. याच थोर क्रांतिकारकाच्या स्मृतीदिनानिमित्त त्याच्या थोर कार्यास त्रिवार वंदन!
भारतातील पहिल्या बॉम्बचा यशस्वीरीत्या प्रयोग करणारे पहिले क्रांतिकारक म्हणजे खुदिराम बोस. खुदिराम बोस यांचा जन्म ३ डिसेंबर १८८९ रोजी बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील बहुवैनी गावी झाला. त्र्यलोक्यनाथ बोस हे त्यांचे वडील होते. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीप्रियादेवी होते. खुदिराम यांना एक मोठी बहीण होती, तिचे नाव अपरूपा होते. खुदिराम १० वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील निजधामास गेले. यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या बहिणीने केला. पुढील शिक्षणासाठी खुदिराम मिदनापूर येथे आले. जसे जसे वय वाढत होते, तशी तशी क्रांतिकार्याची ओढ खुदिराम यांना लागत गेली.
मिदनापूर येथे “युगांतर” या क्रांतिकारक गुप्त संस्थेचे ज्ञानेन्द्रनाथ बोस यांनी त्यांना क्रांतीमध्ये येण्यास सांगितले. सन १९०५ मध्ये ब्रिटिश व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन याने बंगालच्या फाळणीला मान्यता दिली आहे अशी घोषणा केली. या निर्णयामुळे बरेच बंगाली तरुण त्वेषाने पेटून उठले. या फाळणीचा विरोध सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बिपिनचंद्र पाल आणि लोकमान्य टिळक या सर्वांनी केला.
यानंतर मिदनापूर येथे १९०६ साली स्वदेशी आंदोलनाच्या वेळी एक शेतकरी प्रदर्शन भरले होते, त्यावेळी खुदिराम आणि सत्येंद्रनाथ बोस यांनी पत्रके वाटली. सत्येंद्रनाथ यांच्याकडे युगांतर मिदनापूरचे नेतृत्व होते. यावेळी पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये कसाबसा प्रयत्न करून खुदिराम यांनी तिथून पळ काढला; त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी जंग्ज-पंगत पछाडले होते. यामुळे त्यांना आपले घरदार सोडावे लागले आणि ते एका विणकाम शाळेच्या वस्तीगृहामध्ये राहू लागले. पोलिसांना याचा सुगावा लागताच त्यांनी एक दिवस अचानक छापा घातला आणि खुदिराम यांना अटक केली. एप्रिल १९०६ मध्ये खुदिराम यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला. हा खटला मिदनापूर येथील सेशन कोर्टात चालला. यातून १६ मे १९०६ रोजी खुदिराम बोस निर्दोष सुटले.
बंगालच्या फाळणी विरोधी आंदोलनात बऱ्याच क्रांतिकारकांना क्रूर शिक्षा ठोठावण्यात आल्या. या शिक्षा देणाऱ्यांमध्ये कलकत्त्याचे चीफ मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड हा अग्रेसर होता. याच चीफ मॅजिस्ट्रेटने नंतर युगांतर, नवशक्ती, संध्या, वसुमती यांच्या संपादकांना कठोर शिक्षा दिल्या. याबद्दल ब्रिटिश सरकारने किंग्जफोर्डची मुजफ्फरपूरला जज म्हणून बदली केली. आता क्रांतिकारकांचा निर्णय झाला होता; बैठकीत किंग्जफोर्डला यमसदनी धडण्याचा निर्णय झाला होता. यानंतर खुदिराम कोलकाता येथे येऊ लागले, तिथे ते त्यांचे मामा सतीशचंद्र दत्त यांच्याकडे कॉर्पोरेशन ४/५ स्ट्रीट येथे राहत असत. याच दरम्यान युगांतरच्या कलकत्त्यातील कार्यालयात गेले, त्यावेळी त्यांना किंग्जफोर्डबद्दलचा बेत समजला. याच वेळी त्यांची आणि प्रफुल्लकुमार चाकी यांची भेट झाली.
पुढचा बेत आखण्यासाठी सगळे क्रांतिकारी एकत्र जमलेल्या गुप्त बैठकीत किंग्जफोर्डला मारण्याची जबाबदारी कोण घेणार, याचा निर्णय होणार होता. त्यासाठी सगळ्यांच्या नावाच्या चिठ्या टाकण्यात आल्या. यात पहिले नाव होते प्रफुल्लकुमार चाकी आणि नरेंद्र गोस्वामी. पण अचानक नरेंद्र गोस्वामी यांनी हे काम करण्यास नकार दिला. त्यांच्या जागी मग खुदिराम बोस यांची निवड करण्यात आली. २३ एप्रिल १९०८ रोजी दोघेही मुजफ्फरपूरला येण्यासाठी निघाले.
किंग्जफोर्डला मारण्यासाठी बॉम्बचा वापर होणार होता, पण भारतात बॉम्ब बनवण्याची कृती उपलब्ध नव्हती. यासाठी लंडनहून हेमचंद्र दास हे बॉम्ब बनवण्याची कृती घेऊन सेनापती बापट यांच्या सांगण्यावरून भारतात आले. सेनापती बापट यांनी एका रशियन मुलीच्या मदतीने भाषांतर करून ही माहिती मिळवली होती आणि यामागची प्रेरणा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होते. खुदिराम यांच्याजवळ असणारा बॉम्ब हा आता याच कृतीवरून बनवलेला होता.
२४ एप्रिल रोजी खुदिराम आणि प्रफुल्लकुमार मुजफ्फरपूर येथे पोहोचले. यानंतर किंग्जफोर्डच्या संपूर्ण हालचालींची रेकी करण्यात आली. ३० एप्रिल रोजी दोघेही कामगिरीवर निघाले. थोड्याच वेळात ते किंग्जफोर्डच्या बंगल्यासमोर येऊन उभे राहिले. रात्री साडेआठच्या सुमारास खुदिराम बॉम्ब घेऊन किंग्जफोर्डच्या गाडीचे घोडे आणि समोरून येणाऱ्या गाडीचे घोडे यांच्यात साम्य दिसल्यावर त्या गाडीच्या दिशेने धावत सुटले. त्यांच्या पाठोपाठ प्रफुल्लकुमार निघाले. त्या वेळी अंधार असल्यामुळे गाडीच्या आतील बाजूस कोण आहे, हे खुदिराम यांना समजू शकले नाही. खुदिराम यांनी नेम धरून त्या गाडीवर तो बॉम्ब फेकला आणि स्फोट होऊन प्रचंड आवाज झाला. भारतातील पहिला श्रीगणेशा मुजफ्फरपूरमध्ये झाला होता. पण स्फोट झालेल्या गाडीत किंग्जफोर्ड नव्हता. यात स्त्रिया आणि दोन युरोपियन लोकांचा जीव गेला.
यानंतर खुदिराम बोस यांना अटक झाली आणि त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. या खटल्यांतर्गत ११ ऑगस्ट १९०८ या दिवशी खुदिराम यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि भारतमातेसाठी अवघा १९ वर्षांचा तरुण हसत हसत फासावर गेला. त्यावेळी त्यांच्या या महान कार्याचे फार परिणाम झाले नसले तरी, देशकार्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देण्याची राष्ट्रप्रेरणा यातून त्याकाळच्या युवकांना नक्कीच मिळाली. हळूहळू तरुण भारतीय जागे होऊ लागले. पुढे या छोट्याशा ठिणगीने मोठे स्वरूप धारण केले. खुदिराम बोस यांना शतशः नमन!!
संदर्भ - वर्डप्रेस साईट
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment