छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती,त्यानिमित्त त्यांच्या लोककल्याणकारी जीवनप्रवासाचा हा शब्दआढावा-
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी झाला. शाहू महाराजांनी त्यांच्या संपूर्ण जीवनकार्यात लोककल्याणाचे व समाजउद्धाराचे कार्य केले. त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना 'लोककल्याणकारी राजा' असे संबोधले जाते. महाराष्ट्र शासनाकडून त्यांचा जन्मदिन संपूर्ण राज्यात 'सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरा केला जातो. शाहू महाराजांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात अतिशय भरीव योगदान दिले आहे. म्हणूनच त्यांना लोककल्याणकारी राजा असे म्हटले जाते.
छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे होते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले.
छत्रपती शाहू महाराजांवर महात्मा फुले व सत्यशोधक समाजाचा मोठा प्रभाव होता. छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील महात्मा फुले यांचे खरेखुरे वारसदार होते. सक्तीच्या व मोफत शिक्षणाची भारताला आवश्यकता आहे असे जाणताच त्यांनी कोल्हापूर संस्थानात शिक्षणासाठी सवलती जाहीर केल्या. महाराष्ट्राने छत्रपती शाहू महाराजांचा 'शेतकऱ्यांचा खरा राजा' म्हणून गौरव केला. तसेच भारतातील वस्तीगृहाचे आद्य जनक म्हणूनही छत्रपती शाहू महाराजांचा गौरव केला जातो. एप्रिल १९१९ मध्ये भारतात बहुजन समाजाच्या उद्धाराचे कार्य करणाऱ्या 'अखिल भारतवर्षीय क्षत्रिय महासभा' या संस्थेच्या कानपुर येथे भरलेल्या १३ व्या अधिवेशनात शाहू महाराजांना त्यांच्या कार्याबद्दल 'राजर्षी' ही पदवी बहाल करण्यात आली.
ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणाऱ्या विविध जाती-धर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीच्या वस्तीगृहाची स्थापना शाहू महाराजांनी केली. सन १९०१ मध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर येथे 'विक्टोरिया मराठा बोर्डिंग'ची स्थापना केली. तसेच नाशिक येथे 'उदोजी विद्यार्थी वस्तीगृह' उभारून शहरी भागात विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था केल्याने त्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य झाले.
सन १९०२ मध्ये शाहू महाराजांनी राज्यातील मागासवर्गीयांसाठी प्रशासकीय सेवांमध्ये ५० टक्के जागा राखीव ठेवल्या. तसेच महाराजांनी १५ नोव्हेंबर १९०६ मध्ये 'किंग एडवर्ड मोहमेदन एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना केली. सन १९०७ मध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी 'मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस'ची स्थापना करून त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. सन १९११ मध्ये कोल्हापूर संस्थानात जाहीरनामा काढून त्यानुसार १५% विद्यार्थ्यांना नागरी (नादारी) देण्याची घोषणा करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली केली. शाहू महाराजांनी सन १९११ मध्ये शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी 'मेरीट प्रमोशन' योजना राबवली. सन १९१७ मध्ये आदेश काढून माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले आणि कोल्हापूर संस्थानातील गोरगरीब घरातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. १४ फेब्रुवारी १९१९ रोजी पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू करण्याचा जाहीरनामा काढला.
बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र्य, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला. त्यांनी प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केल्या. लष्करी शिक्षणासाठी इन्फंट्री स्कूल सुरू केले व पुणे येथे 'श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल' तर 'जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूट'ची स्थापना करून शाहू महाराजांनी तांत्रिक शिक्षणाला महत्त्व देण्याबरोबरच लष्करी शिक्षणाची दारे खुली केली.
शाहू महाराजांनी सन १९१७ मध्ये विधवा विवाहाचा कायदा करून पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली, तर १९१८ मध्ये आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा केला व समाजातील अनिष्ट चाली-रीतींवर हल्ला चढवला. सन १९१८ मध्ये महार वतन रद्द करून जमिनी रयतवारी करून दिल्या व वेठबिगारी प्रथा कायद्याने बंद केली. तसेच १९२० मध्ये माणगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन केले.
त्यांनी जातिभेदाला तीव्र विरोध केला. दलित व मागासवर्गीयांची उन्नती हेच छत्रपती शाहू महाराजांनी जीवितकार्य मानले. 'राज्य सोडावे लागले तरी बरे, पण मागासलेल्या प्रजेच्या सेवेचे व्रत सोडणार नाही', असे शाहू महाराजांनी ठासून सांगितले. 'कामगारांनो संघटित व्हा व आपले हक्क प्राप्त करून घ्या', असा संदेश त्यांनी दिला.
अशा या लोककल्याणकारी राजाचे ६ मे १९२२ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
-संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment