महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या माध्यमातून ‘अमृत संवाद सेतू’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयांची कार्यपद्धती, प्रशासन व्यवस्था, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये यांची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे.
शासन आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद; ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रमातून प्रशासनाची ओळख
हिंगोली :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी ‘अमृत संवाद सेतू’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना शासकीय प्रशासनाची प्रत्यक्ष माहिती देणे, शासन व्यवस्था समजून घेण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यामध्ये जबाबदार नागरिकत्वाची भावना निर्माण करणे हा आहे.
या उपक्रमामध्ये १० ते १५ विद्यार्थ्यांच्या गटाने सहभाग घेता येणार असून, विद्यार्थ्यांना विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन तेथील कामकाजाची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे. शासकीय विभागांची रचना, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, नागरिकांसाठी उपलब्ध सेवा आणि प्रशासनाची कार्यपद्धती याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
‘अमृत संवाद सेतू’ अंतर्गत तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विभाग, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) तसेच इतर शासकीय विभागांच्या कार्यप्रणालीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येईल. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रशासनातील विविध बाबी समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
यामध्ये विद्यार्थ्यांना अर्ज व निवेदन लेखन, शासकीय कामकाजाचा पाठपुरावा, तक्रार निवारण प्रक्रिया, माहितीचा अधिकार अधिनियम (RTI), शासन निर्णय (GR), ऑनलाइन शासकीय सेवा व सुविधा यांचा प्रभावी वापर याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
याशिवाय प्रशासनातील मानवी बाजू समजून घेणे, अधिकारी व नागरिक यांच्यातील संवादाचे महत्त्व, लोकशाही व्यवस्थेत नागरिकांचा सहभाग आणि सामाजिक जबाबदारी यावरही विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञान न घेता शासन व्यवस्था, सामाजिक प्रश्न आणि नागरिक म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव असणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘अमृत संवाद सेतू’ हा उपक्रम विद्यार्थ्यांना सक्षम, सजग आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अमृत जिल्हा कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा. संपर्क : अमृत जिल्हा कार्यालय, हिंगोली प्रशासकीय इमारत, तळमजला, हिंगोली – ४३१५१३ संपर्क क्रमांक : 7391065471 वेबसाईट : https://mahaamrut.org.in/
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment