अमृत संस्थेची वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना नव-व्यावसायिकांसाठी वरदान : दीपक जोशी

लातूर जिल्ह्यातील लाभार्थ्याचा उद्योग पाहून व्यक्त केले समाधान

अमृत संस्थेची वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना नव-व्यावसायिकांसाठी वरदान : दीपक जोशी मुख्य फोटो
अमृत संस्थेची वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना नव-व्यावसायिकांसाठी वरदान : दीपक जोशी अतिरिक्त फोटो

लातूर : व्यवसायवृद्धीसाठी अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेची वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना हे नव-व्यावसायिकांसाठी एक वरदान ठरत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांनी केले. अमृत संस्थेच्या कर्ज व्याजपरतावा योजनेचा लाभ मिळालेले मंदार संतोष पाटील यांच्या उद्योगाला भेट देऊन त्यांनी पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते.

या उद्योगाच्या विस्तारासाठी मंदार संतोष पाटील यांनी अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेचा लाभ घेतला. ते लातूरमधील पहिले लाभार्थी ठरले. या योजनेच्या लाभाचा चांगला उपयोग करून त्यांनी आपला व्यवसाय वाढवला. दीपक जोशी यांनी हा व्यवसाय पाहून समाधान व्यक्त केले आणि त्यांना अधिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

मंदार पाटील यांचा श्रीराम क्विल्टेक्स अँड मॅट्रेसेस या नावाने उद्योग आहे. मॅट्रेसेस आणि त्यासाठी लागणारे कापड यात तयार होते. मराठवाड्यामध्ये संभाजीनगरनंतर लातूरमध्येच हे अशा प्रकारचे मशीन आहे. या उद्योगाला सीएमईजीपी योजनेमधून पंजाब नॅशनल बँकेच्या बार्शी रोड शाखेने कर्ज दिले आहे. अमृत संस्थेच्या कर्ज व्याजपरतावा योजनेमधून त्यांना आतापर्यंत एक लाख चार हजार ८५५ रुपयांचा व्याजपरतावा मिळाला आहे.

या वेळी जोशी यांच्यासह अमृत संस्थेचे लातूर जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे जिल्हा प्रकल्प समन्वयक दीपक गायकवाड, धारशिव जिल्हा व्यवस्थापक चिन्मय कुलकर्णी व इतर कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक मंडळी उपस्थित होती.

लातूरमधील मोक्षद गोकाष्ठ प्रकल्पालाही दीपक जोशी यांनी भेट दिली. या प्रकल्पात गोवंशाच्या शेणापासून लाकूडनिर्मिती केली जात आहे. उद्योजक विक्रम चौधरी यांनी मशिनरी चालू करून या प्रकल्पाची सर्व माहिती जोशी यांना दिली. जोशी यांनी या नावीन्यपूर्ण प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.

अधिक माहितीसाठी संपर्क :
अमृत लातूर जिल्हा कार्यालय 7391 065 470

तुम्हीही घेऊ शकता या योजनेचा लाभ; कशी आहे योजना?
वैयक्तिक व्याजपरतावा योजना ही विशेषतः व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. योग्य कागदपत्रे सादर करून आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. लक्ष्यित गटातील जातींमधील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते. याचाच अर्थ असा, की दोन वर्षांच्या कालावधीतील कर्ज व्याजमुक्त होते. त्यामुळे बचत झालेली रक्कम व्यवसायाच्या वृद्धीसाठी वापरणे व्यावसायिकांना शक्य होऊ शकते.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अमृत संस्थेच्या या आणि अन्य योजनांच्या अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 27-12-2025 News publication date | Time: 11:21 AM News publication time | Views: 1,083 Number of times this news has been viewed | District: latur Related district of the news
Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 27-12-2025 News publication date | Time: 11:21 AM News publication time | Views: 1,083 Number of times this news has been viewed | District: latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words