गुरुपौर्णिमा विशेष : भारतीय संस्कृतीतील गुरुचे अनन्यसाधारण महत्त्व

आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाणारी गुरुपौर्णिमा ही भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी परंपरा आहे. या दिवशी ज्ञान, संस्कार, मूल्ये आणि जीवनाची योग्य दिशा देणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. म्हणूनच "गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरः" हा श्लोक गुरुच्या महानतेचे वर्णन करतो.

गुरुपौर्णिमा विशेष : भारतीय संस्कृतीतील गुरुचे अनन्यसाधारण महत्त्व मुख्य फोटो
मुख्य फोटो

आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाणारी गुरुपौर्णिमा ही भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी परंपरा आहे. या दिवशी ज्ञान, संस्कार, मूल्ये आणि जीवनाची योग्य दिशा देणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. म्हणूनच "गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरः" हा श्लोक गुरुच्या महानतेचे वर्णन करतो.


गुरुपौर्णिमेला महर्षी वेदव्यास यांची जयंतीही मानली जाते. त्यांनी वेदांचे विभाजन, महाभारताची निर्मिती आणि अनेक पुराणांचे संकलन करून भारतीय ज्ञानपरंपरेला अमूल्य योगदान दिले. त्यामुळे हा दिवस व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो.


गुरु म्हणजे केवळ शालेय शिक्षक नव्हे, तर जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारी प्रत्येक व्यक्ती. आई-वडील, शिक्षक, संत, समाजसुधारक, मार्गदर्शक आणि जीवनमूल्ये शिकवणारे प्रत्येक जण आपल्या जीवनातील गुरु असतात.


आजच्या आधुनिक युगात माहिती सहज उपलब्ध असली तरी योग्य ज्ञान, विवेक, चारित्र्य आणि जीवनमूल्ये रुजविण्याचे कार्य गुरुच करतात. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणे, समाजात नैतिकता आणि संस्कारांची जोपासना करणे, तसेच राष्ट्रनिर्मितीसाठी सक्षम नागरिक घडविणे हे गुरुंचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.


या लेखातून आपण काही गुरु-शिष्यांची माहिती घेऊया, जे इतिहासात आपल्या कर्तृत्वामुळे अजरामर झाले.


गुरु वशिष्ठ - प्रभू श्रीराम - वैदिक काळापासून प्रसिद्ध असलेले वशिष्ठ ऋषी अयोध्येचे राजगुरु होते. राजा दशरथ आणि श्रीविष्णूंचा सातवा अवतार असलेल्या श्रीरामांचेही ते गुरु होते. वेद आणि पुराणांचे सर्वोत्तम ज्ञान देऊन वशिष्ठांनी श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम आणि प्रचंड पराक्रमी बनवले. श्रीरामांसह लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांनाही त्यांनी अतूल्य मार्गदर्शन केले. गुरु वशिष्ठांच्या सल्ल्याशिवाय श्रीराम कोणतेही कार्य करत नसत. गुरु वशिष्ठांनी श्रीरामांना वेळोवेळी अतिशय प्रभावी मार्गदर्शन केले. वशिष्ठ ऋषींना सप्तऋषींमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.


महर्षी व्यास - शुक, वैशंपायन - परंपरागत उल्लेखांनुसार अनेक ग्रंथांचे कर्ते म्हणून व्यास प्रसिद्ध आहेत. त्यांनी वेदांचे विभाजन व वर्गीकरण केले म्हणून त्यांना ‘वेदव्यास’ म्हणतात. याशिवाय व्यासशिक्षा, ब्रह्मसूत्रे, महाभारत, पुराणे, व्यासभाष्य आदी ग्रंथांचे कर्ते तेच समजले जातात. व्यासांच्या नावावर वेदव्यासस्मृती नावाचा एक स्मृतिग्रंथही आहे. महर्षी व्यासांचा जन्म आषाढी पौर्णिमेला झाल्याची मान्यता आहे. महाभारतातील उल्लेखावरून असे आढळून येते की, स्वत: व्यासांनी २४,००० श्लोकांचे उपाख्यानविरहित भारत रचले व त्यांचा शिष्य वैशंपायन याने त्यात आख्यानोपाख्यानादिकांची भर घालून त्याला सुमारे एक लाख श्लोकसंख्या असलेल्या सध्याच्या महाभारताचे रूप दिले. व्यासांनी त्यांच्या चार शिष्यांपैकी प्रथम शुकाला महाभारत शिकविले, असे सांगितले जाते.


भगवान परशुराम - भीष्म, द्रोणाचार्य - विष्णूच्या अवतारांपैकी एक अवतार आणि सात चिरंजीवांपैकी एक मानले जाणारे परशुराम. महादेव शिवशंकरांनी त्यांना शस्त्रास्त्रविद्या शिकविली व परशू दिला. परशुराम धनुर्विद्येत विशेष निष्णात होते. परशुरामांनी भीष्म पितामह आणि द्रोणाचार्य यांना धनुर्विद्या शिकविली. नंतर द्रोणाचार्यांनी ती पुढे कर्ण आणि अर्जुन यांना शिकविली, असेही महाभारतात म्हटले आहे. याशिवाय कर्णाने स्वतः परशुरामांची सेवा करत अनेक विद्या शिकून घेतल्या, असाही उल्लेख आढळतो. परशुराम सप्तचिरंजीवांपैकी एक मानले गेल्याने रामायण, महाभारत आणि निरनिराळ्या काळातील घटनांशी त्यांचा संबंध जोडलेला आढळतो.


गुरु द्रोणाचार्य - कौरव, पांडव - कौरव-पांडवांचे धनुर्विद्येतील गुरु व भारतीय युद्धातील कौरवांचे एक सेनापती म्हणून द्रोणाचार्यांचा उल्लेख आढळतो. सर्व कौरव-पांडव राजपुत्रांना त्यांनी धनुर्विद्येत आणि इतर विद्यांमध्ये निष्णात केले. भीम व दुर्योधन यांना गदायुद्ध व मुष्टियुद्ध, अर्जुनाला धनुर्विद्या, युधिष्ठिराला रथयुद्ध व नकुल-सहदेवाला क्षेत्ररक्षण शिकविले. एकलव्य या शबरीपुत्रास त्यांनी विद्या शिकविली नाही, तरी त्याने द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा करून विद्या संपादन केली व तो त्या विद्येत अर्जुनापेक्षाही पारंगत झाला.


सांदीपनी ऋषी - श्रीकृष्ण, बलराम - श्रीविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णांचे गुरु म्हणजे सांदीपनी ऋषी. श्रीकृष्ण आणि बलराम यांनी गुरुकुल पद्धतीनुसार सांदीपनी ऋषी यांच्या आश्रमात राहून विद्या प्राप्त केल्याचे सांगितले जाते. सांदीपनी ऋषींनी श्रीकृष्णांना चौसष्ट दिवसात चौसष्ट कला शिकवल्या. वेद-पुराणांसोबतच धर्मातील अनेक गोष्टींची भरपूर माहिती दिली, असे सांगितले जाते. 'सांदीपनी' म्हणजे देवांचे ऋषी, असा त्याचा अर्थ सांगितला जातो. उज्जैन येथे सांदीपनी ऋषींचा आश्रम आजही अस्तित्वात आहे.


आर्य चाणक्य - चंद्रगुप्त - आर्य चाणक्य यांना विष्णुगुप्त आणि कौटिल्य या नावांनीही ओळखले जाते. आर्य चाणक्यांनी रचलेला कौटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतील एक देदीप्यमान ग्रंथ मानला जातो. २५ प्रकरणे व सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला मानवी इतिहासातील पहिला ग्रंथ असल्याचे मानले जाते. या ग्रंथात प्रतिपादित केलेल्या नीतीस 'चाणक्यनीती' वा 'दंडनीती' म्हणून ओळखतात. जुलमी नंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात त्यांचाच मुख्य सहभाग होता असे मानले जाते. आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर आर्य चाणक्य यांनी अखंड भारताचे निर्माण केल्याचे मानले जाते.


याव्यतिरिक्त स्वामी विवेकानंद-रामकृष्ण परमहंस, राजमाता जिजाबाई-छत्रपती शिवाजी महाराज अशी काही प्रसिद्ध उदाहरणे आहेत. आपल्या शिक्षण पद्धतीत खरंतर गुरुकुल शिक्षण अशी परंपरा होती. वरील सर्व उदाहरणांमध्ये हे थोर शिष्य गुरूगृही किंवा गुरूच्या जवळ राहून शिकले, कारण आपल्या पारंपारिक शिक्षण पद्धतीत गुरूंचे स्थान उच्च आहे. त्यांच्या सहवासात राहून त्यांचे बारकाईने निरीक्षण करून शिष्य शिकत असे. कालानुरूप आपल्या शिक्षणपद्धतीत बदल झाले परंतु आजही गुरुचे महत्त्व तितकेच आहे.


गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि त्यांच्या शिकवणीनुसार प्रामाणिकपणे जीवन जगण्याचा संकल्प केला जातो. ही परंपरा आपल्या संस्कृतीतील गुरु-शिष्य नात्याची पवित्रता आणि आदर्श जपणारी आहे.


गुरुपौर्णिमा आपल्याला नम्रता, कृतज्ञता आणि ज्ञानाचा आदर करण्याची प्रेरणा देते. जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरुंचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद हेच खरे सामर्थ्य आहे. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या गुरुंप्रती सदैव आदर, विश्वास आणि कृतज्ञता व्यक्त करावी, हीच गुरुपौर्णिमेची खरी शिकवण आहे.


-संकलित

Publisher: Santosh Juvale News publisher name | Date: 29-07-2026 News publication date | Time: 10:00 AM News publication time | Views: 576 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Santosh Juvale News publisher name | Date: 29-07-2026 News publication date | Time: 10:00 AM News publication time | Views: 576 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

S
Shailaja Kulkarni.
29-07-2026 01:46 PM

आजच्या गुरुपौर्णिम या विषयावर लिहिलेला लेख अतिशय उत्तम असून गुरु विषयी असलेले महत्त्व या लेखाच्या माध्यमातून कळते. आपल्या या लेखातून गुरु– शिष्य परंपरा वाचण्यास मिळते.

Write a Comment
0 / 50 words
Advertisement