दि. ८ जुलै १९१० रोजी सावरकरांनी ‘मार्सेलिस’ बंदरात बोटीतून समुद्रात उडी मारली... देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात अजरामर झालेल्या या साहसाची माहिती देणारा हा लेख-
समुद्राच्या अथांगतेला, दूर दिसणाऱ्या क्षितिजाला, आकाशाच्या अनंततेला जशा सीमा नसतात, तशीच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशभक्तीला कोणत्याच देशाची सीमा अडवू शकली नाही. आपल्या कृतीने, साहित्याने आणि अतुलनीय देशभक्तीने इतिहास घडवणारा क्रांतिवीर म्हणजे विनायक दामोदर सावरकर...! सावरकर म्हटलं की आठवते ती जगप्रसिद्ध उडी; ती उडी म्हणजे केवळ भावनेच्या भरात केलेले साहस नव्हते, तर ती एक दूरदृष्टीने केलेली कृती होती. आपल्याला जहाजातून नेले जाणार, ते जहाज मार्सेय अर्थात मार्सेलिसच्या बंदरावरून जाणार आणि इथेच ब्रिटीश सरकारला अडचणीत आणता येऊ शकते, याची पूर्ण कल्पना सावरकरांच्या डोक्यात होती. कारण मार्सेलिस म्हणजे फ्रान्स आणि फ्रान्सच्या भूमीवर ब्रिटीश पोलिसांना काडीचीही किंमत नाही; त्या भूमीवर ते आपल्याला अटक करू शकत नाहीत, म्हणजे आपण सहजासहजी निसटू शकतो. तेव्हा आपण काहीतरी करून मार्सेलिसमध्ये जहाजावरून पलायन करून आपली सुटका करून घेऊ शकतो आणि ब्रिटीश पोलिसांना हातावर हात ठेवून घडत्या गोष्टी बघत राहण्यापलीकडे काही करता येणार नाही, ही ती अद्वितीय योजना; हेच ते चातुर्य जे या धाडसापूर्वी अत्यंत निष्णातपणे योजलं होतं.
भारतात पाठवणी होण्याअगोदर सावरकरांच्या भेटी आलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांना ‘शक्य झाले तर लवकरच मार्सेयला भेटू’ असा संदेश वजा विचार देऊन आले. सहकारी आचार्य काय ते समजून चुकले आणि ८ जुलै, तो पराक्रमाचा दिवस उजाडला. ८ जुलै रोजी सकाळीच बंदिवासातील सावरकरांना भारताच्या दिशेने घेऊन निघालेली एस. एस. मोरिया ही बोट फ्रान्सच्या मार्सेय बंदराजवळ उभी होती. त्यावेळी हीच योग्य संधी आहे हे लक्षात घेऊन सावरकरांनी योजनेनुसार पोलिसाला शौचालयात जाण्याची परवानगी मागितली. त्यांना परवानगी दिली गेली.
शौचालयात भिंतीच्या वरच्या बाजूस एक पोर्ट होल अर्थात समुद्राच्या बाजूने उघडणारी एक खिडकी होती, ज्यात एक माणूस कसाबसा मावू शकेल अशी छोटी जागा होती. याच पोर्ट होल मधून निसटण्याचा निश्चय सावरकरांनी केला. सहा साडेसहा फूट उंचीवर असलेलं ते पोर्ट होल चढण्यास सोपे तर अजिबात नव्हते; आधीच उंच त्यात सरपटत बाहेर पडायचे आणि पलीकडे अथांग समुद्र, हे म्हणजे वाटते तितके सोपे काम नक्कीच नव्हते. ते अत्यंत धाडसाचे आणि तेवढेच जोखमीचे होते, कारण उडी थोडी जरी चुकली तरी बोटीच्या खालून आलेल्या रॅम्पवर डोके आपटून थेट मृत्यू ओढवू शकला असता, पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हे आव्हान पेलले. योजना तर आखली आणि तत्काळ अंमलबजावणीही केली. शौचालयाच्या दारावर, जिथून बाहेर उभे पोलीस आतल्या कैद्यावर लक्ष ठेऊ शकत होते, त्या दारच्या खाचेवर सावरकरांनी कपडे अडकवून ठेवले जेणेकरून पोलिसांना आतले काही दिसणार नाही; आणि बघता बघता सावरकर त्या साडेसहा फूट उंच पोर्ट होलच्या खिडकीत चढले आणि बाहेरच्या बाजूस सरकून पुढच्या क्षणात खालचा रॅम्प चुकवत झेपावले, ते थेट त्या मार्सेलिसच्या अथांग समुद्रात! हीच ती उत्तुंग भरारी, वर्करणी एका राजकीय कैद्याचे पलायन म्हणवली जाणारी झेप, जिने इतिहास घडवला आणि अख्ख्या जगात जी बराच काळ चर्चेचा विषय बनून राहिली. पण इथेच हे शौर्य संपत नाही, खरा पराक्रम तर पुढची अनेक आव्हाने पार करून सुखरूप फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहोचण्यात होता.
एवढ्यात सावरकर निसटले ही खबर पोलिसांना मिळालीच होती, कारण शौचालयात खूप वेळ लागतो आहे म्हणून दार तोडून आत आलेल्या पोलिसाने सावरकरांचे पाय पोर्टहोल मधून बाहेर पडताना पाहिले होते. लगेच पोलिसांनी बोटीवरून सावरकरांच्या दिशेने गोळीबार सुरू केला, छोट्या होड्या देखील पाण्यात उतरवण्यास तयार केल्या, पण त्यांना पाठलाग करायचा होता तो सावरकर नावाच्या असामान्य धैर्याच्या भारतीय क्रांतिकारकाचा. जहाजापासून फ्रान्सच्या मार्सेलिस किनाऱ्याचे अंतर सुमारे ५०० यार्ड होते; सावरकरांनी तो समुद्र पोहत पार केलाच, पण त्याहून मोठे आव्हान होते—समोर किनाऱ्याला लागून भिंत उभी ठाकली होती, ८ फूट उंच आणि गुळगुळीत दगडाची. मागाहून येत असलेले पोलीस आणि त्या समुद्राच्या थंड पाण्यात देह भिजलेला; विचार करवत नाही की त्या असामान्य देहाला कित्येक यातना होत असाव्यात. पण हा महामानव, जो मृत्यूला कधी घाबरला नाही आणि संसाराची राखरांगोळी करून देशप्रेमापोटी सर्वस्व अर्पिलेला तो क्रांतिसूर्य, तो ती भिंत जणू पार करून फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहोचला. हे एक अचाट शौर्य होतं; याबद्दल लिहावे तेवढे थोडेच. अत्यंत निष्णातपणे योजना आखून ती तडीस नेणारा क्रांतिवीर आता फ्रान्सच्या भूमीवर कैदी नव्हता, मुक्त होता. इथे त्याला ते ब्रिटीश पोलीस हातही लावू शकणार नव्हते, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. थोड्याच वेळात ब्रिटीश पोलीस किनाऱ्यावर पोहोचले आणि सावरकरांचा पाठलाग सुरू केला. सावरकरही धीराने धावत सुटले कारण योजनेचा दुसरा भाग म्हणजे इंग्लंडमधील त्यांचे सहकारी शामजी कृष्ण वर्मा आणि मॅडम कामा त्यांना येऊन मदत करणार होते, पण त्यांना पोहोचायला नेमका उशीर झाला होता. त्यात सावरकरांना फ्रान्सच्या पोलिसांनी अडवले. सावरकरांनी इंग्रजीमध्ये त्यांना परिस्थिती समजावून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण पोलिसांना ते समजले नाही; त्यात ब्रिटीश पोलिसांनी फ्रेंच पोलिसांना थोडीफार लाच देऊन सावरकरांचा ताबा घेतला. फ्रान्सच्या भूमीवर अनधिकृतपणे सावरकरांना अटक केली आणि परत मोरिया बोटीवर आणले गेले.
सावरकरांचा हा पराक्रम किंचित अपयशी वाटत असला तरी यातून अनेक गोष्टी साध्य झाल्या; ब्रिटीश सरकारची प्रचंड प्रमाणात छी-थू झाली, ब्रिटीश सरकार भारताप्रती कसे अनैतिक कार्य करते आहे हे जगापुढे आले. जगभरातील वृत्तपत्रांत या महापराक्रमी उडीचे वर्णन छापले गेले. प्रकरण हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यावे लागले. परकीय देशाच्या एकाच माणसामुळे दोन राष्ट्रांत भांडणे लागण्याचे दुसरे कुठलेही उदाहरण इतिहासात सापडणार नाही. काहीजण तर असेही म्हणतात की सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा होऊन जेव्हा भारतातून बोटीद्वारे अंदमानाला पाठवले जात होते, त्यावेळी फ्रान्सची एक पाणबुडी सावरकरांच्या बोटीच्या मागे पाठवली गेली; कारण फ्रान्सला असे वाटत होते की ह्या मानवाची शाश्वती नाही, कदाचित हा मनुष्य पुन्हा बोटीवरून समुद्रात झेपावेल आणि आपण त्याला परत मुक्त करून फ्रान्समध्ये आणू.
अखंड विश्वात खळबळ माजवणारे हे असामान्य शौर्य करू शकणारा हा सुपुत्र भारतमातेला लाभला; इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये 'हा व्यक्ती आपल्याला शत्रू म्हणून लाभला' याकरिता आभार व्यक्त केले जातात, हे थोडे थोडे नव्हेच.
-संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment