चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ बाबूराव अर्नाळकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या साहित्यप्रवासाचा हा लेख-
चंद्रकांत चव्हाण हे बाबूराव अर्नाळकर या टोपणनावाने लिहिणारे मराठी लेखक होते. त्यांचा जन्म ९ जून १९०६ रोजी झाला. मॅट्रिकच्या वर्गात असताना शाळा सोडलेले बाबूराव मराठीतील आघाडीचे रहस्यकथा लेखक होते. त्यांनी काही काळ नोकरी केली. सन १९२८ पासून स्वातंत्र्यचळवळीत भाग घेऊन कारावास भोगला. मुंबईत स्वातंत्र्यसैनिक संघाचे ते अध्यक्ष होते. संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांना ते गुरुस्थानी मानत. सर्वसामान्य लोकांसाठी लिहिण्याची प्रेरणा अच्युतरावांनीच त्यांना दिली. सन १९३३ मध्ये एडगर वॉलिस ह्या इंग्रज लेखकाची 'द फोर जस्ट मेन' (१९०६) ही कादंबरी अर्नाळकरांनी वाचली व सामान्य लोकांसाठी योग्य तो विषय त्यांना मिळाला. तो विषय म्हणजे गुप्तहेरकथा. तथापि 'चौकटची राणी' ही त्यांची पहिली गुप्तहेरकथा मात्र १९४२ च्या फेब्रुवारीत प्रसिद्ध झाली. त्यानंतर सुमारे एक हजार गुप्तहेरकथा लिहून त्यांनी अमाप लोकप्रियता मिळविली. आपल्या गुप्तहेरकथांतून त्यांनी निर्माण केलेल्या धनंजय, छोटू, झुंजार, विजया, काळा पहाड, दर्यासारंग, चारुहास, दिलीपकुमार, भीमसेन, विलास, जयंत, भद्रंभद्र, कृष्णकुमारी इ. नायक-नायिकांनी – विशेषतः धनंजय, झुंजार आणि काळा पहाड यांनी – अनेक मराठी वाचकांच्या मनाची पकड घेतली. गुप्तहेरकथांसारखा वेधक विषय आणि चित्तवेधक कथानक, उत्कंठावर्धक कथनशैली, ओघवती भाषा, आटोपशीर वर्णने आणि एकूण रचनेतील सुटसुटीतपणा इ. गुण यांमुळे सर्वसामान्य वाचकवर्गाचे ते आवडते लेखक ठरले. त्यांनी एकूण १०४२ रहस्यकथा लिहिल्या. खर्या अर्थाने त्यांनी तळागाळातल्या माणसांना मराठी वाचनाची गोडी लावली.
बाबूरावांच्या कथांना पाश्चात्त्य कथांचा आधार असायचा, पण त्या कथा मराठीत लिहिताना महाराष्ट्रीय वातावरणाचा साज असायचा. कथेत कुठेही अश्लीलपण येऊ न देण्याची खबरदारी बाबूराव घेत आणि कथेचा शेवट नेहमी ‘सत्यमेव जयते’ असाच असे. कथेतील प्रसंग वेगळे असले तरी नायक एकच ठेवायचा हे बाबूरावांनी निश्चित केले होते. नायकाचे नाव बाबूरावांना गीता वाचताना सुचले आणि त्यांनी धनंजय हे नाव नक्की केले. बाबूरावांचा कथानायक रुबाबदार, सुस्वभावी, समयसूचक आणि धडाडीचा असल्याने वाचकांना त्याच्या गुणविशेषांची, वागण्याची, बोलण्याची व चालण्याची चांगलीच ओळख असे. अशा या महान रहस्यकथाकाराचे ५ जुलै १९९६ रोजी निधन झाले.
-संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment