ज्ञानेश्वरीचे संशोधक,विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ - सोनोपंत दांडेकर

आज ९ जुलै महाराष्ट्रातील शंकर वामन दांडेकर उर्फ सोनोपंत दांडेकर यांचा स्मृतिदिन त्यानिमित्त त्यांचा जीवनप्रवासाचा हा आढावा .

 ज्ञानेश्वरीचे संशोधक,विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ - सोनोपंत दांडेकर  मुख्य फोटो
मुख्य फोटो

त्यांचा जन्म २० एप्रिल १८९६ रोजी ठाणे जिल्ह्यातील केळवे येथील एका सुशिक्षित व सुसंस्कृत कुटुंबात झाला. सोनोपंत दांडेकर यांचे बंधू बाबासाहेब दांडेकर हे विद्वान व त्यागी देशभक्त होते. सोनोपंतांना घरचे उत्तम संस्कार, तशीच बुद्धिमत्ता व सात्त्विकता अशी अनुकूल परिस्थिती लाभली.

घराजवळ वै. वा. जोग महाराज राहत होते. सोनोपंतांना त्यांच्या मुखातून श्रीज्ञानेश्वरी, भजन व कीर्तन ऐकण्यास मिळे. घराजवळ जसे जोग महाराज होते, तसे कॉलेजात त्यांचे प्रोफेसर तत्त्वज्ञ गुरुदेव रा. दा. रानडे हे होते. पुढे, दांडेकर स्वतः तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक झाले. मामासाहेबांच्या अंगी पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा गाढा व तुलनात्मक अभ्यास आणि अनुभव यांचा अपूर्व संगम झाला होता.

त्यांनी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षांपर्यंत कॉलेजात विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले. दिवसा ते काम; व ते संपल्यावर श्रीज्ञानेश्वरी संबंधीच्या कीर्तनाद्वारे समाजात नैतिक व धार्मिक शिक्षण देण्याचे त्यांचे कार्य सुरू झाले. ते आयुष्यभर अखंड चालू होते. शाळा-कॉलेजातील विद्यार्थी असोत, अशिक्षित वारकरी असोत किंवा व्यसनी, वाममार्गाला लागलेला मनुष्य असो, त्यांनी समाजाची पातळी उंचावण्याचे महान कार्य सातत्याने केले. मामासाहेबांनी त्यांच्या उदाहरणाने ‘तत्त्वज्ञानी मनुष्याने समाजापासून अलिप्त न राहता समाजामध्ये मिसळून त्यांच्यापुढे उत्तम ध्येय ठेवणे हे किती आवश्यक आहे, तसेच पारमार्थिक मनुष्य व्यावहारिक जबाबदारीसुद्धा किती उत्कृष्ट रीतीने पार पाडतो, हे दाखवले आहे’ असे गुरुदेव रानडे यांनी त्यांच्याबद्दल लिहून ठेवले आहे.

मामासाहेब हे नैष्ठिक ब्रह्मचारी होते. त्यांनी लौकिक असा संसार केला नाही. ते अपरिग्रही जीवन जगले. ते स्वतःचा निर्वाहापुरता खर्च ठेवून बाकीचा पैसा गरीब विद्यार्थी व वारकरी यांना वाटून टाकत. त्यांनी वडिलोपार्जित शेती व घरदार यांस कधीही स्पर्श केला नाही. त्यांनी ‘सार्थ श्रीज्ञानेश्वरी’ ग्रंथ छापून प्रसृत केला. मात्र, त्यांनी त्यातील उत्पन्नातून स्वतःसाठी कवडीचाही उपयोग केला नाही. ते स्वतः श्रीज्ञानेश्वरीप्रमाणे जगले. सोनोपंत दांडेकर यांचे निधन ९ जुलै १९६८ रोजी झाले. त्यांची पुणे ते आळंदी अशी अंत्ययात्रा अभूतपूर्व निघाली होती. हजारो लोक अश्रुपूर्ण नेत्रांनी त्यात सामील झाले होते.

सोनोपंत दांडेकर यांच्या नावाचा पुरस्कार एखाद्या तत्त्वज्ञानविषयक ग्रंथाला दिला जातो. म. वि. गोखले यांनी ठेवलेला हा पुरस्कार २०१६ साली शकुंतला आठवले यांच्या ‘भारतीय तत्त्वविचार’ या ग्रंथाला मिळाला आहे. २०१७ सालचा पुरस्कार डॉ. यश वेलणकर यांच्या ‘ध्यान विचार’ आणि डॉ. संज्योत देशपांडे यांच्या ‘अटळ दुःखातून सावरताना’ या पुस्तकांना विभागून दिला आहे.

- संदर्भ - संजीव वेलणकर यांचा लेख

Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 09-07-2026 News publication date | Time: 11:50 AM News publication time | Views: 103 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 09-07-2026 News publication date | Time: 11:50 AM News publication time | Views: 103 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement