जेव्हा समर्थ रामदास गुरु हरगोविंद सिंहाना भेटतात…!

गुरू हरगोविंदसिंहजी यांच्या जयंतीनिमित्त समर्थ रामदास आणि त्यांच्या अविस्मरणीय भेटीची ही रोमांचक कथा!

जेव्हा समर्थ रामदास गुरु हरगोविंद सिंहाना भेटतात…! मुख्य फोटो
मुख्य फोटो

गढवाल टेकड्यांमध्ये अलकनंदा नदीच्या काठावर वसलेलं अत्यंत निसर्गरम्य ठिकाण – श्रीनगर! (आताच्या उत्तराखंडातील पौडी गढवाल जिल्हा). सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला राजा अजय पाल याने अनेक गढ्यांना एकत्र करून एकसंध अशा गढवाल राज्याचा पाया रचला. या राज्याची राजधानी म्हणजे हे श्रीनगर! इथेच इ.स. १६३४ च्या आसपास संतशक्तीच्या भेटीचा एक विलक्षण योग भारतीय इतिहासाने अनुभवला! एकीकडे होता वैराग्य आणि शौर्य यांचा अद्भुत संगम, म्हणजेच अनेक युद्धांत प्रत्यक्ष नेतृत्व करणारे शिखांचे गुरु… तर समोर होते १२ वर्षे कठोर तपश्चर्या करून उत्तर भारतात भ्रमंतीसाठी आलेले दख्खनच्या भूमीचे सामर्थ्यशाली संत चैतन्य!

ही वरवर दोन व्यक्तींची वा संन्याशांची साधी भेट वाटून घेण्यासारखी नाही. 'शमप्रधानेषु तपोधनेषु गूढं हि दाहात्मकमस्ति तेज..!' (क्षमाशील अशा तपोनिधीच्या अंतरात गूढ असं दाहात्मक तेजही असतं) या कालिदासाच्या उक्तीनुसार… अंगावर भगवी वस्त्रं आणि वृत्तीमध्ये वैराग्य असूनही अंतरात स्वधर्मनिष्ठेचं प्रखर तेज बाळगणार्‍या दोन राष्ट्रद्रष्ट्यांची ती भेट होती! त्यांच्यात घडलेला संवाद कितीतरी गोष्टींची उकल करून जातो!

सतराव्या शतकाची सुरुवात…! शीख पंथाचा वाढता प्रसार मुघलांना खुपत होता. अनेक लोक शीख पंथ अंगीकारत असल्यानं त्यांची शक्ती दिवसेंदिवस वाढत होती. या धर्माचं प्राबल्य कमी करण्यासाठीचा एक प्रयत्न म्हणून बादशहा जहागीरने पाचवे गुरु अर्जुनदेव यांना इ.स. १६०६ मध्ये लाहोरमध्ये कैदेत टाकले. इस्लाममध्ये धर्मांतरित होण्यासाठी त्यांचा अनन्वित छळ केला गेला, पण त्यांनी हौतात्म्य पत्करले! त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र हरगोविंद सिंहजी अवघ्या अकराव्या वर्षी गुरुंच्या गादीवर बसले. पित्याच्या बलिदानाने पेटून उठलेल्या गुरु हरगोविंदांनी शक्ती वृद्धिंगत करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. बळकट शरीर कमावून स्वतः शस्त्र उचलण्यासोबतच त्यांनी शिखांच्या सांघिक शस्त्रप्रशिक्षणावरही भर दिला. शीख पंथात सशस्त्र सैन्याची परंपरा त्यांनी सुरू केली. गुरु हरगोविंद स्वतः दोन तलवारी धारण करत – एक (मिरी) ऐहिक आणि दुसरी (पिरी) आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक! मुघलांविरुद्ध रोहिला, करतारपूर, अमृतसर अशा अनेक लढायांमध्ये त्यांनी सैन्याचे नेतृत्व केले आणि बादशहा शहाजहानला मोठा शह दिला. उत्तम शरीर कमावून अन्यायाविरुद्ध सशस्त्र लढा देण्याची त्यांनी निरंतर प्रेरणा दिली!

असे गुरु हरगोविंद सिंहजी नानकमत्ता (उत्तराखंड, जिल्हा- उधमसिंहनगर) येथील शिखांच्या पवित्र तीर्थाला भेट दिल्यानंतर एका मोहिमेवरून परत येत होते. तेव्हा या भागात भ्रमंती करणाऱ्या समर्थ रामदासांशी त्यांची भेट झाली! गुरु हरगोविंद सिंहजी घोड्यावर बसलेले होते, त्यांच्या हातात आणि कमरेला अशा दोन तलवारी होत्या. लढणारा मोठा ताफाही सोबत होता. हे पाहून समर्थांनी आश्चर्य व्यक्त करत औत्सुक्यापोटी त्यांना विचारले, “आम्ही असं ऐकलं आहे की आपण सध्या गुरु नानकांची गादी चालवत आहात. गुरु नानक तपस्वी होते, त्यांनी वैराग्य धारण करून या संसाराचा त्याग केला होता. पण आपण तर शस्त्र धारण केलंय, घोड्यावर बसलात आणि ही लढाऊ फौज सुद्धा बाळगता! असं सगळं असून स्वतःला “सच्चा पादशहा” अर्थात् खरा राजा असंही म्हणवता! आपण कोणत्या प्रकारचे साधू आहात?”

यावर गुरु हरगोविंद सिंहजींनी तत्काळ उत्तर दिले, “आम्ही अंतरात साधू पण बाह्यरूपानं राजकुमार आहोत. हे शस्त्र धारण केलंय ते सज्जनांच्या रक्षणासाठी आणि जुलुमी सत्तेच्या विनाशासाठी. गुरु नानकांनी या संसाराचा नव्हे तर मोहमायेचा त्याग केला होता.”

त्यांचे प्रत्यक्ष शब्द असे होते, “बतन फकिरी, जहिर अमिरी, शस्तर गरीब की राख्या, जरवान की भाकिया. बाबा नानक संसार नही त्याग्या, माया त्यागी थी!” गुरूंकडून त्वरित मिळालेला प्रतिसाद बघून आणि त्यांचे विचार ऐकून समर्थ अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी मोकळ्या मनानं गुरूंची प्रशंसा केली, “यह हमारे मन भावती है|” अर्थात् आम्हाला हा विचार अतिशय आवडला! भारताच्या इतिहासातील ही किती रोमांचकारी घटना वाटते!

पद्मभूषण डॉ. गंडा सिंह, सतबीर सिंह, हरबंस सिंह असे अनेक प्रसिद्ध शीख इतिहासकार त्यांच्या लेखनात आवर्जून उल्लेख करतात की, अत्यंत दुर्मिळ असलेल्या पंजाबी हस्तलिखितामध्ये (पोथी) “पंजाह साखीया” मध्ये या भेटीचे आणि संभाषणाचे वर्णन आहे. त्यातूनच ते पुढे गुरु हरगोविंद सिंहांचे चरित्र तसंच शीख इतिहासाचा अविभाज्य भाग झाले. (समर्थांना मराठा संत समर्थ रामदास असं संबोधलेलं दिसून येतं). याचप्रमाणे श्री हनुमंत स्वामी यांनी लिहिलेली रामदास स्वामींची बखरही या भेटीला आणि संभाषणाला पुष्टी देते, असाही तज्ञांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तथापि, हे दोन्ही मूळ संदर्भ आता दुर्मिळ असल्यामुळे यात नव्या दृष्टिकोनातून अधिक संशोधनाची गरज आहे, हे जाणवते. कारण या व्यतिरिक्त या दोघांमध्ये काही वैचारिक देवाणघेवाण झाली असेल, तर ती समजून घेणं म्हणजे मोठीच पर्वणी ठरेल!

गुरू हरगोविंद सिंहजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन!

-संकलित

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 30-06-2026 News publication date | Time: 04:42 PM News publication time | Views: 54 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 30-06-2026 News publication date | Time: 04:42 PM News publication time | Views: 54 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement