वीर बाजीप्रभू देशपांडे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अत्यंत विश्वासू, पराक्रमी आणि स्वामीनिष्ठ सरदार होते. १३ जूलै ह्या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कर्तृत्वाचा परिचय करून देणारा हा लेख
बाजीप्रभूंचा जन्म पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळात झाला. ते सुरुवातीला मावळचे वतनदार बांदल यांचे दिवाण होते. त्यांचे युद्धकौशल्य आणि स्वराज्यावरील निष्ठा पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या सैन्यात सामावून घेतले. वीर बाजीप्रभू देशपांडे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अत्यंत विश्वासू, पराक्रमी आणि स्वामीनिष्ठ सरदार होते. स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान मराठी इतिहासातील सर्वात प्रेरणादायी घटनांपैकी एक मानले जाते.
प्रभू रामचंद्रांसाठी जसे हनुमान होते, तसे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी बाजीप्रभू होते. मराठा इतिहासात त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. राष्ट्रभक्ती आणि शिवबांसाठी प्राण देण्यापूर्वी त्यांनी एकदाही विचार केला नाही आणि आपले कर्तव्य पूर्ण केले. बाजीप्रभू यांनी पावनखिंडीच्या (घोडखिंड) युद्धात आपले प्राण गमावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणांचे रक्षण केले.
जुलै १६६०, पन्हाळाच्या किल्ल्यात जिथे शिवबा रहात होते तिथे आदिलशाही जनरल सिद्धी जोहर यांनी वेढा घातला. शिवरायांना सुरक्षित विशालगड पोहोचवायला शिवबा आणि बाजी प्रभू यांनी मंत्रणा केली. त्यांनी सिद्धी जोहरला आत्मसमर्पण करायची माहिती दिली. सिद्धी जोहरचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांच्यामधूनच एक शिवा काशीद यांना शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत पाठवण्यात आले. सिद्धी जोहर हे लक्षात येईपर्यंत की शिबांचा रूप धरून शिवा काशीद यांना पाठवले आहे तोपर्यंत शिवबा, बाजी प्रभू आणि त्यांचासोबत ६०० सैनिक वेगळ्या मार्गाने निघाले.
जोहरच्या डोळ्यात धूळ उडवण्याचा हा प्रयास जास्त वेळ टिकला नाही. हे प्रकरण समजल्यावर त्याने शिवा काशिदला मारले. शिवा काशिद यांनी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देऊन आपले योगदान दिले, पण आता सिद्धी जोहर संतापला होता; त्याने शिवबांवर आक्रमण करण्यासाठी सिद्धी मसूद याला पाठवले. जोहरने सिद्धी मसूदला पाठवल्याची माहिती मिळताच बाजीप्रभू यांनी शिवरायांना पुढे प्रस्थान करण्याचा आग्रह केला, पण शिवराय सहमत नव्हते. त्यांना बाजीप्रभूंना साथ द्यायची होती, पण बाजीप्रभू यांनी त्यांना स्वराज्याची गरज समजावून सांगितली आणि त्यांना तेथून जाण्यास सांगितले. शिवबा निघताना बाजीप्रभूंना म्हणाले की, 'आम्ही विशाळगड पोहोचून तोफांची फैरी झाडू आणि हा संदेश मिळताच तुम्ही पण विशाळगडाला निघा.' इतके सांगून शिवबा विशाळगडासाठी निघाले.
६०० सैनिकांपैकी ३०० शिवबांसोबत विशाळगडाकडे निघाले आणि इकडे शूरवीर बाजीप्रभू ३०० मराठा सैनिकांबरोबर सिद्धीच्या १०,००० सैनिकांशी युद्ध करायला उभे होते. युद्ध घोडखिंडीत (पावनखिंड) सुरू झाले आणि ३०० वीर मराठा सैनिकांनी सिंहगर्जना करून सिद्धीच्या सैनिकांवर हल्ला केला. शरीराचा कोणताही अवयव असा नव्हता जिथे बाजीप्रभूंना जखम झाली नसावी, पण त्यांना स्वतःचे भान नव्हते. केवळ महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. इकडे विशाळगडावर सरदार सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी यांचे अधिपत्य होते. युद्धानंतर आणि संघर्षानंतर शिवबा विशाळगड पोहोचले. तोपर्यंत बाजीप्रभू प्राणांची बाजी लावून लढत होते. तोफांचे आवाज ऐकल्यावर त्यांनी प्राण सोडले. ही घटना १३ जुलै १६६० रोजी घडली.
त्यांच्या या अद्वितीय बलिदानामुळे घोडखिंडीला पुढे "पावनखिंड" हे नाव देण्यात आले.
बाजीप्रभू देशपांडे यांचे शौर्य, धैर्य, स्वामीनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतात. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण करून स्वराज्यासाठी त्यांनी दिलेल्या सर्वोच्च त्यागाला विनम्र अभिवादन.
- संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment