प्रख्यात व्हायोलीनवादक व ग्वाल्हेर घराण्याचे नामवंत गायक- गजानन जोशी

गजानन अनंत जोशी हे प्रख्यात व्हायोलीनवादक व ग्वाल्हेर घराण्याचे नामवंत गायक होते. आज त्यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्त त्यांच्या संगीतप्रवासाचा हा आढावा-

प्रख्यात व्हायोलीनवादक व ग्वाल्हेर घराण्याचे नामवंत गायक- गजानन जोशी मुख्य फोटो
मुख्य फोटो

गजाननराव जोशी हे ‘गजाननबुवा जोशी’ म्हणून ओळखले जात. त्यांचा जन्म ३० जानेवारी १९११ रोजी गिरगाव, मुंबई येथे झाला. गजाननबुवांचे घराणे संगीताचा वारसा जपणारे होते. त्यांचे आजोबा मनोहर यांनी ध्रुपद व धमार गायकीचा अभ्यास केला होता. ते देखील उत्तम गवई होते. त्यांचे वडील अनंत (अनंत मनोहर जोशी उर्फ अंतुबुवा) हे प्रसिद्ध ख्याल गायक होते. गजाननबुवांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा अभ्यास केला. आग्रा घराण्याचे विलायत हुसेन खान व जयपूर-अत्रौली घराण्याचे भुर्जी खान हेही त्यांचे संगीत गुरू होते. त्यांचे वडील पं. अनंत मनोहर जोशी (अन्तुबुवा) यांना गायनाकरिता औंध संस्थानची शिष्यवृत्ती मिळाली होती. ते औंध संस्थानचे राजगायकही होते.

अन्तुबुवांनी गिरगावला राहत्या घरी ‘श्रीगुरुसमर्थ गायनवादन विद्यालय’ सुरू केले होते. त्यामुळे लहानग्या गजाननबुवांवर बालपणापासूनच संगीताचे संस्कार झाले. त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण झाले. पुढे गजाननबुवांच्या वडिलांनी त्यांना घरीच गायनाचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. विनायकबुवा घांग्रेकर यांच्याकडून ते तबला शिकले. यथावकाश त्यांनी रामकृष्णबुवा वझे (ग्वाल्हेर घराणा) आणि प्रौढवयात उस्ताद भूर्जीखाँ (जयपूर घराणा), उस्ताद विलायत हुसेनखाँ (आग्रा घराणा) यांच्याकडेही गाण्याची तालीम घेतली. वयाच्या साधारण सोळाव्या वर्षापासून ते व्हायोलीन वादनाचे जाहीर कार्यक्रम करू लागले. सन १९२८ पासून त्यांनी मुंबई आकाशवाणीवर गायन व व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी एच.एम.व्ही. कंपनीने त्यांच्या व्हायोलीन वादनाची पहिली ध्वनिमुद्रिका काढली. ती खूप गाजली. पुढे दिल्ली आकाशवाणीवर त्यांनी सल्लागार म्हणून काम केले.

गजाननबुवा मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातही प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. गजाननबुवांच्या अध्यक्षतेखाली औंधमध्ये ‘शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यांना सन १९७२ मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, आयटीसी सन्मान-१९८२ व मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार-१९८५ लाभला. गजाननबुवांचे २८ जून १९८७ रोजी डोंबिवली येथे निधन झाले.

त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!

-संदर्भ- आपले महानगर

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 28-06-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 83 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 28-06-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 83 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement