३ जुलै हा संत नामदेवांचा समाधी दिन आहे. आपल्या अभंगवाणीतून केवळ ईश्वरभक्तीच नाही तर सामाजिक समरसता, कर्तव्यबोध सांगणाऱ्या संत शिरोमणी नामदेव यांच्या जीवनप्रवासाचा हा आढावा.
संत शिरोमणी नामदेव यांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० रोजी मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी येथे झाला. नामदेवांच्या घरात विठ्ठलभक्तीचे वातावरण होते. नामदेवांनाही बालपणापासून विठ्ठलभक्तीची ओढ लागली. एकदा विठ्ठलासाठी नैवेद्य घेऊन देवळात गेलेले नामदेव, देव नैवेद्य खाईना, म्हणून त्याच्या पायांवर डोके आपटून प्राण द्यावयास निघाले आणि भक्तवत्सल देवाने त्यांची ही भक्ती पाहून नैवेद्य आनंदाने खाल्ला, अशी आख्यायिका आहे. विठ्ठलभक्तीमुळे नामदेव उत्तरोत्तर विरक्त होत गेले. घरातील परिवार मोठा होता. त्याची जबाबदारी नामदेवांनी घेतली पाहिजे, असे त्यांच्या मातापित्यांना वाटत असे. त्यामुळे नामदेवांच्या विठ्ठल वेडाला त्यांच्या घरातून विरोध होऊ लागला. तरीही नामदेव भक्ती-परमार्थाच्या मार्गावरून ढळले नाहीत.
आपली भक्ती गुरूपदेशावाचून अपुरीच आहे, याची जाणीव ह्या भेटीनंतर त्यांना झाली आणि त्यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचरांकडून उपदेश घेतला व त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. अशी आख्यायिका आहे की, नामदेव विसोबांना भेटावया गेले असता, विसोबा शंकराच्या देवळात पिंडीवर पाय ठेवून निजले होते. ते दृश्य पाहून नामदेवांना चीड आली व त्यांनी विसोबांची निर्भर्त्सना केली; परंतु विसोबांनी 'देव नसेल तेथे माझे पाय उचलून ठेव', असे म्हटल्यावर ‘देवाविण ठाव हे बोलणेचि वाव’ हा विचार नामदेवांच्या मनाला भिडला. गुरूपदेशामुळे त्यांचा अहंकार नष्ट झाला. विशुद्ध भक्तीला अद्वैतबोधाचे अधिष्ठान प्राप्त झाले.
‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावूजगी’ ही त्यांची भूमिका होती. संत नामदेवांनी भारतभर अनेक पदयात्रा केल्या. दक्षिणेतील श्री शैलशिखर, अरुणाचल, चिदंबरम्, विष्णुकांची, रामेश्वर आदी ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. गुजरात, सौराष्ट्र, सिंधुप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश येथेही नामदेवांचे वास्तव्य झाले होते. लोक जागृतीच्या ध्येयपूर्तीसाठी त्यांनी विविध प्रदेशांतील भाषा आत्मसात केल्या होत्या.
नामदेव उत्तर भारतात गेले असल्याची अनेक प्रमाणे मिळतात. विशेषतः पंजाबातील त्यांच्या वास्तव्याची व कार्याची नोंद आजही ठळकपणे मिळते. ‘नामदेवजी की मुखबानी’ म्हणून प्रसिद्ध असलेली नामदेवांची हिंदी भाषेतील ६१ पदे शिखांच्या ग्रंथसाहिबात अंतर्भूत आहेत. त्यांतील ३ विवक्षित पदे अन्य कवींची आहेत, असे एक मत आहे. नामदेवांच्या हिंदीवर मराठीची छाप तर आहेच, परंतु ब्रज, अवधी, राजस्थानी अशा भाषांचेही संस्कार आहेत. नामदेवांची सुमारे सव्वाशे हिंदी पदेही आता उपलब्ध झालेली आहेत. विष्णुस्वामी, बहोरदास किंवा बोहरदास, जाल्लो, लध्धा, केसो कलंधर किंवा कलधारी ह्यांसारखे अनेक शिष्य नामदेवांना पंजाबात मिळाले. त्यांपैकी जाल्लो किंवा जाल्हण सुतारासारखे काही शिष्य नामदेवांसोबत पंढरपूरला आले. केसो कलधारी ह्याने भावलपूर संस्थानात भागवत धर्माची ध्वजा फडकविली. तेथे ‘कलधारिकी गद्दी’ ह्या नावाने प्रसिद्ध असलेला त्याचा आश्रम तसेच त्याची समाधीही आहे. नामदेवांची अनेक मंदिरे आज पंजाबात पहावयास मिळतात. पंजाबातील गुरदासपूर जिल्ह्यात घुमान किंवा घोमान गावी असलेले मंदिर (गुरुद्वारा बाबा नामदेवजी) प्रसिद्ध आहे. नामदेवांचे शिष्य बोहरदास यांनी हे मंदिर उभारले, असे म्हणतात. प्रतिवर्षी माघ शुद्ध द्वितीयेस येथे मोठी यात्रा भरते. राजस्थानात आणि उत्तर प्रदेशातही नामदेव मंदिरे आहेत. उत्तर भारतातील रैदास (रविदास किंवा रोहिदास), धना, रज्जब, तुलसीदास, पीपा, रामानंद, कबीर आदींनी नामदेवांचा उल्लेख केलेला आहे. गुजरातमधील विख्यात संत नरसी मेहतांनीही आपल्या काव्यातून नामदेवांचा निर्देश अनेकदा केलेला आहे. देवाने नामदेवांच्या घराचे छप्पर शाकारले, असे राजस्थानातील संत मिराबाईंनी आपल्या एका कवनात म्हटले आहे.
ऐंशी वर्षांचे वय झाल्यानंतर इहलोक सोडून जाण्याचे त्यांनी ठरविले. आषाढ शुद्ध एकादशी, शके १२७२ रोजी विठ्ठलापुढे जाऊन ‘आज्ञा द्यावी’ अशी विनंती केली. त्यानंतर आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ म्हणजेच ३ जुलै १३५० ह्या दिवशी त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलमंदिराच्या महाद्वारात समाधी घेतली. विठ्ठलदर्शनासाठी येणाऱ्या सर्व संतसज्जनांची धूळ आपल्या मस्तकी लागावी, ही त्यांची इच्छा असल्यामुळे महाद्वाराच्या पहिल्या पायरीखालीच हे समाधिस्थान तयार करण्यात आले होते.
संदर्भ- मराठी विश्वकोश
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment