आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस

दरवर्षी 3 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने प्रत्येकाने कापडी किंवा पुनर्वापर करता येणाऱ्या पिशव्यांचा वापर करून प्लास्टिकला नकार देत पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लावण्याचा संकल्प करणे, हाच या दिवसाचा खरा संदेश आहे.

 आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस मुख्य फोटो
मुख्य फोटो

दिनविशेष | ३ जुलै : आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस

"आज कापडी पिशवीची निवड करा; उद्याची पृथ्वी सुरक्षित करा."

दरवर्षी ३ जुलै रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस (International Plastic Bag Free Day) साजरा केला जातो. प्लास्टिक पिशव्यांच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरण, सागरी जीवसृष्टी आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस पाळला जातो.

या दिवसाची सुरुवात २००९ मध्ये 'Zero Waste Europe' या संस्थेच्या पुढाकारातून झाली. प्लास्टिकमुक्त आणि शाश्वत भविष्य घडविण्यासाठी नागरिकांनी एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा त्याग करून पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारावेत, हा या दिवसामागील मुख्य संदेश आहे. आजही मोठ्या बाजारपेठांपासून ते भाजी मंडईपर्यंत अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच आहे. परिणामी, समुद्रातील प्लास्टिक प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून मासे, कासवे, पक्षी आणि इतर सागरी जीवांच्या अस्तित्वावर गंभीर संकट निर्माण झाले आहे. प्लास्टिकमुळे गटारे तुंबणे, मातीची सुपीकता कमी होणे आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे.

प्लास्टिक हा असा पदार्थ आहे ज्याचे सहज विघटन होत नाही. प्लास्टिक पिशव्यांचे पूर्ण विघटन होण्यासाठी साधारण ४०० ते ५०० वर्षे लागतात. त्या जमिनीत पुरल्या तर नष्ट होत नाहीत, तर जाळल्यास विषारी वायू निर्माण होऊन हवेचे प्रदूषण होते आणि विविध आजारांचा धोका वाढतो.

प्लास्टिक प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांनी कठोर पावले उचलली आहेत. २०२२ मध्ये एकेरी वापराच्या (Single Use) प्लास्टिकवर बंदी लागू करण्यात आली. भारतातही सिंगल युज प्लास्टिकवर बंदी आहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी अजूनही अनेक ठिकाणी आव्हानात्मक ठरत आहे. बंदी असूनही प्लास्टिक पिशव्यांची अवैध विक्री आणि वापर सुरू असल्याचे चित्र दिसून येते.

पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून बदलाची सुरुवात करणे आवश्यक आहे. घराबाहेर पडताना कापडी किंवा पुनर्वापर करता येणारी पिशवी सोबत ठेवणे, प्लास्टिक पिशवी नाकारणे आणि इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करणे ही काळाची गरज आहे.

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस कसा साजरा करावा?

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्लास्टिकमुक्त जीवनशैलीबाबत जनजागृती करणे.

स्थानिक स्वच्छता मोहिमा, रॅली, कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे.

कापडी, कागदी किंवा पुनर्वापर करता येणाऱ्या पिशव्यांचा वापर करण्याचा संकल्प करणे.

आपल्या परिसरात प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी नागरिकांना प्रेरित करणे.

संदेश :

"प्लास्टिकला नकार, पर्यावरणाला आधार. आजची छोटी सवय उद्याची सुरक्षित पृथ्वी घडवू शकते."

-संकलित

Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 03-07-2026 News publication date | Time: 12:26 PM News publication time | Views: 130 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 03-07-2026 News publication date | Time: 12:26 PM News publication time | Views: 130 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement