आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य जणांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता लढा दिला, आंदोलने केली, इंग्रजांचा अत्याचार सहन केला. त्यातीलच एक म्हणजे शिरीषकुमार. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी हा क्रांतिकारक हुतात्मा झाला. २८ डिसेंबर हा शिरीषकुमारचा जन्मदिन. त्या निमित्ताने त्याच्या आत्मबलिदानाचे हे स्मरण...
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने भाग घेतला होता. अशाच एका क्रांतिकारकाने भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली. त्याचे नाव शिरीषकुमार मेहता. त्याचा जन्म २८ डिसेंबर १९२६ रोजी नंदुरबारमध्ये झाला. शिरीषकुमारचे आई-वडील दोघेही भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी होते. त्यामुळे देशप्रेमाचे वातावरण असलेल्या घरात शिरीषकुमार लहानाचा मोठा होत होता.
महात्मा गांधींनी नऊ ऑगस्ट १९४२ रोजी इंग्रजांविरुद्ध ‘चले जाव’ चळवळ सुरू केली. त्यानंतर गावोगावी प्रभातफेर्या काढून ब्रिटिशांना इशारे दिले जाऊ लागले. बरोबर महिनाभरानंतर, नऊ सप्टेंबर १९४२ रोजी नंदुरबारमध्ये निघालेल्या प्रभातफेरीत आठवीत शिकत असलेला शिरीषकुमार सहभागी झाला होता. भारतमातेचा जयघोष करत गावातून प्रभातफेरी फिरत होती. मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली. शिरीषकुमार यांच्या हातात झेंडा होता. पोलिसांनी ही मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले; मात्र शिरीषकुमार आणि त्याच्या जोडीदारांनी हे आवाहन झुगारून लावले. अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. एका पोलीस अधिकार्याने मिरवणुकीत सहभागी झालेल्या मुलांच्या दिशेने बंदूक रोखली. तेव्हा शिरीषकुमारने ‘गोळी मारायची तर मला मार!’ असे ठामपणे सांगितले. संतापलेल्या पोलीस अधिकार्याच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळ्यांनी तो जागीच कोसळला. त्याच्यासोबत या गोळीबारात लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशिधर केतकर, घनःश्यामदास शहा हे अन्य चौघेही हुतात्मा झाले. अशा या महान हुतात्म्यांना शतश: नमन!
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment