जागतिक उर्जा स्वातंत्र्यदिनानिमित्त उर्जा स्त्रोतांचे महत्त्व,त्यांच्या बचतीचे उपाय आणि उर्जा स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजावून सांगणारा हा लेख -
१० जुलै रोजी दरवर्षी साजरा होणारा जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन हा जगभरातील नागरिकांना आणि सरकारांना स्वच्छ, शाश्वत आणि पर्यायी ऊर्जेच्या वापराबाबत जागरूक करणारा एक महत्त्वाचा दिवस आहे. सौर, पवन, बायोगॅस, जल आणि भूऔष्णिक ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करून हा दिवस जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करण्याचे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन करतो.
सन २००५ पासून लॉस एंजेलिस (कॅलिफोर्निया) येथे या दिवसाची सुरुवात झाली. हरित ऊर्जेचे पुरस्कर्ते मायकेल डी. अँटोनोविच यांनी या उपक्रमाची सुरुवात केली. विशेष बाब म्हणजे हा दिवस महान शास्त्रज्ञ निकोला टेस्ला यांच्या वाढदिवशी साजरा केला जातो, जे एक शतकापूर्वीच अक्षय ऊर्जेची संकल्पना मांडत होते.
पर्यायी ऊर्जेचे वाढते महत्त्व
जगातील वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तींमुळे आज ऊर्जा स्वातंत्र्य ही संकल्पना अधिक गरजेची झाली आहे. विशेषतः विद्युत वाहनांचा (EVs) वाढता प्रसार, वैयक्तिक घरांवर सौर पॅनेल बसवणे आणि ग्रामीण भागात बायोगॅस वापरणे हे लक्षणीय बदल आहेत. अक्षय ऊर्जा वापरल्याने कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन सुमारे ३०% पर्यंत कमी होऊ शकते, असे शास्त्रज्ञ सांगतात.
भारतासाठी ऊर्जा स्वातंत्र्य का महत्त्वाचे?
भारत एक विकसनशील देश आहे, येथे अजूनही लाखो कुटुंबांना शाश्वत व स्वच्छ ऊर्जेची गरज आहे. ऊर्जेच्या स्वावलंबनासाठी भारताने सौर ऊर्जा प्रकल्प, पवन ऊर्जा आणि जलविद्युत प्रकल्पांवर भर देणे सुरू केले आहे. प्रधानमंत्री कुसुम योजना, सौर ऊर्जा पार्क आणि EV प्रोत्साहन धोरणे यांसारख्या उपक्रमांमुळे भारत ऊर्जा स्वातंत्र्याकडे सकारात्मक वाटचाल करत आहे. भारतासाठी ऊर्जा स्वातंत्र्य म्हणजे परकीय इंधनांवरील खर्चात बचत, ऊर्जा सुरक्षेची हमी आणि पर्यावरणीय शाश्वततेचे लक्ष्य गाठणे हे आहे. याशिवाय, स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात उद्योगधंद्यांसाठी नवे रोजगार आणि नव्या संधीही निर्माण होत आहेत.
प्रत्येक पाऊल महत्त्वाचे आहे -
ऊर्जा स्वातंत्र्य ही केवळ सरकारांची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. आपण आपल्या घरात सौर पॅनेल लावू शकतो, कमी वीज वापरणारी उपकरणे वापरू शकतो आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करू शकतो; ही सर्व लहान पावले ऊर्जा बचतीसाठी मोलाची ठरतात. आजच्या दिवशी समाज, उद्योग, शेतकरी आणि तरुण पिढी यांना आवाहन आहे की त्यांनी ऊर्जा स्वातंत्र्याच्या दिशेने ठोस पावले उचलावीत. स्वच्छ, हरित आणि उज्ज्वल भविष्यासाठी हेच आजचे खरे ध्येय आहे.
-संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment