डॉक्टर म्हणजे खरे देवदूतच!

आज राष्ट्रीय डॉक्टर्स दिन आहे. त्या निमित्ताने या दिवसाचा इतिहास आणि डॉक्टरांचे मानवी आयुष्यातील महत्त्व सांगणारा हा लेख-

डॉक्टर म्हणजे खरे देवदूतच! मुख्य फोटो
मुख्य फोटो

एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याच्या सुरुवातीपासून त्याच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक टप्प्यावर डॉक्टर त्याच्यासोबत असतो. मूल जन्माला येताना त्या बाळाला जगात आणणारा डॉक्टरच असतो. त्यानंतर बाळाला रोगांपासून वाचवण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती आणि लसीकरण इत्यादीची जबाबदारी डॉक्टरांची असते. जसजसे मूल वाढते, तसतसे त्याच्या शरीरात बदल सुरू होतात. या सर्व बदलांचा, समाजाचा आणि जीवनशैलीचा मानवी आरोग्यावर परिणाम होत असतो. शारीरिक आणि मानसिक समस्यांनी ग्रासलेल्या व्यक्तीच्या सर्व वेदना आणि रोग केवळ एक डॉक्टरच बरे करतो. त्यामुळे भारतात डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. डॉक्टरांच्या या सेवाभावनेचा, जीव वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा केला जातो.
दरवर्षी १ जुलै हा दिवस भारतभर राष्ट्रीय डॉक्टर्स दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस डॉक्टरांच्या अथक सेवेचा आणि त्यांच्याद्वारे आरोग्य क्षेत्रात केलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यासाठी समर्पित आहे. डॉक्टर होणे म्हणजे निव्वळ एखादा व्यवसाय करणे नाही, तर तो मानवतेची सेवा करण्याचा एक महान मार्ग आहे. हा दिवस केवळ डॉक्टरांच्या कष्टांचा सन्मान करण्यापुरता मर्यादित नाही, तर आरोग्यसेवा क्षेत्रातील आव्हाने, सुधारणा आणि नव्या संशोधनांवर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाचे निमित्त देखील आहे.

• राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचा इतिहास आणि महत्त्व
भारत सरकारने सन १९९१ मध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. हा दिवस डॉक्टरांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी आणि वैद्यकीय क्षेत्रात त्यांच्या योगदानाला उजाळा देण्यासाठी राखीव आहे. हा दिवस विशेषतः डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्याशी निगडीत आहे, जे पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि एक सुप्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांच्या जीवनातील एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा जन्म आणि मृत्यू दोन्ही १ जुलै रोजी (१८८२ ते १९६२) झाले, ज्यामुळे हा दिवस अधिक खास बनतो. डॉ. रॉय यांनी भारतीय वैद्यकीय शिक्षण आणि प्रशासन क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

• डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्याविषयी-
डॉ. बी. सी. रॉय हे एक वैद्य, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी होते.
डॉ. रॉय हे ब्राह्मो समाजाचे अनुयायी होते. त्यांनी बंगालमध्ये (१९३० मध्ये सुरू झालेल्या) सविनय अवज्ञा चळवळीचे नेतृत्वही केले. डॉ. बिधान चंद्र रॉय यांनी पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्यांना १९६१ साली देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, 'भारतरत्न' प्रदान करण्यात आला होता. वैद्यकशास्त्र, राजकारण, विज्ञान, तत्त्वज्ञान, साहित्य आणि कला या क्षेत्रांतील कार्यासाठी १९७६ साली त्यांच्या नावाने 'बी. सी. रॉय राष्ट्रीय पुरस्काराची' स्थापना करण्यात आली. त्यांचे कार्य वैद्यकीय क्षेत्राच्या प्रगतीसाठी अत्यंत मौल्यवान ठरले. त्यांच्या जन्मदिवस आणि पुण्यतिथीच्या स्मरणार्थ १ जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर्स दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस डॉक्टरांच्या समर्पणाचा आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा एक महत्त्वाचा क्षण आहे.

• या दिवसाचे उद्दिष्ट
 डॉक्टरांच्या सेवाभाव आणि समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे
 जनतेमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे
 तरुण पिढीला वैद्यकीय क्षेत्रात येण्यासाठी प्रेरित करणे
 वैद्यकीय सेवांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवणे
डॉक्टरांना आपण देवदूत म्हणतो. आपल्याला देवाने जे जीवन दिले आहे, ते आरोग्यपूर्णरित्या व्यतीत करण्यासाठी डॉक्टरांची मदत होते. अगदी सर्दी-खोकल्यापासून कर्करोगासारख्या भयंकर आजारापर्यंत सर्वांचे उपचार डॉक्टरच करतात. कोरोना काळातील त्यांची सेवा तर खरंच अविश्वसनीय होती. कित्येक डॉक्टरांनी रुग्णांसाठी आपल्या प्राणांचीही पर्वा केली नाही. समर्पित वृत्तीने ते रुग्णाचे उपचार करतात. या देवदूतांना त्रिवार वंदन!!
-संकलित

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 01-07-2026 News publication date | Time: 11:41 AM News publication time | Views: 70 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 01-07-2026 News publication date | Time: 11:41 AM News publication time | Views: 70 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement