विक्रीवाढ, नेटवर्किंग आणि बाजारपेठेच्या नवीन संधी उपलब्ध
नागपूर : ग्रामीण व कुटीरोद्योगांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सातव्या ग्रामीण उद्यम एक्स्पोमध्ये (२०२५) अमृत या शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या योजनांच्या लाभार्थ्यांचा सक्रिय सहभाग पाहायला मिळत आहे. 'उद्योजक बनें – आत्मनिर्भरता की ओर बढ़ें' आणि 'लोकल ते ग्लोबल' या संकल्पनेवर आधारित हा भव्य उपक्रम नागपुरातील धरमपेठेतील कुसुमताई वानखेडे हॉलमध्ये २६ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत होत आहे.
या प्रदर्शनात लघुउद्योजक, ग्रामीण व कुटीरोद्योग, महिला उद्योजक, स्टार्टअप्स, एमएसएमई, अन्नप्रक्रिया व हस्तकला उत्पादक सहभागी झाले असून, बिझनेस टू बिझनेस (B2B) आणि बिझनेस टू कंझ्युमर (B2C) या दोन्ही माध्यमातून थेट खरेदी-विक्रीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निमित्ताने अमृत संस्थेच्या योजनांच्या लाभार्थ्यांनी आपली उत्पादने प्रदर्शनात मांडून बाजारपेठेतील विक्रेते, ग्राहक व उद्योजकांशी थेट संवाद साधला.
प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी नागपूरच्या माजी महापौर श्रीमती कुंताताई विजयकर, प्रसिद्ध उद्योजक सुरेश राठी, महाराष्ट्र उद्यमिता मिशनचे उपाध्यक्ष लेफ्टनंट कर्नल योगेश भावसार, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (नागपूर) सौ. हेमादेवी देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या एक्स्पोचे आयोजन ग्रामीण प्रतिष्ठान, ताळापूर, व्हीआयए अॅग्रो रूरल डेव्हलपमेंट अँड फूड प्रोसेसिंग फोरम आणि सॅटर्डे क्लब-विदर्भ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने भेट देणाऱ्या नागरिकांमुळे स्थानिक उत्पादकांना विक्रीवाढ, नेटवर्किंग आणि बाजारपेठेच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत.
अमृत संस्थेच्या योजनांच्या लाभार्थ्यांसाठी असा मंच आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरत असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा उपक्रम म्हणून हा एक्स्पोचे विशेष महत्त्वपूर्ण ठरत आहे.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment