भारताचे श्रेष्ठ पितामह-दादाभाई नौरोजी

३० जून हा दादाभाई नौरोजी यांचा स्मृतीदिन; त्यानिमित्त त्यांच्या राजकीय आणि शैक्षणिक जीवनप्रवासाचा हा लेखरूपी आढावा-

भारताचे श्रेष्ठ पितामह-दादाभाई नौरोजी मुख्य फोटो
मुख्य फोटो

दादाभाई नौरोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक, थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १८२५ रोजी मुंबईत एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील नौरोजी पालनजी दोर्दी आणि आई माणेकबाई होती. दादाभाई चार वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. प्रतिकूल परिस्थितीतही माणेकबाईंनी दादाभाईंचे संगोपन केले आणि शिक्षण पूर्ण केले. एल्फिन्स्टन संस्था आणि एल्फिन्स्टन महाविद्यालय यांमधून शिक्षण घेऊन सन १८४५ मध्ये ते पदवीधर झाले. सन १८५० मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयात दादाभाईंची गणित व तत्त्वज्ञान या विषयांचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. या महाविद्यालयात प्राध्यापक पदावर नेमलेले दादाभाई हे पहिले भारतीय होते.

दादाभाई सन १८५५–५६ च्या सुमारास कामा यांच्या लंडनमधील व्यवसायातील एक भागीदार म्हणून लंडनला गेले; तेथे त्यांचा ‘मँचेस्टर कॉटन सप्लाय असोसिएशन’, ‘कौन्सिल ऑफ लिव्हरपूल’, ‘अथेनियम’, ‘नॅशनल इंडियन असोसिएशन’ इ. संस्थांशी जवळचा संबंध आला. सन १८६५–६६ पर्यंत त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गुजराती विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. सन १८६५ साली लंडनमध्ये डब्ल्यू. सी. बॅनर्जी यांच्यासमवेत दादाभाईंनी ‘लंडन इंडिया सोसायटी’ ही संस्था स्थापन केली. सन १९०७ पर्यंत ते तिचे अध्यक्ष होते. १८६२ मध्ये दादाभाई ‘कामा अँड कंपनी’ मधून बाहेर पडले आणि त्यांनी ‘दादाभाई नौरोजी अँड कंपनी’ अशी स्वतःचीच कंपनी उभारली. १८६६ मध्ये त्यांनी लंडनमध्ये ‘ईस्ट इंडिया असोसिएशन’ या संस्थेची स्थापना केली आणि ते तिचे सचिवही होते. १८७३ मध्ये भारतीय अर्थकारणाविषयी नेमलेल्या संसदीय समितीपुढे (फॉसेट कमिटी) दादाभाईंनी साक्ष दिली.

दादाभाईंची १८७४ मध्ये बडोदे संस्थानचे दिवाण म्हणून नियुक्ती झाली; तथापि एका वर्षातच महाराज आणि रेसिडेंट यांच्याशी उद्भवलेल्या मतभेदांमुळे त्यांनी दिवाणपदाचा राजीनामा दिला. जुलै १८७५ मध्ये ते मुंबई नगरपालिकेचे सभासद म्हणून व नगरपालिकेच्या शहरपरिषदेवरही निवडून आले. १८७६ मध्ये या दोन्ही पदांचा राजीनामा देऊन ते लंडनला गेले. १८८३ मध्ये ते ‘जस्टिस ऑफ द पीस’ झाले आणि दुसऱ्यांदा मुंबई नगरपालिकेवर निवडून आले. ऑगस्ट १८८५ मध्ये गव्हर्नर लॉर्ड रे यांच्या निमंत्रणावरून दादाभाईंनी मुंबई विधानपरिषदेचे सदस्यत्व स्वीकारले. त्या वर्षाच्या अखेरीस, दादाभाईंनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महत्त्वाचा वाटा उचलला. काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना तीन वेळा (१८८६, १८९३, १९०६) लाभला. १९०२ साली दादाभाई लंडनच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये लिबरल पक्षातर्फे सदस्य म्हणून सेंट्रल फिन्झबरीमधून निवडून आले. ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळविणारे आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी संसदेमध्ये आवाज उठविणारे दादाभाई हे पहिले भारतीय होते.

दादाभाईंची १८९७ मध्ये ‘रॉयल कमिशन ऑन इंडियन एक्स्पेंडिचर’ ह्या सेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगावर एक सदस्य म्हणून नियुक्ती झाली. या आयोगापुढे त्यांनी साक्षही दिली. ॲम्स्टरडॅम येथे १९०५ साली भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महासभेसाठी (इंटरनॅशनल सोशलिस्ट काँग्रेस) दादाभाईंनी भारताचे प्रतिनिधित्व केले. १९०६ च्या कलकत्ता काँग्रेसमध्ये भारताच्या समस्यांवर ‘स्वराज्य’ हा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी घोषित केले.

इंग्लंडमधील कॉमर्स, इंडिया, कंटेंपररी रिव्ह्यू, द डेली न्यूज, द मँचेस्टर गार्डियन, पिअर्सन्स मॅगझीन ह्यांसारख्या महत्त्वाच्या नियतकालिकांमधून दादाभाईंचे अनेक लेख व निबंध प्रसिद्ध झाले. १८४८ साली स्थापन झालेल्या ‘स्ट्यूडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ या संस्थेच्या ‘स्ट्यूडंट्स लिटररी मिसेलनी’ या मासिकामधून (१८५०) त्यांचे नियमित लेख येत असत. ज्ञानप्रकाश नावाचे एक गुजराती नियतकालिक त्यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होत असे. १८८९ मध्ये आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने दादाभाईंनी ‘रास्त गोफ्तार’ (ट्रूथ टेलर) नावाचे एक गुजराती साप्ताहिक सुरू करून त्याचे दोन वर्षे संपादन केले. हे साप्ताहिक पुरोगामी विचारांसाठी प्रसिद्ध होते. दादाभाईंनी १८७८ मध्ये ‘पॉव्हर्टी ऑफ इंडिया’ नावाची एक पुस्तिका प्रसिद्ध केली; तिचेच पुढे पुनर्मुद्रित व विस्तारित अशा एका ग्रंथात रूपांतर करण्यात आले आणि तो ग्रंथ लंडनमध्ये ‘पॉव्हर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया’ ह्या शीर्षकाने प्रथम १९०१ व नंतर १९११ मध्ये प्रकाशित करण्यात आला. हा ग्रंथ अतिशय गाजला. पॉव्हर्टी इन इंडिया, द कंडिशन ऑफ इंडिया ह्यांसारखे निवडक निबंध, हाउस ऑफ कॉमन्स मधील भाषणे, ‘रॉयल कमिशन ऑन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ एक्स्पेंडिचर इन इंडिया’ या आयोगाशी केलेला पत्रव्यवहार, इतर निवडक भाषणे इत्यादींचा या ग्रंथात समावेश होतो. या ग्रंथातून दादाभाईंनी भारताचे राष्ट्रीय उत्पन्न, भारताचे दारिद्र्य, नीती आणि भारताचे आर्थिक शोषण हा सिद्धांत (ड्रेन थिअरी) इ. समस्यांचा ऊहापोह केलेला आहे.

भारतीय अर्थशास्त्रीय विचारधारेमधील दादाभाईंचे मौलिक कार्य म्हणजे त्यांनी केलेले भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे निर्धारण. निरनिराळी मंडळे, समित्या व संस्था ह्यांमधून त्यांनी दिलेली व्याख्याने ‘दादाभाई नवरोजीज स्पीचेस अँड रायटिंग्ज’ ह्या शीर्षकाने ग्रंथरुपात आहेत. ‘द राइट ऑफ लेबर’ या शीर्षकाने दादाभाईंनी औद्योगिक आयुक्तांची नेमणूक आणि कामगारांना संरक्षणाचा हक्क या दोहोंसंबंधी एक योजना प्रसिद्ध केली होती. जर या योजनेचे अधिनियमात रूपांतर झाले असते, तर सर्व वेतनधारकांना न्याय मिळाला असता आणि औद्योगिक शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली असती. ब्रिटिशांनी चालविलेल्या हिंदुस्थानच्या आर्थिक प्रशासनाबाबत दादाभाई कठोर टीकाकार होते. ह्या प्रशासनावर करण्यात यावयाच्या खर्चाचे सुयोग्य वितरण होत नसल्याची त्यांची तक्रार होती. प्लेग, दुष्काळ यांसारख्या संकटांचे निवारण करण्याच्या अथवा त्यांबाबत प्रतिबंधक उपाय योजण्याच्या कामी सरकार फार कमी पैसे खर्च करते, असे दादाभाईंचे मत होते. दादाभाईंचा आर्थिक स्वयंपूर्णतेवर तसेच कुटिरोद्योगांच्या महत्त्वपूर्ण स्थानावर विश्वास होता. अनैसर्गिक आर्थिक गोंधळात रुतलेल्या भारताला स्वदेशी उद्योगधंद्यांवाचून पर्याय नाही, असे त्यांचे ठाम मत होते. असे असूनही देशातील महत्त्वाच्या आणि मूलभूत उद्योगांच्या उभारणीसाठी प्रगत यंत्रसामग्रीचा वापर करण्यास त्यांचा विरोध नव्हता. दादाभाईंनी जमशेटजी टाटांना लोखंड आणि पोलाद कारखाना उभारण्याच्या वेळी भारतीय जनतेकडून भांडवल गोळा करण्याचे आवर्जून आवाहन केले होते.

एक समाजसुधारक म्हणून दादाभाईंचा लौकिक होता. जातिनिष्ठ मर्यादा पाळणे त्यांना मान्य नव्हते. स्त्री-पुरुष समानता, स्त्रीशिक्षण यांचा त्यांनी सतत पुरस्कार केला. ‘द स्ट्यूडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ ह्या संस्थेच्या वतीने त्यांनी मुलींसाठी तीन मराठी व चार गुजराती शाळा उघडल्या. दादाभाईंच्या ह्या समाजकार्याला जगन्नाथ शंकरशेट यांसारख्यांनी मोठा हातभार लावला.

दादाभाई हे प्रखर राष्ट्रवादी वृत्तीचे होते. ते प्रभावी वक्ते होते. इंग्रजी व गुजराती या दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. ‘भारताचे श्रेष्ठ पितामह’ हे सार्थ बिरुद त्यांना लावण्यात येते. भारताच्या राष्ट्रीय आंदोलनाच्या इतिहासात त्यांचे नाव आणि कार्य चिरंजीव स्वरूपाचे आहे. दादाभाईंचे मुंबई येथे ३० जून १९१७ रोजी निधन झाले.
-संकलित

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 30-06-2026 News publication date | Time: 11:29 AM News publication time | Views: 55 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 30-06-2026 News publication date | Time: 11:29 AM News publication time | Views: 55 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement