सौर ऊर्जा क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ सोलापुरात तयार होणार
सोलापूर : भविष्यातील ऊर्जेची गरज आणि सौर ऊर्जेचे महत्त्व ओळखून, अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सहकार्याने सोलापुरात अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या बॅचचे उद्घाटन १७ डिसेंबर २०२५ रोजी झाले. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील तरुणांना सौर ऊर्जा क्षेत्रात तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी अमृत संस्थेचे पुणे विभागीय व्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णी यांनी प्रशिक्षणार्थ्यांना सौर ऊर्जा क्षेत्रातील जागतिक संधी आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक श्रेयस कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील सौर प्रकल्पांच्या व्याप्तीवर प्रकाश टाकला. जिल्हा उपव्यवस्थापक बिरुदेव वाघमोडे यांनी शिस्तीचे आणि तांत्रिक ज्ञानाचे महत्त्व विशद केले.
युवकांनी कौशल्यविकासाकडे वळणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन एलबीपीएम कॉलेजचे कौशल्य विभागप्रमुख प्रा. प्रदीप पाटील यांनी केले. हे प्रशिक्षण पूर्णपणे निवासी असून, यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना सोलर पॅनेल इन्स्टॉलेशन, मेंटेनन्स आणि उद्योजकता विकासाचे सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन एमसीईडीचे सोलापूर प्रकल्प अधिकारी राजशेखर शिंदे आणि एमसीईडीचे कार्यक्रम आयोजक राम सुतार यांनी केले. या वेळी सौ. आयेशा मॅडम यांच्यासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
शासकीय योजना आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निर्धार उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला. या निवासी प्रशिक्षणामध्ये केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे, तर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिला जाणार असल्याने प्रशिक्षणार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment