या दुर्गम जिल्ह्यात व्यावसायिकांची संख्या वाढावी, नवे उद्योजक उभे राहावेत या उद्देशाने अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था प्रयत्नशील...
नंदुरबार : नंदुरबार हा राज्यातील अतिदुर्गम जिल्हा आहे. त्यामुळे या भागात व्यवसाय करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. म्हणूनच या जिल्ह्यात व्यावसायिकांची संख्या वाढावी, नवे उद्योजक उभे राहावेत या उद्देशाने अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था प्रयत्नशील आहे. अमृत कौशल्य योजनेअंतर्गत या संस्थेद्वारे विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. लाभार्थ्यांनी हे प्रशिक्षण घेऊन स्वतःचा उद्योग उभा करावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे, असा त्यामागचा उद्देश आहे.
नंदुरबार जिल्ह्यात लवकरच व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार असून, त्याद्वारे नवे उद्योजक घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उद्योग करणाऱ्यांची संख्या जास्तीत जास्त वाढावी, यासाठी अमृत कौशल्य ही योजना राबवली जात आहे. या योजनेत विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेच्या नंदुरबार कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अमृत संस्था - नंदुरबार जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे : 9112228771
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment