आंतरराष्ट्रीय साथरोग सज्जता दिन

दर वर्षी २७ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साथरोग सज्जता दिन (International Day of Epidemic Preparedness) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची माहिती करून देणारा हा लेख.

आंतरराष्ट्रीय साथरोग सज्जता दिन मुख्य फोटो
मुख्य फोटो

२०२० साल उजाडले आणि कोरोना या भयानक विषाणूच्या संसर्गाच्या साथीने सर्व जगभर हाहाकार माजवला. इतकी वर्षे आपण अशा साथीच्या आजारांच्या केवळ कथा ऐकल्या होत्या. कोरोना काळात अशा रोगांची भयावहता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली. जगभर लॉकडाउन, आजारामुळे एकटी पडलेली, क्वारंटाइन झालेली माणसे, आपल्या आप्तांचा अंत्यविधीही करता येऊ नये अशी अगतिकता, उपचारांचे भयानक परिणाम अशा त्या वेळच्या दृश्यांची आठवण झाली, तरी अंगावर काटा येतो. असे साथीचे आजार कधीही येऊ शकतात. अशा साथीच्या आजारांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तोंड देता यावे, म्हणून सर्व स्तरांवर जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्यातर्फे हा दिवस साजरा केला जातो.

अशा साथीच्या आजारांत सगळ्यात महत्त्वाची असते ती आरोग्य यंत्रणा. त्या व्यवस्थेवर अशा काळात सर्वांत जास्त ताण येतो. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करणे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार राहणे यासाठी प्रयत्नशील होणे गरजेचे आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या या युगात जागतिक स्तरावर माहितीची देवाणघेवाण, वैज्ञानिक ज्ञान आणि उत्तम आरोग्यपद्धतींचा प्रसार करणे हे या दिवसाचे ध्येय आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने (UNGA) सात डिसेंबर २०२० रोजी एक ठराव मंजूर करून २७ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साथरोग सज्जता दिन म्हणून घोषित केला. हा दिवस पहिल्यांदा २७ डिसेंबर २०२० रोजी साजरा करण्यात आला. कोविड-१९ साथीमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि भविष्यात अशा संकटांना सामोरे जाण्यासाठी असलेल्या सज्जतेची गरज ओळखून हा निर्णय घेण्यात आला. या सगळ्यामागे एकच ध्येय आहे ते म्हणजे अशा साथीच्या आजारांत संपूर्ण विश्वाने एका कुटुंबासारखे एक होऊन या संकटांचा सामना करणे गरजेचे आहे. आपले भारतीय तत्त्वज्ञानसुद्धा ‘वसुधैव कुटुंबकम्’ हेच सांगते.

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 26-12-2025 News publication date | Time: 07:42 PM News publication time | Views: 141 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 26-12-2025 News publication date | Time: 07:42 PM News publication time | Views: 141 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words