थोर विचारवंत आणि समाजसुधारक- गोपाळ गणेश आगरकर

गोपाळ गणेश आगरकर हे एक बुद्धिप्रामाण्यावादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक होते. आज त्यांची जयंती आहे,त्यानिमित्त त्यांच्या राजकीय,सामाजिक आणि साहित्य प्रवासाचा हा आढावा..

थोर विचारवंत आणि समाजसुधारक- गोपाळ गणेश आगरकर मुख्य फोटो
मुख्य फोटो

त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी १४ जुलै १८५६ रोजी झाला. हालअपेष्टांना तोंड देत कराड, रत्नागिरी, अकोला आणि पुणे येथे राहून ते एम. ए. झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी पुण्यात निर्माण केलेल्या जहाल विचारांच्या राष्ट्रवादी संघटनेत ते लोकमान्य टिळकांसह सामील झाले. लोकशिक्षण आणि लोकजागृती करण्यासाठी या तिघांनी पुण्यात ‘न्यू इंग्‍लिश स्कूल’ स्थापन केले (१८८०), तसेच केसरी आणि मराठा (इंग्रजी) ही पत्रे सुरू केली (१८८१). न्यू इंग्‍लिश स्कूलमध्ये आगरकरांनी अध्यापनाचे काम केले. त्याचप्रमाणे केसरीच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारून परिणामकारक लेखन आणि कुशल संपादन यांच्या जोरावर अल्पावधीतच केसरीला लोकप्रियता प्राप्त करून दिली. न्यू इंग्‍लिश स्कूलच्या चालकांनी स्थापन केलेल्या ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘फर्ग्युसन महाविद्यालया’चे प्राचार्य (१८९२) म्हणूनही त्यांनी काम केले.

महाविद्यालयीन जीवनातच जॉन स्ट्यूअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांनी त्यांचे मन संस्कारित झाल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन बुद्धिप्रामाण्यवादी आणि अज्ञेयवादी झाला होता. याच दृष्टिकोनातून तत्कालीन समाजाची पुनर्घटना करण्याची आवश्यकता त्यांना वाटत होती. केसरीतील त्यांच्या सामाजिक लेखांतून हीच भूमिका व्यक्त होऊ लागली. सन १८८७ मध्ये ते केसरीतून बाहेर पडले आणि आपल्या क्रांतिकारक सामाजिक विचारांच्या प्रसारासाठी त्यांनी ‘सुधारक’ हे पत्र काढले (१८८८). त्यात राजकीय व अर्थशास्त्रविषयक लेखही असायचे.

बुद्धिवादी दृष्टिकोनातून समाजजीवनाचे विश्लेषण करून अन्याय्य रूढी आणि परंपरा यांच्यावर त्यांनी कडाडून हल्ले चढविले. बुद्धीच्या निकषांखेरीज अन्य कोणताही निकष ते मानत नव्हते. बुद्धिवाद, व्यक्तिवाद, समता आणि मानवतावाद या चतु:सूत्रीने त्यांचा सारा सामाजिक विचार व्यापलेला आहे.

त्यांच्या ‘सुधारक’मधील लेखांतून समाजजीवनाच्या विविध अंगांचे त्यांचे सूक्ष्म निरीक्षण आणि सखोल चिंतन प्रत्ययास येते. सामाजिक सुधारणा आणि कायदा यांचे संबंध काय असावेत, यासंबंधीची आपली भूमिका मांडण्यासाठी आणि समाजहितकारक कायद्यांच्या जोरदार पुरस्कारासाठी काही लेख लिहिले गेले आहेत. समाजचिंतन हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव असला, तरी राजकीय विचारांच्या जहालपणात ते टिळकांच्या बरोबरच होते. राजकीय हक्क आणि राजकीय स्वातंत्र्य यांची तीव्र जाणीव त्यांच्या लेखांतून स्पष्टपणे प्रतिबिंबित झालेली आहे. चिपळूणकर यांचे निधन झाल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय विचारजागृती घडवून आणण्याचे काम केसरीतून बाहेर पडल्यापर्यंत त्यांनीच केले.

आपल्या वैचारिक लेखांनी मराठीतील निबंधसाहित्यात त्यांनी मोलाची भर घातली; पल्लेदार वाक्ये, मुद्देसूद मांडणी, अन्वर्थक अलंकार आणि प्रासंगिक नर्मविनोद ही त्यांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्ये. त्यांच्या ‘कवि, काव्य, काव्यरति’ आणि ‘शेक्सपिअर, भवभूति व कालिदास’ यांसारख्या साहित्यविषयक निबंधांनी आजच्या काही टीकाकारांचे लक्ष वेधून घेतले असून, त्यांनी आगरकरांना साहित्यशास्त्रातील काही मूलभूत तत्त्वांचा शास्त्रीय पद्धतीने विचार करणारे विचारवंत मानले आहे. काव्य आणि संवेदना यांचा विशेष संबंध, काव्यातील सत्य आणि शास्त्रीय सत्य, काव्यातील करुणरस, कविमन आणि काव्य निर्मितीप्रक्रिया इत्यादींसंबंधीचे त्यांचे विचार या दृष्टीने विशेष आहेत. त्यांचे ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत: विकारविलसित अथवा शेक्सपिअर कृत हॅम्लेट नाटकाचे भाषांतर (१८८३), डोंगरीच्या तुरुंगांत आमचे १०१ दिवस (१८८२), शेठ माधवदास रघुनाथदास व बाई धनकुवरबाई यांचे पुनर्विवाहचरित्र (१९०७), वाक्यमीमांसा आणि वाक्याचे पृथक्करण.

विकारविलसितच्या प्रदीर्घ प्रस्तावनेत परक्या भाषेतील नाट्यकृतींची मराठी भाषांतरे कशी करावी, यासंबंधीची मते त्यांनी मांडली आहेत. ‘कोल्हापूर प्रकरण’ामुळे १८८२ मध्ये डोंगरी येथे टिळकांसह कारावास भोगत असतानाचे त्यांचे अनुभव त्यांनी ‘डोंगरीच्या तुरुंगांत’ मध्ये खेळकर आणि विनोदी शैलीत सांगितले आहेत. मराठी वाक्याचे निरनिराळे अवयव आणि त्यांचे परस्परसंबंध यांचा तपशीलवार विचार त्यांनीच मराठीत प्रथम आणला. त्यांचे ‘केसरीतील निवडक निबंध’ (१८८७) आणि ‘सुधारकतील वेचक लेख’ (निबंधसंग्रह १८९५) प्रसिद्ध झाले आहेत. साहित्य अकादेमीनेही त्यांचे काही लेख प्रसिद्ध केले आहेत. १७ जून १८९५ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. या थोर विचारवंतास आणि समाजसुधारकास शतश: नमन!
-संदर्भ- मराठी विश्वकोश

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 14-07-2026 News publication date | Time: 11:05 AM News publication time | Views: 57 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 14-07-2026 News publication date | Time: 11:05 AM News publication time | Views: 57 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement