दुर्ग चढाई करणे हे खरंतर अतिशय कठीण साहसी कार्य आहे. यात शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही क्षमतांची कसोटी लागते. अशा वेळी हे साहसी कार्य एक-दोनदा नव्हे तर तब्बल १५० वेळा करणे, ही खरंच कौतुकाची आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची गोष्ट आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील दुर्गप्रेमी शैलेश विठ्ठल निवळकर यांनी ऐतिहासिक माहुली किल्ला तब्बल १५० वेळा सर करून एक उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कामगिरी केली आहे. जाणून घेऊया त्यांचा हा रोमांचकारी प्रवास.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला माहुली किल्ला त्याच्या अवघड चढाईसाठी आणि निसर्गरम्य सौंदर्यासाठी ओळखला जातो. हा किल्ला चढाईसाठी अतिशय कठीण मानला जातो. अशा या किल्ल्यावर वारंवार चढाई करताना शैलेश यांनी शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक ताकद आणि दुर्गसंवर्धनाबद्दलची निष्ठा जपली आहे.
दुर्गभ्रमंती ही केवळ छंद म्हणून न जोपासता त्यांनी ती एक जीवनशैली बनवली आहे. प्रत्येक वेळी किल्ला सर करताना इतिहासाची ओळख, पर्यावरण संवर्धनाचा संदेश आणि तरुणांना साहसी उपक्रमांकडे वळवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. शैलेश निवळकर यांचा हा १५० वेळा माहुली किल्ला सर करण्याचा प्रवास जिद्द, सातत्य आणि दुर्गप्रेमाचे प्रतीक असून अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
'जिद्द, चिकाटी आणि दुर्गप्रेम यांच्या बळावर कोणतेही शिखर गाठता येते', हे शैलेश निवळकर यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. त्यांचा हा प्रवास तरुण दुर्गप्रेमींसाठी नक्कीच प्रेरणादायी आणि आदर्श आहे, यात शंका नाही!
Comments 1 Comments
Rashmi
अभिनंदन.2👏💐 खरच कौतुकास्पद आहे ग्रेट
Write a Comment