गजानन केतकर हिंदुत्ववादी होते. त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा या दोन्ही संघटनांशी संबंध होता. व्यक्तिशः गोळवलकर गुरुजी आणि वि.दा. सावरकर यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते.त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनप्रवासाचा हा आढावा-
गजानन केतकर हे लोकमान्य टिळकांचे नातू. जन्म. त्यांचा जन्म १० ऑगस्ट १८९८ रोजी झाला. लोकमान्य टिळकांची मुलगी सौ. पार्वतीबाई केतकर यांचे ते चिरंजीव होते. .त्यांची बालपणाची वर्षे व तरुणपणाची काही वर्षे टिळकांच्या देखरेखीखाली गेली.
लोकमान्य टिळकांच्या सल्ल्यानुसार कायद्याची परीक्षा (बी.ए. एल्एल.बी) देऊन ते "केसरी' वर्तमानपत्रात दाखल झाले. गांधी हत्येनंतर सावरकर-गोडसे प्रभृतींवर खटला भरण्यात आला आणि संघावर बंदी आली.
केतकरांनी या दोन्ही प्रसंगी हिंदुत्ववादी विचारांची व व्यक्तींची पाठराखण केली. संघावरील बंदी उठवण्यासाठी वल्लभभाई पटेल व गोळवलकर गुरुजी यांच्यात यशस्वी शिष्टाई केली.
ग.वि.केतकर हे काही काळ मराठा या इंग्रजी वर्तमानपत्राचेही संपादक होते. केतकरांनी हिंदू धर्मावर निष्ठा असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील ब्रिटिश महिलेशी, तिला हिंदू करून घेऊन प्रेमविवाह केला, तेव्हा केसरीमधील हिंदुत्ववाद्यांनी त्यांना माफ केले नाही. अमलाबाईंशी विवाह केल्याबद्दल त्यांना ’केसरी'चे संपादकपद सोडावे लागले.
तरुण भारत हे दैनिक मुळात साप्ताहिक स्वरूपात २० जानेवारी १९२६ रोजी नागपूर येथे सुरू झाले. २० जानेवारी १९५७ पासून तरुण भारतची पुणे आवृत्ती प्रकाशित होऊ लागली. या आवृत्तीच्या संपादकपदी गजानन विश्वनाथ केतकर यांची नियुक्ती करण्यात आली.
त्यांनी ही संपादकत्वाची धुरा, सुमारे सात वर्षे म्हणजे १९६४ पर्यंत आपल्या खांद्यावर वाहिली. पण गांधीहत्येच्या संदर्भात केतकरांनी केलेल्या काही विधानांमुळे त्यांच्यावर सरकारी रोष ओढवला. त्यामुळे त्यांनी 'तरुण भारत’चे संपादकपद सोडले.
पुण्यातील सरस्वती मंदिर या संस्थेची स्थापना ग. वि. केतकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ३१ जुलै १९१९ रोजी झाली. १९२० मध्ये पुण्यात शिक्षण संस्था अगदी मोजक्या होत्या आणि रात्रशाळा ही संकल्पना फारशी माहिती नव्हती. संस्थेचे संस्थापक ग. वि. केतकर आणि त्यांचे सहकारी मराठीतला पहिला ज्ञानकोश तयार करण्याचं काम करत होते त्या वेळची ही गोष्ट आहे.
ज्ञानकोशाची छपाई करणाऱ्या छापखान्यात छपाईसाठी खिळे जुळवण्याचं काम करणारे कारागीर अशिक्षित होते. त्यांना 'जुळारी' असं म्हणत. त्या जुळाऱ्यांनी केतकरांना विचारलं, आमच्या हातून ज्ञानकोशाचं काम होतं आहे, पण आम्हाला शिक्षण नाही, त्याचं काय?
त्या वेळी दिवसा काम करून उदरनिर्वाह चालवणाऱ्या कारागिरांसाठी रात्रशाळा सुरू करण्याची कल्पना केतकर यांच्या लक्षात आली. ज्ञानकोश निर्मितीतील सहभागी ग. वि. केतकर, चिं. ग. कर्वे आणि ग. ना. टिळक यांच्या योगदानातून पूना नाईट स्कूल सुरू झालं.
पुण्यात १९२४ मध्ये स्थापन झालेल्या गीताधर्म मंडळाचे सदाशिवशास्त्री भिडे हे संस्थापक अध्यक्ष होते. तर संस्थापक कार्यवाह ग.वि. केतकर होते. केतकर हे स्वतः भगवद्गीतेचे अभ्यासक आणि उपासक होते. त्यांनी श्रीमद्भगवद्गीता - या एकाच विषयावर, जास्तीत जास्त वृत्तपत्रीय लेखन केले. असे म्हणतात की भारतीय भाषांमध्ये, गीता या विषयांवर इतके विपुल लेखन अन्य कोणी केले नसावे.
ग.वि. केतकर यांनी अनेक वृत्तपत्रांतून, भगवद्गीतेविषयक लेखन करून, गीताधर्म मंडळाच्या स्वीकृत कार्याचा उदंड प्रचार केला. त्यांनी विविध विद्यालयांतून गीता पाठांतराच्या स्पर्धा आयोजित केल्या. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा दिवस गीताजयंती म्हणून साजरा केला जावा, यासाठी ग.वि. केतकर यांनी प्रचंड पत्रव्यवहार केला. आता हा दिवस गीताजयंती म्हणून, भारतात सर्वत्र साजरा केला जातो.
मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष सदाशिवशास्त्री भिडे यांचे अकाली निधन झाल्या नंतर केतकरांनी गीताधर्म मंडळाचे काम १९५८ पर्यंत सांभाळले.गजानन केतकर यांचे १५ जुलै १९८० रोजी निधन झाले. -संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment