अमरावतीतील लाभार्थ्यांकरिता नवीन प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी झाली चर्चा
अमरावती : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे तारापूर (ता. जि. अमरावती) येथील कृषी विकास केंद्राचा अभ्यासदौरा काढण्यात आला. या भेटीचा उद्देश अमृतच्या लक्ष्यित गटातील लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या कौशल्याधारित, शेतीपूरक व रोजगाराभिमुख प्रशिक्षणांची माहिती घेणे आणि समन्वय वाढवणे हा होता. अमृत ही संस्था प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देते. या दौऱ्यात अमरावती विभाग व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, अमरावती जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर यांनी विविध प्रशिक्षणांचे स्वरूप, उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा आणि नागरिकांना विविध प्रकारे मिळणारे लाभ यांची माहिती घेतली. अमृत आणि तारापूरचे कृषी विकास केंद्र यांच्यातील सहकार्यामुळे भविष्यात अधिक परिणामकारक व रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपक्रम राबवले जाणार असून, याचा थेट लाभ युवक, शेतकरी व नवउद्योजक घटकांना होणार आहे.
तारापूरच्या कृषी विकास केंद्रात शेतकरी व उद्योजकांसाठी विविध प्रकारचे प्रत्यक्ष उपयोगी पडणारे प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञान,सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती पद्धती, कृषी प्रक्रिया उद्योग (अन्नप्रक्रिया, पॅकेजिंग), दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन व शेळीपालन, तसेच शेतीपूरक लघुउद्योग, व्यवसाय नियोजन व मार्केटिंग मार्गदर्शन अशा प्रशिक्षणांचा समावेश आहे.
अमृत संस्थेच्या लाभार्थ्यांना या प्रशिक्षणांच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी संधी कशा मिळतील, उत्पन्नवाढीचे मार्ग कसे मिळतील, तसेच ग्रामीण भागात टिकाऊ रोजगारनिर्मिती कशी करता येईल, याबाबत या भेटीत चर्चा करण्यात आली. या वेळी केंद्रप्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक के. पी. सिंग, डॉ. अर्चना काकडे, प्रफुल्ल महल्ले, श्री. आखूड, श्री. घोगरे आदी विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment