आस्था, श्रद्धा आणि भक्तीचे पुण्यपर्व - भगवान जगन्नाथ रथयात्रा

आपला देश विविध परंपरा, यात्रा आणि उत्सवांनी नटलेला आहे. प्रत्येक भागातील, राज्यातील परंपरा वेगवेगळी असते. संस्कृतीची ही विविधता हीच तर आपल्या देशाची विशेषता आहे. अशीच एक अनोखी व आस्था आणि श्रद्धेची परंपरा म्हणजे ओडिशा येथील जगन्नाथ रथयात्रा! जाणून घेऊया या अनोख्या आणि पुरातन सोहळ्याविषयी...

आस्था, श्रद्धा आणि भक्तीचे पुण्यपर्व - भगवान जगन्नाथ रथयात्रा मुख्य फोटो
आस्था, श्रद्धा आणि भक्तीचे पुण्यपर्व - भगवान जगन्नाथ रथयात्रा अतिरिक्त फोटो

आस्था, श्रद्धा आणि भक्तीचा पुण्यपर्व म्हणजे भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा आहे. या उत्सवात भगवान आपल्या भक्तांबरोबर असतात. त्यावेळी कोणी राजा नसतो, कोणी रंक नसतो. हिंदू धर्मामधील चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी ओडिशामधील जगन्नाथ मंदिर एक आहे. मंदिरात श्रीजगन्नाथ (भगवान श्रीकृष्ण), श्रीबलभद्र (बलराम) आणि देवी सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती आहेत. भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा देशात नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. जगभरातील लाखो भक्त या यात्रेसाठी जगन्नाथ पुरीमध्ये दाखल होत असतात. ही यात्रा आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष द्वितीयेला सुरू होते. यंदा ही यात्रा १६ जुलैपासून सुरू होत आहे. भगवान जगन्नाथ यांच्या या यात्रेला ऐतिहासिक अन् पौराणिक महत्त्व आहे. तीन विशाल रथांतून श्रीजगन्नाथ, श्रीबलभद्र आणि देवी सुभद्रा यांची रथयात्रा निघते. गंडिका मंदिरापर्यंत हे रथ ओढले जातात. त्या ठिकाणी एक आठवडा भगवान वास्तव्य करतात. त्यानंतर पुन्हा मंदिरात परत येतात. एकूण नऊ दिवस चालणारा हा उत्सव असतो. या उत्सवात भगवान आपल्या भक्तांबरोबर असतात. त्यावेळी कोणी राजा नसतो, कोणी रंक नसतो. यात्रेच्या इतिहासात पुरीचे राजा ज्यांना गजपती म्हटले जाते, ते साधे कपडे परिधान करून येत असतात. त्यांच्या हातात सोन्याची मूठ असलेला झाडू असतो. त्या झाडूने ते रथमार्ग स्वच्छ करतात.

रथयात्रेचा इतिहास काय?

जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेचा इतिहास जवळपास एक हजार वर्षांपेक्षाही जास्त जुना आहे. बाराव्या शतकात गंगवंशचे राजा अनंतवर्मन चोडगंगदेव यांनी या मंदिराची निर्मिती केली होती. त्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला. मंदिराच्या निर्मितीपूर्वीपासून रथयात्रेचा इतिहास आहे. मंदिराच्या निर्मितीनंतर या यात्रेला भव्य स्वरूप आले. रथयात्रेचा उल्लेख श्रीमद्भागवत, स्कंद पुराण आणि ब्रह्म पुराण यांच्यातही आहे.

मंदिराच्या सिंहद्वारावरून भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा सुरू होते. भगवान जगन्नाथ, बलभद्रजी आणि देवी सुभद्रा या रथांमधून त्यांच्या मावशीच्या घरी गुंडिचा मंदिरात जातात. हे रथ दरवर्षी नवे बनवले जातात.

असे असतात रथ

भगवान जगन्नाथ यांचा रथ सर्वात मोठा असतो. हा रथ ४५ फूट उंच आणि ३५ फूट लांब असतो. हा रथ पिवळ्या आणि लाल रंगाने सजवला जातो. या रथाला नंदीघोष म्हणतात. त्याच्या निर्मितीसाठी जवळपास दोन महिने लागतात. बलभद्रजी यांचा रथ ४४ फूट आणि देवी सुभद्रा यांचा रथ ४३ फूट उंच असतो. भगवान जगन्नाथजी यांच्या रथाला १६ चाके असतात. त्यासाठी ८३२ लाकडांचे तुकडे वापरले जातात. रथावरील सारथीचे नाव दारुक आहे. रक्षक गरुड आहे. रथाची दोरी शंखचूर्ण नागुणी आहे. त्रैलोक्य मोहिनीचा ध्वज रथावर फडकतो. हा रथ ओढणाऱ्या चार घोड्यांची नावे शंख, बहलक, सुवेत आणि हरिदास्व अशी आहेत. भगवान जगन्नाथ यांच्या रथावर नऊ देवता देखील स्वार होतात. भगवान जगन्नाथ यांच्या रथाचा रंग लाल-पिवळा, तर बलराम यांच्या रथाचा रंग लाल-हिरवा असतो. बलभद्रजी यांच्या रथाला तालध्वज किंवा लंगलध्वज म्हटले जाते. या रथाला १४ चाके असतात. हा रथ बनवण्यासाठी ७६३ लाकडे वापरली जातात. रथवरील सारथीचे नाव माताली आहे. रक्षकाचे नाव वासुदेव आहे. दोरीचे नाव वासुकी नाग आहे. ध्वजाचे नाव उन्नानी आहे. रथामध्ये चार घोडे आहेत ज्यांची नावे तीवरा, घोर, दीर्घाश्रम आणि स्वर्ण नाभ आहेत.

देवी सुभद्रा यांच्या रथला दर्पदलन म्हणतात. या रथाला १२ चाके असतात. देवी सुभद्रा यांच्या रथाचा रंग लाल-काळा असतो. देवी सुभद्रा यांचा रथ ओढणाऱ्या चार घोड्यांची नावे रुचिका, मोचिका, जीत आणि अपराजिता आहेत. अर्जुन स्वतः या रथाचा सारथी आहे. रथाची रक्षक जयदुर्गा देवी आहे. रथाला बांधलेल्या दोरीचे नाव स्वर्णचूड नागुनी आहे. या रथाच्या ध्वजाला नादंबिका असे म्हणतात.

अशी आहे रथयात्रेची कथा

स्कंद पुराणानुसार, एके दिवशी भगवान जगन्नाथ यांची बहीण सुभद्रा यांनी शहर पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर भगवान जगन्नाथ आणि बलभद्र हे त्यांच्या बहिणीला रथावर बसवून शहर दाखवण्यासाठी बाहेर पडले. त्यामुळे रथयात्रा काढण्याची परंपरा सुरू झाली. रथयात्रेत भगवान जगन्नाथ पहिल्या रथात, भगवान बलभद्र दुसऱ्या रथात आणि देवी सुभद्रा तिसऱ्या रथात विराजमान असतात.

अशी होते रथाच्या निर्मितीची सुरुवात

भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्यासाठी तीन वेगवेगळे रथ बनवले जातात. वसंत पंचमीला रथाच्या निर्मितीला सुरुवात होते. रथासाठी लाकूड शोधण्यापासून ते कापण्यापासून ते रथ बनवण्याच्या कार्यशाळेत ठेवण्यापर्यंत सर्व काही एका विधीप्रमाणे केले जाते. रथयात्रेसाठी फस्सी, ढोरा, सिमली, सहज आणि माही यांचे लाकूड आणि दारुक वृक्ष वापरले जातात. रथ बनवण्यात सहभागी असलेल्या कारागीर आणि कलाकारांसाठी एक निश्चित व्यवस्था आहे, ज्यामध्ये प्रत्येक कारागिराला त्याचे काम दिले जाते.

रथासाठी लाकडाच्या शोधासाठी कठोर नियम

रथासाठी लाकडाच्या शोधासाठी काही नियम आहेत. भगवान जगन्नाथ हे सावळ्या रंगाचे आहेत, म्हणून त्यांच्या मूर्तीसाठी गडद रंगाचे लाकूड शोधले जाते. तर बलराम आणि सुभद्रासाठी हलक्या रंगाचे लाकूड शोधले जाते. ज्या झाडापासून भगवान जगन्नाथाची मूर्ती बनवायची आहे, त्याला चार फांद्या असाव्यात. यासोबतच झाडावर पद्म, शंख, चक्र आणि गदा ही चिन्हे देखील असावीत. झाड अशा ठिकाणी असावे जिथे जवळच पाण्याचा साठा, स्मशानभूमी आणि मुंग्यांनी बनवलेला मातीचा ढिगारा असेल. झाडाच्या फांद्या तोडलेल्या किंवा कापलेल्या नसाव्यात. ही झाडे शोधण्याची प्रक्रिया खूप कठीण आहे. हे तिन्ही रथ दरवर्षी नवीन लाकडापासून बनवले जातात. त्यांना ओढण्याचे काम भक्त करतात. ते खूप पुण्यकर्म मानले जाते.

सोन्याची मूठ असणारे झाडू वापरण्याची परंपरा

सोन्याची मूठ असणाऱ्या झाडूने रस्ता स्वच्छ करण्याच्या परंपरेला ‘छेरा पहरा’ म्हटले जाते. सोने हा पवित्र धातू आहे, ज्याला माता लक्ष्मीचे प्रतीक समजले जाते. तसेच झाडूसुद्धा माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. झाडू सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. तो फक्त स्वच्छताच करत नाही तर नकारात्मक ऊर्जाही नष्ट करतो. यात्रा सुरू होण्यापूर्वी तिन्ही रथ सोन्याची मूठ असणाऱ्या झाडूने स्वच्छ केले जातात. त्यावेळी वैदिक मंत्रांचा उच्चार केला जातो. हे फक्त आध्यात्मिक पवित्रतेचे प्रतीक नाही तर एकताही दर्शवते. पुरीच्या राजाचे वंशज आताही यात्रेत झाडू लावण्याचे काम करत आहेत. परंपरानुसार पुरीचे राजा गजपती महाराज दिब्यसिंह देब यादव आहेत. ते भगवान जगन्नाथ यांचे प्रथम सेवक आहेत. लोक त्यांना भगवान जगन्नाथ यांच्या आदेशाचे प्रतिरूप मानतात. गजपती महाराज दिब्यसिंह देब यादव रथयात्रेपूर्वी सोन्याची मूठ असलेल्या झाडूने मार्ग स्वच्छ करतात. त्यांनाच पुरीचे राजा म्हटले जाते. मंदिर समितीच्या अध्यक्षाच्या भूमिकेत ते आहेत.

पुरीचे गजपती महाराज जगन्नाथ मंदिराचे मुख्य सेवक आहेत, त्यामुळे त्यांची भूमिका महत्वाची आहे. रथयात्रेसारख्या भव्य उत्सवांमध्ये गजपती महाराजांचे पारंपारिक योगदान आजही चालू आहे. त्यांची भूमिका ओडिशातील लोकांमध्ये धार्मिक-सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक बनली आहे. या राजवंशाने शैव, वैष्णव आणि शाक्त परंपरांचे एकत्रीकरण करून ओडिशात धार्मिक सहिष्णुता आणि लोक परंपरा जिवंत ठेवल्या आहेत.

अशाच अनेक अनोख्या आणि पुरातन काळापासून चालत आलेल्या परंपरा आपल्या देशात आहेत. म्हणूनच जागतिक पटलावर भारताची एक वैशिष्ट्यपूर्ण देश म्हणून ओळख आहे.

-संदर्भ- टी.व्ही नाईन मराठी

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 16-07-2026 News publication date | Time: 11:37 AM News publication time | Views: 68 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 16-07-2026 News publication date | Time: 11:37 AM News publication time | Views: 68 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement