प्रमाणपत्रे जागेवरच देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जाणार. शाळेतच मिळणार दाखले
शालेय विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी लागणारे विविध शासकीय दाखले आणि प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी आता 'आपले सरकार सेवा केंद्रावर' चकरा मारण्याची किंवा तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच हे दाखले सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने एक मोठा आणि अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शासनाने एक परिपत्रक जारी केले आहे.
दहावी-बारावीचे निकाल लागले आणि नवीन शालेय वर्ष सुरू झाले की, सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो दाखल्यांचा. प्रवेश प्रक्रियेदरम्यान शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची तातडीने आवश्यकता असते. यामुळे 'आपले सरकार सेवा केंद्रावर' विद्यार्थ्यांची आणि पालकांची मोठी गर्दी होते. बऱ्याचदा दाखले काढण्याच्या गडबडीमुळे विद्यार्थ्यांचा शाळेचा तास सुद्धा वाया जातो. हीच गैरसोय ओळखून ही व्यवस्था करण्यात आली आहे.
विशेष शिबिरांचे आयोजन - आता या नवीन सुविधेनुसार सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यात विशेष नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना आवश्यक ते दाखले आणि प्रमाणपत्रे जागेवरच देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जातील.
कशी असेल प्रक्रिया? - संबंधित तालुका, ग्रामपंचायत किंवा नजीकच्या 'आपले सरकार सेवा केंद्राचे' चालक ठराविक दिवशी थेट शाळेत जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांचे कामकाज प्राधान्याने पूर्ण करतील.
प्रवेश काळात विशेष व्यवस्था - सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे किंवा शाळेत नवीन प्रवेशही सुरू आहेत; अशा प्रवेशाच्या काळात किंवा प्रमाणपत्रांची मागणी जास्त असते, अशा वेळी ही विशेष मोहीम राबवून त्याचे काटेकोर नियोजन केले जाईल.
कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश मिळवताना अडचणी येऊ नयेत, त्यांना दाखल्यासाठी तासनतास उभे राहायला लागू नये आणि विनाकारण होणारा मनस्ताप सहन करायला लागू नये, यासाठी राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दाखल्यांसाठी आता एजंट आणि दलालांची गरजच लागणार नाही. थेट शाळेतच दाखले मिळणार असल्याने विद्यार्थ्यांचा श्रम, वेळ आणि पैशांची बचत होणार आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment