महाराष्ट्राचे प्रतिपंढरपूर - कोल्हापुरातलं 'नंदवाळ' गाव

नंदवाळ या गावाचा प्राचीन उल्लेख नंदिग्राम असा आहे. या ठिकाणी विठ्ठल मंदिर व शंकराचे पवित्र स्थान भिमाशंकर ही दोन्ही पवित्र धार्मिक स्थळे आहेत.

महाराष्ट्राचे प्रतिपंढरपूर -  कोल्हापुरातलं 'नंदवाळ' गाव मुख्य फोटो
मुख्य फोटो

नंदवाळ या गावाचा प्राचीन उल्लेख नंदिग्राम असा आहे. या ठिकाणी विठ्ठल मंदिर व शंकराचे पवित्र स्थान भीमाशंकर ही दोन्ही पवित्र धार्मिक स्थळे आहेत. अशा प्राचीन देवतेच्या उपासनेसाठी याठिकाणी हेमाडपंती दगडी मंदिर आहे. या मंदिरांमध्ये विठ्ठल रोज रात्री वस्तीस असतो, अशी आख्यायिका सांगितली जाते. शिवाय करवीर माहात्म्य या ग्रंथात असा उल्लेखही मिळतो. त्यामुळे या ठिकाणास प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते.

पंढरपूरप्रमाणेच नंदवाळ येथे विठ्ठलाशी संबंधित सर्व सण-उत्सव साजरे होतात. येथेही रिंगण सोहळा व दिंडी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. आषाढी एकादशीला या विठ्ठल मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. अगदी पंढरपूर प्रमाणेच येथे मोठी यात्रा भरते. त्यानिमित्ताने गावात जय्यत तयारी केली जाते. काही दिवसांवरच ही यात्रा असल्याने गावात आता जोरदार तयारी सुरू झाली आहे. याठिकाणी कोल्हापूरसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि विविध भागांमधून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात.

युगे बत्तीस विटेवरी उभा...

उभयांगी राई रखुमाई दिसे दिव्य शोभा...

सर्व भक्तांच्या भेटी परब्रह्म आले गा...

जय देव जय देव जय पांडुरंगा...

नामदेव महाराजांनी तर आपल्या आरतीमध्ये 'युगे अठ्ठावीस विटेवरी उभा' असा उल्लेख केला आहे. परंतु, इथे 'युगे बत्तीस' असा उल्लेख का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर याचे कारण असे आहे की, ३२ युगांपूर्वी नंदवाळ (नंदिग्राम) या ठिकाणी पुंडलिक माता-पित्यांची सेवा करीत होता. त्याची भक्ती पाहून त्याला वर देण्यासाठी प्रत्यक्षात पांडुरंग याठिकाणी आले आणि त्यांनी येथेच वास्तव्य केले.

नंदवाळ येथील विठ्ठल मंदिर हे विठ्ठलाचे निजस्थान असून, दररोज मुक्कामासाठी व वास्तव्यासाठी विठ्ठल, राई (सत्यभामा) व रखुमाई नंदवाळेमध्येच असतात. या तीनही स्वयंभू मूर्ती एकत्र असलेले हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर अनेक दशकांपूर्वीचे आहे. हे जागृत देवस्थान असून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे आहे आणि याचा प्रत्यय अनेकांना आल्याचे येथे बोलले जाते.

कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या सगुण-निर्गुण विठुरायाचे चराचरात वास्तव्य आहे. क्षेत्र पंढरपूर तर जगविख्यात आहे, पण फार कमी लोकांना विठ्ठलाचे मूळ स्थान असलेल्या नंदवाळची ख्याती माहिती आहे. पंढरपुरात येण्याआधी ३२ युगामाजी पांडुरंग आपल्या भक्त पुंडलिकासाठी येथेच अवतरला होता. पंढरपुरात विठ्ठल येण्याची जी कथा सांगितली जाते, तीच घटना येथे सर्वात आधी घडली आणि पुन्हा पुंडलिक पंढरपुरात गेल्यावर त्याला दर्शन देण्यासाठी विठुरायांचे अवतरण पंढरपुरात झाले.

करवीर महात्म्यात सांगितल्याप्रमाणे पूर्वीच्या नंदग्रामी अर्थात नंदापूर (नंदवाळ) या ठिकाणी श्री कृष्ण आपले माता-पिता यशोदा-नंद यांबरोबर वास्तव्यास होते; त्यांचे लिलास्वरूप म्हणून इथे त्यांचे चरणकमल उमटले आहेत. कृष्ण येथे वास्तव्यास असल्याचे कळताच देवकी व वासुदेवही येथे आले; ते स्थान म्हणजे 'वाशी' येथे आजही वासुदेवाचे मंदिर आहे. रामावतारात वनवासात असताना राम-लक्ष्मण-सीता याठिकाणी आले. त्यांची कुटी आणि काही दगडी कुंपण आजही इथे असल्याचे ग्रामस्थ सांगतात. अगस्ति आणि लोपामुद्रा यांनी येथे त्रिरात्र वास्तव्य केले होते. नंदवाळ गावात हे विठ्ठलाचे जागृत मंदिर आहे. मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी-सत्यभामा या ३ मूर्ती आहेत.

मंदिराबाहेर श्री विष्णूंची चतुर्भुज मूर्ती आहे. नंदवाळ पासून पुढे काही अंतरावर भीमाशंकर मंदिर आहे, येथेच गुप्तरूपात भीमा नदीचा उगम झाला. हेच श्रीकृष्णाचे लिलाक्षेत्र... जवळच पुंडलिकाचे मंदिर आहे.

नंदवाळमध्ये आषाढी वारीच्या आदल्या दिवशी रात्री विठ्ठल भगवंत मुक्कामी असतात आणि ते आषाढी वारीच्या दिवशी सकाळी पंढरपूरला जातात, अशी आख्यायिका आहे. या ठिकाणाला महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. आषाढी एकादशीला या नंदवाळमध्ये ४ ते ५ लाख भाविकांचे पाय लागतात. सगळा परिसर टाळ-मृदंगाच्या गजरात भाविकांच्या महापुराने ओसंडून वाहत असतो.

खऱ्या अर्थाने नंदवाळ हे प्रतिपंढरपूर आहे. पंढरीला जे बघायला मिळते तेच इथे आहे. तशीच चंद्रभागा नदी आहे (भीमाशंकर येथील गुप्त नदी). आत तलाव आणि मंदिर आहे. तसेच येथे स्वयंभू पिंडही आहे. या पिंडीला कान लावताच पाण्याचे नाद ऐकायला मिळतात, असे म्हटले जाते.

देवाच्या समोरच गावाच्या मध्यभागी पुंडलिकाचे मंदिर असून, प्राचीन काळातील पंढरपूरप्रमाणे येथेही गाईमूख आहे. त्याच्या समोर गोपाळ कृष्णाचे मंदिर आहे. या ठिकाणच्या नोंदी करवीर महात्म्यातही आहेत.

आषाढी एकादशीच्या अगोदर अंबाबाईच्या मंदिराची नगरप्रदक्षिणा करून दिंड्यांतून भाविक नंदवाळकडे रवाना होतात. याचा रिंगण सोहळा सकाळी ११ ते १ च्या दरम्यान पुईखडी येथे होतो. हा ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांप्रमाणेच गोल रिंगण सोहळा असतो. या ठिकाणी पंचक्रोशीतील

भजनी मंडळे, वारकरी व दिंड्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव उत्सुक असते. राधानगरी ते नंदवाळ व कोल्हापूर ते नंदवाळकडे येणाऱ्या दिंड्यांना प्रसादाचे वाटप ठिकठिकाणी सेवा म्हणून केलेले असते.

विठ्ठल नामाच्या गजरात भगव्या पताका, तुळशी वृंदावन, टाळ-मृदंगाचा ठेका आणि देहभान विसरून तल्लीन झालेला वारकरी नंदवाळ येथे दाखल होतो. 'जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम' सारख्या भजनांच्या तालावर जागोजागी महिला व वारकरी फुगडीचा फेरा धरतात. या उत्साही आणि चैतन्यमयी वातावरणात प्रतिपंढरीत आषाढीचा सोहळा संपन्न होतो.

-संकलित

Publisher: अभिजीत कुलकर्णी कोल्हापूर News publisher name | Date: 27-06-2026 News publication date | Time: 12:56 PM News publication time | Views: 175 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news
Publisher: अभिजीत कुलकर्णी कोल्हापूर News publisher name | Date: 27-06-2026 News publication date | Time: 12:56 PM News publication time | Views: 175 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement