पाकिस्तानची धूळधाण उडवणारे फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ

फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ भारताचे लष्करप्रमुख होते.भारताचे आठवे सैन्यप्रमुख होते. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या जीवनप्रवासाचा हा धावता आढावा!

पाकिस्तानची धूळधाण उडवणारे फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ मुख्य फोटो
मुख्य फोटो

फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ (२७ जून २००८) माणेकशॉ यांचा जन्म ३ एप्रिल १९१४ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील होर्मुजी माणेकशॉ तर आईचे नाव हिराबाई होते. माणेकशॉ यांचे कुटुंब मूळचे वलसाड, गुजरात येथील होते. माणेकशॉ यांचे शालेय शिक्षण अमृतसर येथे झाल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण नैनिताल येथील शेरवुड कॉलेजमध्ये घेतले. त्यांच्या वडिलांना त्यांना स्वतःप्रमाणे डॉक्टर बनवायचे होते, परंतु वडिलांच्या विरोधात जाऊन त्यांनी देहरादून येथे असलेल्या भारतीय मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला. सॅम माणेकशॉ हे भारतीय मिलिटरी अकादमीतून बाहेर पडणाऱ्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी होते. सन १९३४ मध्ये पदवीधर झाल्यानंतर त्यांची सेकंड लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली.

माणेकशॉ यांची ब्रिटिश लष्करात व भारतीय लष्करात जवळजवळ चाळीस वर्षांची कारकीर्द होती. दुसरे महायुद्ध तसेच १९४८, १९६५ व १९७१ या तिन्ही भारत-पाक युद्धांत तसेच १९६२ च्या चीन युद्धात त्यांचा हिरीने सहभाग होता. माणेकशॉ हे असे सरसेनापती आहेत ज्यांना त्यांच्या युद्धभूमीवरील शौर्यासाठी पदक मिळाले आहे. जपान बरोबरील बर्मा युद्धात ते गंभीररित्या जखमी झाले होते.

दुसऱ्या महायुद्धात कॅप्टनच्या हुद्यावर असताना, माणेकशॉ बर्मा येथील सिटांग नदीच्या मोहिमेवर होते. येथे झालेल्या लढाईत ब्रिटिश लष्कराने नुकसान सोसूनही ती मोहीम फत्ते केली. येथे असलेल्या पॅगोडा हिल्सवर ब्रिटिश सेना ताबा मिळवताना माणेकशॉ यांना गोळ्या लागल्या व ते गंभीर जखमी झाले.

१९७१ चे भारत-पाक युद्ध

७ जून १९६९ रोजी त्यांनी जनरल पी.पी. कुमारमंगलम यांच्याकडून सैन्यप्रमुख पदाची सूत्रे हाती घेतली. १९७१ च्या पूर्व पाकिस्तानातील घडामोडींनंतर भारतात मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचा लोंढा येऊ लागल्याने माणेकशॉ यांच्यावर मोठा दबाव आला. या घडामोडींची परिणीती १९७१ च्या भारत-पाक युद्धात झाली. या युद्धात भारताने माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा जबरदस्त पराभव केला व बांगलादेशची निर्मिती केली. या युद्धात माणेकशॉ यांच्या प्रभावी नेतृत्वाने तसेच अतिशय सजग युद्धनीतीने, पाकिस्तानला अमेरिकेचा पाठिंबा असूनही भारतीय सेनेने पाकिस्तानला पराभवाचे खडे चारले. याच घटनेमुळे माणेकशॉ आज स्वतंत्र भारताचे सर्वोत्तम सेनानी मानले जातात.

माणेकशॉ यांच्या प्रभावी कामगिरीमुळे तत्कालीन भारताचे राष्ट्रपती वराहवेंकट गिरी यांनी माणेकशॉ यांना सन १९७२ मध्ये पद्मभूषण या सन्मानाने सन्मानित केले. १ जानेवारी १९७३ रोजी माणेकशॉ यांना अतिशय खास असे फिल्ड मार्शलचे पद मिळाले. स्वतंत्र भारतात केवळ दोनच व्यक्तींना हे पद मिळाले आहे. या पदावरील व्यक्ती कार्यरत नसली तरी अधिकृतपणे निवृत्त होत नाही. १५ जानेवारी १९७३ रोजी माणेकशॉ यांनी कार्यालयीन निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर ते तामिळनाडूतील वेलिंग्टन या सैनिकी कॅन्टोन्मेंट जवळील कून्नूर या शहरात राहत होते. या नंतरच्या काळात त्यांनी डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेजचे प्रमुख म्हणून काम केले. तसेच काही खाजगी कंपन्यांमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणून पद भूषवले. माणेकशॉ यांचे २७ जून २००८ रोजी वेलिंग्टन येथील सैनिकी रुग्णालयात न्युमोनियाच्या दीर्घ आजारामुळे निधन झाले. या थोर सेनानीला शतश: नमन!

संदर्भ - विकिपीडिया

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 27-06-2026 News publication date | Time: 11:44 AM News publication time | Views: 102 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 27-06-2026 News publication date | Time: 11:44 AM News publication time | Views: 102 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement