मंगल पांडे यांच्या जयंती निमित्त १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे अमुल्य योगदान,त्यांचे व्यक्तिमत्त्व यांचा परिचय करून देणारा हा लेख-
इंग्रजांविरुद्ध क्रांतीचं पहिलं पाऊल उचलणारे क्रांतिकारक म्हणून मंगल पांडे यांचं नाव इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिलं आहे. आज त्यांची जयंती आहे. त्यांनी पुकारलेल्या विद्रोहामुळेच पहिल्या स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात सन १८५७ मध्ये झाली. त्यांनी २९ मार्च १८५७ रोजी इंग्रजांविरुद्ध कोलकात्यातील बराकपूरमध्ये एका अधिकाऱ्यावर हल्ला करत या लढ्याची मशाल पेटवली.
मंगल पांडे यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील नगवा या गावात १९ जुलै १८२७ रोजी झाला. त्यांनी सन १८४९ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरीला सुरुवात केली, त्यावेळी ते २२ वर्षांचे होते. पांडे हे बराकपूर सैन्यदलामधील बंगालच्या ३४ व्या बी. एन. आय. तुकडीच्या कंपनीत काम करत होते. कोलकात्याजवळील बराकपूर येथील १९ व्या पलटणीला दिलेल्या काडतुसांना गाय किंवा डुकराची चरबी लावलेली आहे, अशी माहिती मिळाली होती. ही काडतुसे बंदुकीत भरण्यापूर्वी त्यांचे आवरण दातांनी तोडावे लागायचे. अशा वेळी या आवरणाला लावलेली गाईची किंवा डुकराची चरबी तोंडात जाऊ शकेल या भीतीने या पलटणीतील शिपायांनी ती काडतुसे स्वीकारण्यास नकार दिला. इतकेच नव्हे, तर प्रतिकारार्थ त्यांनी शस्त्रे हाती घेतली. त्या दिवशी ब्रिटिश अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने ब्रिटिशांनी तो अपमान मुकाट्याने गिळला. त्यांनी ब्रह्मदेशातून (म्यानमार) गोऱ्या सैनिकांची कुमक मागवून या पलटणीला निःशस्त्र करून अपमानित अवस्थेत हाकलून द्यायचे ठरवले. याची अंमलबजावणी बराकपूरला करण्याचे ठरले. या अपमानास्पद कारवाईमुळे मंगल पांडे यांनी आपल्या सहकाऱ्यांना ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले.
सार्जंट मेजर ह्यूसन याने त्यांना पकडायला सांगितले. त्यावेळी मंगल पांडे यांची गोळी लागून ह्यूसन जखमी झाला. हे पाहताच लेफ्टनंट बॉ घोड्यासह मंगल पांडेंवर चालून आला. एवढ्यात मंगलच्या बंदुकीतून सुटलेली गोळी घोड्याच्या पोटात शिरली. घोडा लेफ्टनंटसह आडवा झाला. मंगल पांडे यांना पुन्हा बंदुकीत गोळ्या भरण्याचा अवधी मिळण्याआधीच लेफ्टनंट बॉ आपले पिस्तुल काढून उभा राहिला. मंगल पांडे यांनी तनिकही न डगमगता आपली तलवार उपसली. बॉने पिस्तुल झाडले; पण मंगल पांडे यांनी त्याचा नेम चुकवला. आपल्या तलवारीने मंगल पांडे यांनी त्यालाही लोळवले. ह्यूसन व बॉ आपल्या निवासस्थानांकडे पळून गेले. त्यानंतर जनरल हिअर्स अनेक शिपाई घेऊन मंगल पांडे यांच्यावर चालून गेला. तोपर्यंत दुपार झाली होती. मंगल पांडे थकले होते. आपण फिरंग्यांच्या हातात सापडणार, हे पाहताच त्यांनी बंदूक आपल्या छातीकडे रोखली व स्वतःवर गोळी झाडून घेतली. मंगल पांडे धरणीवर कोसळले आणि त्यांची शुद्ध हरपली. नंतरच ब्रिटिश त्यांना पकडू शकले. त्यानंतर पांडे यांना सैनिक न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. अखेर मंगल पांडे यांना ८ एप्रिल १८५७ रोजी फाशी देण्यात आली. मंगल पांडे यांची भीती इंग्रज राज्यकर्त्यांच्या मनात इतकी होती की मंगल पांडेच्या मृत्यूनंतरही त्यांच्या मृतदेहाजवळ जाण्यास इंग्रज घाबरत होते. अशा या थोर वीरास शतश: नमन!
-संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment