आज प्रसिद्ध सतारवादक आणि संगीतकार- भास्कर चंदावरकर यांची जयंती,त्यानिमित्त त्यांच्या संगीत कार्याची माहिती सांगणारा हा लेख-
मराठी संगीत क्षेत्रातीलएक अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे प्रसिद्ध सतारवादक पंडित भास्कर चंदावरकर. त्यांचा जन्म १६ मार्च १९३६ रोजी पुण्यात झाला. त्यांचे भारतातल्या विविध लोकसंगीतांवर आधारित अनेक वाद्य अल्बम्स प्रकाशित झाले आहेत. त्यांनी चित्रपटांना संगीतही दिलं असल्याचं फार कमी लोकांना माहीत आहे. हे सर्व कलात्मक चित्रपट होते, ज्यांना भावपूर्ण आणि आशयानुरूप संगीत देऊन भास्कर चंदावरकर यांनी एक प्रतिभावंत संगीतकार म्हणून ठसा उमटवला.
मराठी रसिकांना भास्कर चंदावरकरांची सख्या रे घायाळ मी हरिणी…, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे…, बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले… यांसारखी गाणी पटकन आठवतात. जगातल्या विविध संगीत प्रवाह नि प्रकारांचा त्यांचा गाढा अभ्यास आणि आधुनिक कलांचा प्रचंड व्यासंग होता. पंडित रवीशंकर, त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा आणि पंडित उमाशंकर मिश्रा यांच्याकडून सतारवादनाचे धडे त्यांनी गिरवले. चित्रपट कला आणि संगीताचे ते शास्त्रशुद्ध मांडणी करणारे अभ्यासक तथा संशोधक होते. त्यांनी काही पाश्चात्य जाणकारांकडून जॅझ संगीताचंही शिक्षण घेतलं होतं. पाश्चात्य संगीत आणि भारतीय संगीत यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी यावर जगभर व्याख्यानेही दिली. त्यांनी संगीतात अनेक नवनवीन प्रयोग केले. त्यांनी केलेल्या नृत्य नाटिकांचं संगीतही खूप गाजलं.
घाशीरामशिवाय तीन पैशांचा तमाशा, गिरीबाला, ये रे ये रे पावसा, जेतेगिरी बेन चंदेरी, आषाढ का एक दिन या नाटकांनाही त्यांनी संगीत दिलं. त्याचप्रमाणे जपानी भाषेतलं ‘मीवा’ आणि जर्मन भाषेतलं ‘नागमंडल’ ही नाटकंही त्यांनी संगीतबद्ध केली. चंदावरकरांच्या अफलातून सांगितिक प्रतिभेचा अजून एक आविष्कार म्हणजे ‘नक्षत्रांचे देणे’ हा काव्य-संगीताचा कार्यक्रम. कविवर्य आरती प्रभू यांच्या कवितांवर आधारित हे रंगमंचीय सादरीकरण म्हणजे त्यांनी शब्द-संगीताला दिलेली अनमोल देणगी म्हटली जाते. त्यांनी ‘स्वप्नकोष’ हा बॅले, ‘प्रतिमा’ हे नृत्यनाट्य, ‘वोल्गा ते गंगा’, ‘रंगविविधा’ यांसारख्या रंगमंचीय सादरीकरणातून आपल्या प्रतिभेचा प्रत्यय रसिकांना आणून दिला.
पंडित चंदावरकरांनी रंगभास्कर, वाद्यवेध आणि चित्रभास्कर या पुस्तकांमधून अतिशय अभ्यासपूर्ण सांगितिक मांडणी केली आहे. त्यांनी पुण्याच्या फिल्म अॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये सुमारे १५ वर्षे संगीत विषयाचं अध्यापन केलं. याशिवाय अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, बंगळूरू इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, पंजाब-हरियाणा विद्यापीठ आणि दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अशा नामवंत आणि प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये अतिथी प्राध्यापक म्हणूनही योगदान दिलं. तसेच झेकोस्लोव्हाकिया, जपान, पोलंड या देशांत कलाविषयक सल्लागार म्हणून काम केलं. अमेरिकेतही अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी व्याख्याने दिली. मराठी, हिंदी, मल्याळम, कन्नड भाषांमधले चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केले. निष्णात सतारवादक असल्याने पंडित चंदावरकर त्यांनी लावलेली चाल इतर संगीतकारांप्रमाणे हार्मोनियमवर न वाजवता सतारीवर वाजवून दाखवत. अनेक दिग्गजांच्या चित्रपटांना त्यांनी संगीतसाज चढवला. वानगीदाखल परोमा (अपर्णा सेन), रावसाहेब (विजया मेहता), सामना व सिंहासन (जब्बार पटेल), थोडासा रुमानी हो जाए (अमोल पालेकर), खंडहर (मृणाल सेन) ही नावं सांगता येतील. तसेच जय जवान जय किसान, माया दर्पन, जादू का शंख, अरविंद देसाई की अजीब दास्तान, अल्बर्ट पिंटो को घुस्सा क्यो आता है, हमिदाबाई की कोठी हे हिंदी चित्रपटही त्यांनी केले. शिवाय एक डाव भूताचा, गारंबीचा बापू, आक्रीत, चांदोबा चांदोबा भागलास का?, सर्वसाक्षी, मातीमाय, कैरी, बयो, श्वास, सरीवर सरी हे त्यांचे उल्लेखनीय मराठी चित्रपट होत. नाइन अवर्स टू रामा, अ लँप इन द निश या इंग्रजी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिलं. त्यांना सन १९८८ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर ‘चैत्र’ या मराठी लघुपटासाठी २००२साली सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला. समांतर नाटक व चित्रपट चळवळींसंदर्भात भास्कर चंदावरकरांनी संगीत दिग्दर्शक म्हणून मौलिक योगदान दिलं आहे.
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ‘एक प्रतिज्ञा असे आमुची ज्ञानाची साधना, चिरंतन ज्ञानाची साधना…’ या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या लेखणीतून साकारलेल्या विद्यापीठ गीताला पंडित चंदावरकरांनी सुश्राव्य चालीत गुंफलं आहे. त्यांची ही रचना अप्रतिमच, पण याहीपेक्षा त्यांनी एक अद्वितीय कामगिरी केली आहे. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे विद्यापीठाचं बोधवाक्य. या दोन शब्दांच्या बोधवाक्याला त्यांनी अतिशय श्रवणीय, अर्थवाही नि सुंदर असा स्वरसाज चढवला आहे. खूप सहज, सोपी आणि कोणालाही गुणगुणता येईल अशी चाल लावण्याची अफलातून किमया त्यांनी केली आहे.
पंडित भास्कर चंदावरकर हे मराठीतले अभिजात संगीतकार होते, पंडित भास्कर चंदावरकर यांनी २६ जुलै २००९ रोजी अखेरचा श्वास घेतला. या अभिजात संगीतकाराच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
-संदर्भ- आपलं महानगर वेबसाईटवरील लेख व इतर संकलित माहिती
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment