थोर इतिहास संशोधक,अभ्यासक आणि लेखक डॉ.र.चिं.ढेरे यांची आज जयंती,त्यानिमित्त त्यांच्या लेखनप्रवासाची माहिती करून देणारा हा लेख-
डॉ.र.चिं.ढेरे हे मराठी इतिहास-संशोधक व लेखक होते. ढेरे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील निगडे या गावात २१ जुलै १९३० रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव चिंतामण गंगाधर ढेरे आणि आईचे नाव शारदा होते.
प्राच्यविद्या संशोधन केंद्रात त्यांनी अभ्यासक म्हणून काम केले. त्यांनी प्राच्यविद्या संशोधनामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्र संस्कृतीच्या अनेक अस्पर्शित पैलूंवर प्रकाश टाकण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयांत त्यांचा विशेष अभ्यास असून त्यांनी या विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांनी एकूण १०५ पुस्तके लिहिली आहेत. संस्कृती, साहित्य, लोकविद्या या क्षेत्रात त्यांनी खास कार्य केले असे म्हणता येते. त्यांची 'नाथसंप्रदायाचा इतिहास', 'दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा', 'शक्तिपीठांचा शोध', 'चक्रपाणि', 'शोधशिल्प', 'लज्जागौरी', 'श्रीतुळजाभवानी', 'श्रीविठ्ठल एक महासमन्वय', "त्रिविधा', 'श्रीपर्वताच्या छायेत' यांसारखे इतर पायाभूत महत्त्वाचे ग्रंथ आणि अनेक विचारपूर्ण संशोधनात्मक लेख जगभरच्या संशोधनक्षेत्रात महत्त्वाचे आहेत. इतिहासाचे लेखन म्हणजे केवळ कागदपत्रांचे पुरावे सादर करणे नव्हे, तर कागदपत्रांमधील माहितीचे सत्य तपासताना समकालीन कागदपत्रातील संदर्भही ताडून पाहणे आवश्यक, अशी त्यांची भूमिका होती.
ढेरे यांचे बालपण व उमेदवारीचा काळ विपरीत परिस्थितीत गेला. वयाच्या पाचव्या वर्षी आई-वडील वारले. शिक्षक, मुद्रित शोधक, ग्रंथपाल इत्यादी कामे उपजीविकेसाठी ते करीत असत. शंकराजी नारायण पारितोषिकासाठी ढेरे यांनी नाथसंप्रदायावर संशोधनपर लिखाण केले होते. त्यांनी संशोधनाने सिद्ध केलेला ‘चक्रपाणी’ हा प्रबंध सादर केला. तोही एम.ए. न होता थेट पीएच.डी. साठी अपवाद म्हणून स्वीकारण्यात आला होता. 'षट्स्थल: एक अध्ययन' या संशोधनपर प्रबंधासाठी त्यांना पुणे विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी प्राप्त झाली.
शंभरहून अधिक विद्वत्तापूर्ण ग्रंथांमधून डॉ. ढेरे यांनी महाराष्ट्रातील धार्मिक वातावरण कसे निर्माण झाले यावर महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. आपल्या अधिकारपूर्ण आणि विद्वत्तापूर्ण ग्रंथांमधून त्यांनी राज्यातील धार्मिक जीवनाच्या प्राधान्याकडे मानववंशशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले आणि महाराष्ट्र व दख्खनच्या पठाराच्या धार्मिक इतिहासाचे तेजस्वी, अपारंपरिक कथन रेखाटले.
डॉ. ढेरे हे एक प्रकारचे ज्ञानकोशच होते, ज्यांनी महाराष्ट्रातील विविध धार्मिक पंथांचे मूळ आणि अर्थ शोधून काढले. याचे उदाहरण म्हणजे त्यांनी वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी लिहिलेले 'दत्त संप्रदायाचा इतिहास' (१९५८) हे पुस्तक. ते एक विद्वान होते, त्यांना त्यांच्या नऊ साहित्यकृतींसाठी राज्य पुरस्कार मिळाला होता. १९८० मध्ये, ते पुणे विद्यापीठाकडून डी.लिट. पदवी मिळवणारे पहिले व्यक्ती ठरले.
अशा या विचारवंताचे आणि थोर साहित्यिकाचे १ जुलै २०१६ रोजी निधन झाले.
-संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment